Friday, December 28, 2012

चहाटळपणा आता पुरे, विचारांची लढाई लढा!

मुंबई महानगरपालीकेतील विरोधी पक्ष नेत्यांनी शिवाजी पार्क च्या प्रत्येक प्रवेशद्वारावर नामफलक लावण्याची मागणी करून आपण विनोदी असल्याचेही दाखवून दिले आहे. ज्याची गरज काँग्रेसलाच नव्हे तर गेल्या कित्येक दशकात कुणालाही वाटली नाही, अशी मागणी केवळ कुरापत काढण्यासाठीच केली जात आहे व त्या पाठी पालिका वर्तुळामधे अभ्यासपूर्ण रीतीने नागरी समस्या मांडण्यामधे व भ्रष्टाचारावर तुटून पडण्यामधे क़ायम अपयशी ठरलेले विरोधी पक्ष नेते नव्हे तर प्रदेश काँग्रेसचे अपरिपक्व नेतृत्व आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मुंबई महापालीकेमधे आता अन्य कोणत्याही नागरी समस्या ऊरल्या नसून 'शिवाजी पार्क' चे नामफलक हेच काम बाकी आहे असे मानणे हास्यास्पद व बालीश आहे हे या नेत्यांना समजावून सांगण्याची आवश्यकता आता निर्माण झाली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर, शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेऊन मनाचा उमदेपणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दाखवला. शिवाजी पार्क वर अंत्यसंस्कारास परवानगी देण्याच्या चाकोरीबाहेरच्या निर्णयाबरोबरच, स्मारकासाठी नियमबाह्य पध्दतीने जागा देता येणार नाही हे ठामपणे स्पष्ट करून कणखरपणाचे दर्शनही घडवले. असे असताना 'ठाकरे पार्क' होऊ देणार नाही अशा राणा भीमदेवी थाटाच्या घोषणा देऊन काय साध्य करावयाचे होते? मुख्यमंत्र्यांनी आपल्या निर्णय क्षमतेतून कमावलेले गमावण्याचा कर्मदरिद्रीपणा,प्रदेश काँग्रेस केवळ आपण सेनेशी दोन हात करण्यासाठी सज्ज आहेत हे दाखविण्याच्या खटाटोपापोटी करीत आहे की मुख्यमंत्र्यांविरूध्द चालविलेल्या अंतर्गत राजकारणाचा हा परिपाक आहे ? असा प्रश्न राजकीय वर्तुळातील व प्रसार माध्यमातीलही अनेकांना पडणे साहजिकच आहे.

