Friday, December 25, 2015

Christmas, Celebrations and Compassion

We very often blame young generation for their unconcern attitude towards serious incidents around but an incident yesterday night, evoke mixed feelings in one's mind. My son Aniket was chilling with his friends at 'Di Bella' Cafe at Veer Savarkar Road, Shivaji Park, having coffee, taking photographs with Santa n celebrating Christmas. Their celebrations got disturbed with a thudding noise which compelled them to come out of Cafe to see what exactly had hapened. Shockingly these young boys found a bike fallen on the middle of the road and two young boys lying in d pool of blood. While some were callously busy clicking photos of accident, few responsible citizens in the crowd gathered, tried to stop the cabs and other vehicles to take the injured to the Hinduja Hospital, few meters away. No vehicle stopped and the cabbies too refused on some or other pretext to ply seriously injured young boys to hospital. Aniket and his friends volunteered immediately to take them in their car to hospital without wasting time as it could be seen that both of them were in a very serious state. Unfortunately, one boy had a head injury, endangering his life. Here it needs to understand that both of them were not wearing helmets which caused grave impact on the head. Obviously, they needed to be attended immediately at the hospital. Aniket and his friends forego their celebrations, left their coffee and snacks on the table itself and left immediately to rush the injureds to Hinduja Hospital. Atul, a kindhearted employee of cafe 'Di Bella' too joined them. Meanwhile, the group of other young boys, pretty elderly to Aniket and his friends, mute spectators to this incident, were waiting for a table to occupy and missed no chance and rushed into the cafe to occupy the table immediately. This was contrary to the actions of the group of Aniket and his friends Shalvadeep, Anmol, Vinayak and Mihir who had only one aim that is 'to ensure immediate medical aid to victims'. The group of five along with some more young boys gathered there accompanied injured young boys to Hinduja Hospital and ensured timely emergency medical assistance to injured. Meanwhile, a known person to injured young boys reached the hospital and took charge of the situation. While the Christmas began to be celebrated the bells of compassion, love and brotherhood were ringing in the hearts of these young boys. The light of satisfaction of being able to fulfill duty had began to enlighten their mind and when they returned to cafe Di Bella a surprise was waiting for them. The generous Manager of the cafe  offered the team of young boys free coffee and snacks which these young boys politely declined as now they were really contented to have celebrated 'Merry Christmas' the way Jesus has shown to Mankind. Jesus measured greatness in terms of service, not status. God determines your greatness by how many people you serve, not how many people serve you. 

बन मस्का और एक पानी कम चाय....

अलिकडे माहीममधे,पश्चिमेकडील स्टेशनसमोरच्या मिया महमद छोटानी मार्गावर एक छोटे हाॅटेल नव्याने सुरू झाले. दर्शनी भागावर लावलेली 'कॅफे इराणी चाय' ही पाटी व बाहेरून दिसणारी जुन्या इराणी हाॅटेलसारखी सजावट व आतल्या टेबल खुर्च्या व आरसे इराणी हाॅटेलच्या बाजाचे! माहीममधे तशी सर्व प्रकारच्या खाण्याची सोय! मोगलाईचा मजा लूटनेके लिए शहनाझ हाॅटेल, खान्स्, जावेदभाईस् दिल्ली दरबार, आॅल टाईम फेव्हरीट चायनीजसाठी फाईव्ह स्पाईस्, लकी ड्रॅगन, गोव्यातील समुद्र किनार्ऱ्यावर नेऊन उभे करणारे सुशेगाद गोमंतक तर केरळला सरळ घेऊन जाणारे स्नेहा, घरची आठवण करून देणारे पोटोबा, थोडे पुढे शिवाजी पार्क कडे सरकले की जगातील उत्तम मिसळीचे माहेरघर 'आस्वाद', चायनीज जेवणातला अंतिम शब्द 'जिप्सी' अशी किती नावे घ्यावी, नावे घेऊनच पोट भरून जावे अशी ही खवैयांना आपलीशी करणारी नगरी म्हणजे माहीम! परंतु जाता येताना हे 'कॅफे इराणी चाय' लक्ष वेधून घेऊ लागले. शेवटी एकदाचा शिरलोच आंत! अनिकेत हाॅटेल सुरू झाल्यापासूनच्या महिन्याभरातच तीन वेळा भेट देऊन आलेला व हाॅटेलच्या प्रेमातच पडलेला! हाॅटेल अगदी बिनचूक इराणी हाॅटेलच! अगदी टेबल क्लाॅथ ही चौकड्यांच्या डिझाईनचा व गल्ल्यावरच अंड्यांचे ट्रेही ठेवलेले! गल्याच्या वर मागील बाजूस काही बुजुर्ग व्यक्तींचे जुने ब्लॅक अॅंड व्हाईट फोटो टांगलेले व आरशांवरती नक्षीही जुन्या पध्दतीची! भिंतीवरच्या बोर्डवर गिऱ्हाईकांना येथे काय करू नये हे हलक्या दमबाजीच्या भाषेत सांगणाऱ्या सूचना हे सारं एखाद्या जुन्या इराणी हाॅटेललाच शोभणारं! आॅर्डर दिल्याप्रमाणे अगदी तत्परतेने अकुरी बुर्जी, खिमा पाव व चिकन बिर्याणी समोर आली. समोर आलेल्या ह्या चवदार पदार्थांचा आस्वाद घेताना मोहमद हुसेन कॅफेता मालक टेबलादवळ आला "क्या साहब अच्छा लगा? त्याने अदबीने विचारलं? आपण ही जुनी परंपरा सादर करताना आपल्या ग्राहकांना ती कितपत रूचतेय ह्याचा अंदाज त्याला घ्यायचा असावा. 'बहोत खूब' माझ्या तोंडातून अगदी सहज शब्द बाहेर पडले. "आपने ये बहोत अच्छा किया, हमारा बचपन, हमारे जवानीकी यादें आपने फिरसे ताजा कर दी" मी त्याला म्हणालो व तो ही सुखावला. "क्या है ना सर, सौ के उपर कुछ साल हुए हमारी फैमिली इसी हाेटल के धंधे में थी, पांच होटलोंमे मेरे दादा पार्टनर थे. आहिस्ता बंबई की सभी इरानी होटल बंद होने लगे और हमारा भी धंधा खत्म हो गया. बंबईमें कुल मिलाकर दो सौ के उपर इरानी होटलें थी अब सिर्फ पैंतीस बची है लेकीन इतना तो मालूम था बंबई के लोग इरानी का खाना बहोत पसंद करते है इसलिए फिर से हिंमत करके ये होटल चालू किया हूॅं और रिस्पाॅन्स बढिया है" मोहम्मद हुसेन समाधानाने सांगत होता. मोहम्मद बोलत असतानाच, चित्रा सिनेमा समोरच्या कॅफे सिटीत मित्रांसोबत पानी कम चहा घेत,सुखदु:खाच्या गप्पा रंगवत, ज्यूक बाॅक्समधे १० पैशाची नाणी टाकत, पुन्हा पुन्हा ऐकलेली 'प्यार किया तो डरना क्या', सारंगा तेरी याद में, मुझ को इस रात की तन्हाई में आवाज ना दो, अशी एकापेक्षा एक सरस गाणी माझ्या मनांत रेंगाळू लागली होती. परळ नाक्यावरच्या फिरदोसी रेस्टाॅरन्टमधल्या दर्शनी भागातील मोठ्या काचेचेय



Sunday, November 29, 2015

समतोल 'घर वापसी'