स्मारकाच्या प्रश्नावर दोन पावले मागे येऊन तसेच शिवाजी पार्क चे नामकरण शिवतीर्थ करण्याचे सद्यस्थितीत स्थगित करून सेनेनेही राजकीय शहाणपण दाखविले आहे. परंतु शिवतीर्थ या नावाला विरोध करून प्रदेश काँग्रेसकडून अज्ञान प्रकट केले जात आहे. सेनेच्या द्वेषापोटी केवळ विरोधाला विरोध म्हणून शिवतीर्थ असे नामकरण करण्यास विरोध करणे, म्हणजे विचारांची लढाई म्हणजे नेमके काय हेच प्रदेश काँग्रेसच्या बोलभांडाना कळले नसावे. शिवतीर्थ ह्या नांवाची कल्पना बाळासाहेबांची नसून, संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार आचार्य अत्रे यांची आहे ह्याचे ज्ञान कदाचित या उतावळ्यांना नसावे, अन्यथा शिवतीर्थ नांव देणे म्हणजे महाराष्ट्राच्या ११ कोटी जनतेचा अपमान ठरेल वगैरे खुळचट कल्पना मांडण्याची त्यांची हिंमत झाली नसती. आचार्य अत्रेंच्या महाराष्ट्र निष्ठेबद्दल व शिवभक्तीबद्दल शंका घेऊ शकेल असा अस्सल मराठी माणूस अजून जन्माला आला नाही व पुढील दहा हज़ार वर्षात येणार नाही. स्वातंत्र्यपूर्व काळामधे इंग्रजाळलेल्या वातावरणामधे, माहीम पार्क हे नांव बदलून शिवाजी पार्क असे देण्यात आले. ब्रिटीशांची शिवाजी महाराजांबद्दलची मते,आदर व आस्था, त्यांनी लिहीलेल्या इतिहासाच्या भाकड कथांमधूनच स्पष्ट होते व त्याचेच प्रतिबिंब शिवरायांचा उल्लेख 'शिवाजी' असा एकेरी करण्यामधे पडले असावे. प्रामुख्याने परिसरामधे मराठी भाषिकांची लोकवस्ती असताना या मैदानासाठी 'पार्क' हा इंग्रजी शब्द वापरणे कोणत्या सच्च्या मराठी माणसाला गैर वाटणार नाही? या पार्श्वभूमीवर, शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रातील भव्य स्मारकामुळे पावित्र्य लाभलेल्या या तीर्थ स्थळास शिवतीर्थ म्हणणे म्हणजे खर्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृती अधिक आदरपूर्वक जपणारे ठरेल. शिवाजी पार्क या नांवामधल्या शिवाजी या पूर्ण नांवाचे 'शिव' हे लघुरुप करुं नये असे मत मांडणारेही काही आहेत. परंतु शिव जयंती, शिव छत्रपती, शिवराय, शिव शंभू राजा, शिवशाही असे अनेक शब्द प्रचलित आहेत, अगदी शासकीय कारभारामधेदेखिल! 'शिव' हा शब्द शिवाजी महाराजांसाठीच वापरला जात आहे. असे असताना शिवतीर्थ नावाला आक्रस्ताळेपणाने विरोध करण्याने काँग्रेसच्याच प्रतिष्ठ्ेला बाधा येईल.

सत्ताधारी राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसकडून नेहमीच परिपक्व व भारदस्त भूमिकांची, जनतेची अपेक्षा असते, थिल्लर व बालीश विचारांची नव्हे! मुंबईच्या विकासाच्या प्रश्नांवर, नागरी समस्यांच्या सोडवणुकीवर, पालीकेतील काँग्रेस पक्षाने ठोस भूमिका घेण्याची,पालीकेतील सत्ताधारी युतीच्या भ्रष्टाचारावर तुूटून पडण्याची आज आवश्यकता असताना नाहक कुरापती काढण्याचा चहाटळपणा आता पुरे! मुंबईचे प्रश्न सोडविण्यासाठी व धर्मांधतेविरूध्द, जातीयतेविरुध्द लढण्यासाठी आणी काँग्रेसची जनताभिमुख धोरणे लोकांपर्यंत पोहोचविणे या साठी वेळ व शक्ती खर्च करावी हे जास्त बरे!

Tuesday, November 20, 2012

महाराष्ट्राच्या विकासाच्या योजना हे बाळासाहेबांचे स्मारक!

बाळासाहेबांच्या महायात्रेला महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून आलेल्या लाखोंची गर्दी लोटली. हे सारे फक्त शिवसैनिक नव्हते तर सर्व पक्षांचे, विचारांचे, धर्म व जातींचे बाळासाहेबांवर प्रेम करणारेही होते. त्यांत भक्त होते,अनुयायी होते,चाहते होते,मित्र होते आणी आयुष्यभर बाळासाहेबांसोबत राजकीय वैर असलेले शत्रूही होते. वैर्यांनीही प्रेम करावं असा 'दिलदार माणूस' होते बाळासाहेब! तरी देखिल बाळासाहेबांची चिता पूर्णपणे विझतही नाही तोवर बाळासाहेबांच्या स्मारकावरून वाद सुरु व्हावा ही घटना दुर्दैवी आहे़. म्हणूनच हा वाद सर्व संबंधितंानी ताबडतोब थांबविणे आवश्यक आहे. त्याकरिता दोन्ही बाजूंनी समंजसपणा दाखवून महाराष्ट्राच्या महान नेत्याचे उचित व प्रेरणादायी स्मारक एक नव्हे तर अनेक कशी होतील याची योजना आखावयास हवी.