'समतोल फाउंडेशन' ही संस्था स्टेशन परिसरातील मुलांशी संपर्क साधून व त्यांची कौटुंबिक माहीती मिळवून त्यांचे समुपदेशन करते. देशाच्या विविध भागातून आलेली ही ७ ते १४ वयोगटातील मुले बहुधा घर सोडून आलेली वा हरवलेली मुले असतात. त्यांना पुन्हा पालकांकडे पोहोचविणे व त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. आजवर सुमारे ५२०० मुलांना पुन्हा आपल्या घरी, आपल्या कुटुंबामधे पाठविण्याचे महत्वाचे काम 'समतोल फाउंडेशन' व संस्थापक विजय जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे हे कौतुकास्पद आहे. घरापासून व कुटुंबापासून नाते तुटलेल्या ह्या मुलांनी गुन्हेगारीपासून, अंमली पदार्थांच्या व्यसनांपासून व लैंगिक शोषणापासून दूर रहावे ह्या साठी ही संस्था दक्ष असते. आज ह्या संस्थेतील मुलांची त्यांच्या पालकांशी भेट घडवून ह्या मुलांना पालकांना सुपूर्द करण्याचा कार्यक्रम (मिलन समारोह) हेतू चॅरिटेबल ट्रस्ट, JIO मालाड, व स्ट्रीट चिल्ड्रेन्स् फाउंडेशन आणि समतोल फाउंडेशन च्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यांत आला होता. ह्या हृद्य सोहळ्यास माजी न्यायमूर्ती कमल किशोर तातेड व ज्येष्ठ सिनेअभिनेते सुरेश ओबेराॅय, पोलीस लांचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख किशोर जाधव हे उपस्थित होते. मुलांच्या शोधात वणवण फिरणाऱ्या मातापित्यांची अनेक महिन्यानंतर मुलांशी होणाऱ्या भेटीचे दृश्य मन हेलावणारे होते. घर सोडून आलेली मुले आईच्या कुशीत शिरून हमसीहमशी रडताना दिसत होती. आई वा बाप मारतात म्हणून घर सोडून आलेल्या मुलांना पुन्हा मायेची आस लागली होती व आई व वडिलही पुन्हा मारणार नाही याची खात्री पाणावलेल्या डोळ्यांनी देत होते.समाजातील दानशूर व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्यांचे हात 'समतोल फाउंडेशन' ला सहाय्य करण्यास सरसावलेले असतात.ह्या अतिशय चांगल्या कार्यक्रमामधे सहभागी होण्याचा आनंद ज्यांच्यामुळे लाभला त्या समतोल फाउंडेशन चे संस्थापक ह्यांना धन्यवाद व त्यांच्या उपक्रमास शुभेच्छा! ह्या स्तुत्य उपक्रमास आपलाही मदतीचा हात हवा आहे. संपर्क : विजय जाधव :98-92-961124



Tuesday, November 24, 2015

पिटूची आई, माझी आई आणि स्वेटर,मोजे, पर्स व बरंच काही...!

माझी आई ऐंशीच्य घरातली! फारश्या शिक्षित नसलेल्या माझ्या आईने महापालिकेत नोकरी केली. मी व माझ्या बहिणीने चांगलं शिक्षण घेऊन 'हापिसात' नोकरी करावी एव्हढंच तिचं माफक स्वप्न! कामगार चळवळीत कार्यरत माझ्या वडिलांच्या विचारांचा प्रभाव तिच्यावर असल्याने, सिनेमे, बुवाबाजी, गंडेदोरे, ऋण काढून सण साजरे करणे अशा गोष्टींपासून ती दूरच असे. आपण बरे की आपला संसार व नोकरी बरी असे तिचे जीवन होते. नाही म्हणायला,तिची व चाळीतल्या आमच्याच माळ्यावर रहाणाऱ्या साठी ओलांडलेल्या आजीची म्हणजेच 'पिटूच्या आईची' चांगलीच गट्टी जमली होती. पिटूच्या आईच्या वाट्याला अकालीच पतिनिधनाचं दु:ख आलं. पिटूच्या आईने मात्र मुलांचं संगोपन डोळ्यांत तेल घालून केलं. मोठा मनू व मधला छोटू शिकून नोकरीला लागले. त्यांनी स्वत:च्या स्वतंत्र जागा घेऊन बिऱ्हाडंही थाटली. धाकट्या पिटूनेही काॅलेज पूर्ण केले व तोही नोकरीस जात असे. रिकामपणचा विरंगुळा म्हणून लहान मुलामुलीना जमवून पत्त्यांचा खेळ मांडणे, रेडिओवरचे वनिता समाज,आपली आवड, श्रुतिका हे कार्यक्रम ऐकणे हे छंद पिटूच्या आईने जोपासले होते. पण त्याचबरोबर विणकामाची तिला मोठी आवड होती. पिटूच्या आईच्या विणकामाचं माझ्या आईला मोठं अप्रूप असे.आई कामावर जाताना आम्हां भावंडांना पिटूच्या आईच्या हवाली करत असे. पिटूची आई आमचा सांभाळ करत असे व लाडही! पिटूच्या आईने शिवलेला स्वेटर, मोजे आमच्याही वाट्याला येत असत. पिटूच्या आईने विणून दिलेला क्रोशाचा टेबल क्लाॅथ व दारावरचे तोरण पाहून आई हरखून जाई. कामावरून परतल्यावर पिटूच्या आईच्या बाजूस तासन् तास बसून ती पिटूच्या आईच्या हातची कला न्याहाळत बसे. एकीकडे गप्पा व दुसऱ्या बाजूला विणकाम सुरू असा कार्यक्रम सुरू राही. एकलव्याच्या एकाग्रतेने आईचे विणकामाचे प्रशिक्षण सुरू राही. एके दिवशी पैसे साठवून विकत आणलेल्या लोकरीचा एक छानसा स्वेटर आईने  पिटूच्या आईच्या हाती ठेवला. "अगो बाई, तू केलास कां हा?" पिटूच्या आईच्या स्वरात आनंद व आश्चर्य दोन्ही भरून आलं होतं. स्वेटर बऱ्यापैकी विणला होता पण कुठेकुठे मापात चुकलाही होता. आता मात्र पिटूच्या आईचा विचार पक्का झाला होता. आपल्या या शिष्येला क्रोशाच्या विणकाम कलेत पारंगत करायचेच ह्या निर्धाराने ती कामाला लागली. रोज कामावरून थकून भागून परतलेली माझी आई पिटूच्या आईच्या शिकवणीलाच जाऊ लागली व लवकरच तिने क्रोशाच्या विणकाम कलेत कौशल्य प्राप्त केल्याबद्दल पिटूच्या आईची शाबासकीही मिळवली.

अधून मधून लोकर, दोरे आणण्याइतपत पैसे जमवून माझी आई सुध्दा स्वेटर, मोजे, पर्स विणू लागली.  छंद तसा न परवडणारा होता. पण मिळालाच रिकामा वेळ तर विणकाम तिला आनंद देत असे. पुढे यथावकाश मुले मोठी झाली. वडिलांचे निधन झाले. आईने आता नोकरी करू नये असे आम्हां मुलांना वाटत होतेच. तिला नोकरीचा राजीनामा देण्यास आम्ही भाग पाडले. नोकरीच्या निमित्ताने सुरू असलेली तिची ओढाताण थांबली होती. काबाडकष्ट करण्याचे दिवस मागे पडून सुखाचे दिवस वाट्याला येऊ लागले होते. घरातील कामे स्वत: करण्याची तिची सवय मात्र तिला स्वस्थ बसू देत नव्हती. घरातील आम्ही सारी माणसे नोकरीधंद्यासाठी व नातवंडे शिक्षणासाठी बाहेर पडली की रिकामे घर तिला खायला उठे. टीव्ही मालिकातील तोचतोचपणाचा तर तिला कंटाळाच! हळू हळू तिने विणकामाला वेळ द्यायला सुरूवात केली. नात्यागोत्यातल्या लहान मुलांना तिने विणलेले स्वेटर व मोजे भेट म्हणून मिळू लागले. काॅलेजला जाणाऱ्या तरूण मुली आजीकडे पर्स विणून देण्याचा हट्ट धरू लागल्या. लग्न ठरलेल्या मुलीही आजीकडून रूखवतासाठी विणलेले काही बाही घेण्यासाठी लकडा लावू लागल्या. क्रोशाच्या विणकामातला आईचा आनंद दिवसागणिक वाढतच चाललाय! आईची करमणूकही तीच अन् भक्तीही तीच! एखाद्या नुकत्याच लग्न झालेल्या मुलीला आजीने विश्वासात घेऊन  "काय बातमी आहे का?" असं विचारावं अन् तिने लाजून दूर पळाल्यावर आजीने झबली, टोपरी, मोजे विणायला घ्यावेत हा तिचा शिरस्ता! गृहप्रवेशाच्या पूजेचं आमंत्रण कुणी घेऊन आला की आईने ठेवलंच त्याच्या हातात दाराचं विणलेले तोरण! दूर देशी शिक्षण घ्यायला जाणाऱ्या तरूण मुलाने आशिर्वाद घेण्यासाठी पायावर स्पर्श केला की त्याला मिळतो उबदार स्वेटर! आईच्या ह्या उद्योगाने तिला म्हातारपणी आनंद घ्यायला व द्यायलाही संधी मिळवून दिली. तिच्या मायेच्या बदल्यात तिला मिळू लागलं लहानथोरांचे प्रेम व शुभेच्छा! पिटूची आई आज हयात नाही. पण जाताना आनंद वाटण्याचा व मिळवण्याचा वसा माझ्या आईला देऊन गेली. क्रोशाचे स्वेटर, मोजे, झबली व टोपरी आणी तोरणे आता झाली आहेत माया,ममता, प्रेम, आस्था, आशिर्वाद असं बरंच काही..... !