बाळासाहेबांचे जीवन म्हणजे धगधगते यज्ञकुंडच! शिवाजी पार्कवर म्हणजेच शिवतीर्थावर जर बांधकाम स्वरूपात स्मारक शक्य नसेल तर बाळासाहेबांच्या दैवताजवळच 'धगधगते यज्ञकुंड' तयार करून तेथे समिधा अर्पण करण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करणे उचित ठरेल . याकरिता कमी जागा लागेल व मैदान प्रेमीनाही दिलासा मिळेल, अर्थात् सर्व कायदेशीर परवानग्या घेऊनच ! तसे म्हटले तर ज्या शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या गर्जना घुमत असत , त्या जिवाचा कान करून ऐकण्यासाठी लाखोंची गर्दी लोटत असे ते संपूर्ण शिवतीर्थ हेच बाळासाहेबांचे खरे स्मारक! म्हणून अधिकृतपणे 'शिवतीर्थ हे नांव प्रथम जाहीर करणे ही बाळासाहेबांना खरी श्रध्दांजली!

मुंबईमध्ये बाळासाहेबांचे अतिभव्य स्मारक व्हावे ही केवळ शिवसैनिकांची नव्हे तर सर्वांचीच अगदी शासनाचीही इच्छा अाहे. म्हणूनच दादर भागातच हे स्मारक ऊभे करण्या संबंधीही विचार करता येऊ शकेल. इंदू मिलच्या बहुचर्चित जमिनीवर डाॅ बाबासाहेब आंबेडकर व बाळासाहेब यांचे एकत्रितपणे स्मारक झाल्यास एक आगळावेगळा समतेचा संदेश देणारे स्मारक म्हणून संपूर्ण देशाला प्रेरणादायी ठरेल. याचाही विचार समंजसपणे करावयास हरकत नाही.

बाळासाहेबांची स्मारके व्हावयास ज़रूर हवी परंतु खर्या अर्थाने बाळासाहेबांची स्मारके आहेत, तो मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, ५५ ऊड्डाण पूल, झोपडपट्टी पुनर्वसन योजना जी बाळासाहेबांच्या कर्तृत्वाची व दूरदर्शीपणाची साक्ष देत आहेत, महाराष्ट्राच्या विकासाची प्रेरणा देत आहेत. विकासाच्या अशाच भव्य दिव्य योजना हेच महाराष्ट्राच्या हिताची सदैव तळमळ जपणार्या महान नेत्याचे, खरेखुरे स्मारक होय!

Friday, November 16, 2012

बाळासाहेब तुमचे छत्र अजूनही हवे आहे!