Saturday, November 14, 2015

दिवाळीचा पाचवा दिवस..!

काल भाऊबीज झाली. दिवाळीचे चार दिवस आनंदात गेले. पण आमच्यासाठी आजही दिवाळी! बालिकाश्रम ह्या संस्थेतील आश्रमकन्यांसमवेत आजचा दिवस साजरा करताना आजही दिवाळीच असे वाटले. बालिकाश्रम ह्या संस्थेमधे ६ ते १२ वयोगटातील अनाथ मुलींचे योग्य संगोपन केले जाते. उत्तम संस्कार व मुलींच्या आरोग्य व शिक्षणाची सर्व आवश्यक काळजी घेणे हे बालिकाश्रमाचे वैशिष्ट्य! ह्या मुलींनी आज बालदिन म्हणजेच चाचा नेहरूंचा जन्मदिन साजरा केला. ह्या छोट्या पऱ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य व त्यांनी एकसाथ दिलेल्या 'हॅपी दिवाळी' ह्या शुभेच्छा दिपावलीचा आनंद शतगुणित करणाऱ्या होत्या. आपणां सर्वांना विनंती कृपया ह्या मुलींच्या आयुष्यांत आनंद फुलविण्याच्या प्रयत्नांना साथ द्या! बालिकाश्रमाला भेट देण्यासाठी जरूर संपर्क साधा. माझ्या सर्व मित्रांना विनम्र आवाहन ह्या संस्थेला ज्या उद्योग व्यवसायाशी संबंधित असाल तेथून ह्या संस्थेसाठी सीएस्आर निधी किंवा देणग्या उपलब्ध करून देऊन संस्थेच्या कार्याला हातभार लावून एक अनोख् समाधान प्राप्त करा.

मराठी तितुका टिकवावा...

वरळी कोळीवाडा 'स्लम' घोषित करण्याचा डाव म्हणजे 'उच्चभ्रूंच्या मुंबईसाठी' मूळ रहिवाशी,सामान्यांना हुसकावून लावण्याच्या कटाची पुढची पायरी!  उच्चभ्रूंसाठी वरळीमधे सागर सन्मुख उत्तुंग इमारतींचा मार्ग मोकळा करताना मूळचा मुंबईकर मुंबईबाहेर फेकला जाण्याची चिंता आहे. वरळी कोळीवाड्यातच नव्हे तर धारावी सह मुंबईत ह्यापुढे येथील मूळ मराठी रहिवाशी रहावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच गृहनिर्माणाच्या योजना आखावयास हव्यात. ६० च्या दशकात कामगारांसाठी व मध्यमवर्गियांसाठी म्हाडाने अभ्युदय नगर, पंतनगर, कन्नमवार नगर, टागोर नगर, आदर्श नगर, डी एन नगर अशा वसाहती वसवल्या म्हणून काही प्रमाणात सामान्य मराठी माणूस मुंबईत टिकून राहीला. गेल्या काही वर्षांमधे राज्यकर्त्यांनी गृहनिर्माण बिल्डरांच्या हाती सोपविण्यांत धन्यता मानली. गिरण्यांच्या जमिनी, ३ के  खाली जमिनी धनिकांच्या मुंबईसाठी आंदण दिल्या गेल्या. लालबाग परळ, दादर, गिरगांव येथील पुनर्वसन योजनांमधूनही दामदुप्पट भावाने पुनर्वसित सदनिका खरेदी करण्यात विशिष्ट समाज आघाडीवर राहीला व त्यामुळेही मुळ मराठी बाहेर गेला. मुंबईत चार दिवस मांस विक्री बंदी करणारे आता पूर्वीच्या लालची सत्ताधाऱ्यांच्याही चार पावले पुढे जातात की काय असे वाटू लागले आहे. हे रोखावे लागेल. त्यासाठी मराठी माणूस एकवटावा लागेल.
'मराठी माणूस टिकवावा, मुंबईत महाराष्ट्र धर्म दिसावा' ही तो तमाम मराठी माणसांची इच्छा!

Saturday, September 5, 2015

'गेले घ्यायचे राहून....!

शिक्षक दिनाच्या दिवशी माझ्या आर एम भट शाळेमधे विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या भूमिकेत शिरण्याची संधी मिळे. काही विद्यार्थी-विद्यार्थिनी उत्साहाने पुढे सरसावत. छान साड्या नेसून व नटून थटून ह्या वर्गमैत्रिणी व फुल पैंट मधले वर्गमित्र हातात पुस्तके,खडू घेऊन वर्गामधे शिरताक्षणीच हसू फुटत असे. गंभीर भाव चेहर्यावर आणण्याचे त्यांचे अवसान मजेदार वाटे. काही मात्र उगाचच ह्या वर्गातून त्या वर्गामधे पर्यवेक्षकाची जबाबदारी पार पाडण्याच्या मिषाने आपल्याला भावलेला 'शिक्षक वर्ग' न्याहाळण्यासाठी फिरतीवर असत. एकंदर हा दिवस गंमतीचा असे. आम्हा काही मित्रांसाठी मात्र त्याही दिवशी ही गंमत फक्त विद्यार्थी बनून पहाणेच नशिबी असे. त्या काळामधे आमच्या 'कर्तृत्वामुळे' दिनेश परब, डिमेलो, विद्या वैद्य, कलावार मैडम, लता जॉन, पगार मैडम अशा फारच कमी शिक्षकांशी जवळीक व प्रेमाचे संबंध असत. ह्या करता शिक्षक नव्हे तर आमचे विचित्र पराक्रमच जबाबदार असत. त्यांतूनच काटदरे, सोलाई मैडम व प्रि. जोशी सर माझ्यासारख्यावर त्यांच्या पध्दतीने 'प्रेमाचा वर्षाव' करीत. म्हणूनच शिक्षक ह्या पेशाबद्दल संमिश्र भावना मनामधे दाटल्यामुळे की काय शिक्षकाची भूमिका पार पाडण्याबद्दल आत्मविश्वासाचा अभाव मला मागे खेचत असे. सर्वात महत्वाचे म्हणजे शाळेत जाण्यासाठी, बाहेर जाण्यासाठी वा कुठे समारंभास जाण्यासाठी, केवळ शाळेच्या खाकी पैंट व पांढरा शर्ट ह्या गणवेषाच्या दोनच जोड्या असताना, शिक्षकाची भूमिका पार पाडण्यासाठी फुल पैंट कुठून आणणार हा प्रश्न सतावे. गरीबीचे मळभ मनातल्या उत्साहाने भरून आलेल्या आभाळामधे दाटून येई. शिक्षक होऊन पहाण्याची संधी हातून निसटून जाई. आज शिक्षक दिनी माझ्या सर्व शिक्षकांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करताना एका दिवसासाठी कां होईना शिक्षक होऊन पहावयास हवे होते असे वाटून मन खंतावते. 'नायक' चित्रपटातल्या, एक दिवसासाठीच्या मुख्यमंत्र्यासारखे एक दिवस 'शिक्षक' होता आले तर किती छान होईल! पुन्हा शाळेचे दिवस, तो वर्ग, तोच फळा, तीच बाके पण आपण मात्र समोर बाकावर नाही तर अनेकदा त्याच खुर्चीवर जिथे आपण पेनातील शाई वा खडूची पावडर टाकून गंमत करण्याचा आसुरी आनंद घेतला होता तिथे! विद्यार्थ्यांनीही मग आपल्याला शिकवू न देण्याचा चंग बांधावा. आपण ही एखाद्या आपल्यासारख्याच उपद्रवी विद्यार्थ्याला शिक्षा करताना शिक्षकांच्या मनात उठणारी कळ अनुभवावी. 'शिक्षक म्हणजे अनेक जीवने घडवणारा शिल्पकार' हे समजणे किंचितही राहून गेले असेल तर ते कळून यावे. 'शिक्षक' ह्या पवित्र भूमिकेचा स्पर्शही आयुष्य समृध्द करेल. शालेय जीवनातील माझ्या कैक चुका कधी माफ़ करून तर कधी योग्य शिक्षा देऊन माझ्या जीवनाला योग्य आकार देणार्या माझ्या सर्व शिक्षकांना आदरपूर्वक प्रणाम!