दुपारी  चार वाजता  'मातोश्री ' वर पोहोचलो. शिवसैनिक,शिवसेना नेते आणि पोलिसांच्या सहकार्यामुळे प्रचंड गर्दी असूनही उद्धवजीना भेटणे शक्य झाले. उद्धवजींच्या भेटीच्या दालनामध्ये मा. अंतुले साहेब, संजय राउत ,अनंत तरे, दिवाकर रावते ,विनोद घोसाळकर आदी नेते मंडळी बसलेली होती. अन्तुलेसाहेबांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द, बाळासाहेबांचा व त्यांचा स्नेह, रायगड जिल्ह्याचे राजकारण ई. रंगलेल्या गोष्टींमुळे माझ्याही मनावरचा तणाव  थोडा हलका झाला. परवापासून पसरलेल्या अफवांमुळे  भेदरलेले मन थोडे ताळ्यावर आले. उद्धवजी दालनात येताच मात्र पुन्हा वातावरण धीरगंभीर झाले. अनेक रात्रींचे जागरण व जन्मदात्या पित्याची मृत्यूबरोबर सुरू असलेली झुंज याचे प्रचंड ताण तणाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होते. बाळासाहेबांच्या तब्येतीची माहिती देतानाच, हा तणाव कणखरपणे बाजूला सारून आपण केवळ बाळासाहेबांचे नव्हे तर शिवसेनाप्रमुखांचे पुत्र आहोत, याची जाणीव म्हणूनच  परिस्थितीला सामोरे जाण्याचे धैर्यही त्यांच्या  वागण्याबोलण्यातून जाणवत होते. बाळासाहेबांची नाडी, रक्तदाब व्यवस्थित आहे व ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत हे त्यांनी सांगितले. अंतुले साहेबांनी वडिलकीच्या नात्याने स्वतःच्या तब्येतीचीही  काळजी घ्या असे सुचविले. त्यावर जरा डोळा लागणेही शक्य नाही आणि त्याला काही इलाज नाही असे उद्धवजी म्हणाले. बाळासाहेबांची दुर्दम्य इच्छाशक्ती व लाखोंच्या प्रार्थना हे संकट परतवून लावतील हा विश्वास घेउनच उद्धवजींचा निरोप घेतला. परमेश्वर उद्धवजीनाही शक्ती देवो!
बाहेर पडताना माझे ऐन तारुण्यातले म्हणजे विशीतले दिवस आठवले. तेंव्हा मी परळला राहत होतो. तमाम तरूण  वर्ग बाळासाहेबांच्या विचारांनी भारलेला होता. बाळासाहेबांच्या शब्दासाठी जीव द्यायला आणि जीव घ्यायलाही  अनेक तरूण  तयार असत. माझ्याही जीवनावर बाळासाहेबांचा मोठा प्रभाव पडला. राजकारणाची गोडी निर्माण झाली ती घरामध्ये माझे कम्युनिस्ट विचारांचे वडील व मैदानावरचे  बाळासाहेब यांच्यामुळेच ! पुढे इंदिराजीन्च्या हत्येमुळे संदर्भ बदलले. राजकारणाच्या वाटाही  बदलल्या. बाळासाहेबांच्या विचारांबाबत मतमतांतरे झाली. पण एक गोष्ट मात्र मनावर ठसून राहिली ती म्हणजे मुंबई मराठी माणसाचीच आहे व मुंबई मध्ये मराठी माणसाचा, भाषेचा आणि संस्कृतीचा सन्मान राखला गेलाच पाहिजे हे सांगणारा नेता एकच 'बाळासाहेब ठाकरे'!
बाळासाहेब तुम्ही शतायुषी व्हा! महाराष्ट्राला अजूनही तुमचे छत्र हवे आहे.     

Thursday, August 23, 2012

काळ सोकावतो आहे...

मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून श्री अरूप पटनायक यांची बढतीच्या रुपाने बदली झाली.बढती म्हणा वा बदली, ११ आॅगस्ट ची दंगल हाताळण्यामधे आलेल्या अपयशाचे खापर त्यांच्या माथ्यावर फोडले आहे हे निश्चित! ११ आॅगस्ट च्या दंगलीमुळे केवळ पोलीसांचे मनोधैर्यच खचले असे नव्हे तर जनतेच्या मनामधे असलेला पोलीसांवरचा विश्वासही डगमगू लागला. अरूप पटनायक यांच्या ऊचलबांगडीमुळे प्रश्न सुटल्याच्या भ्रमात राज्यकर्ते असतील, विरोधी पक्ष व तथाकथित महाराष्ट्रधर्मिय मोठा विजय मिळविल्याच्या आनंदात स्वत:चीच पाठ थोपटून घेतील. प्रसार माध्यमेही नव्या-जुन्या आयुक्तांच्या तसेच सरकारच्या व विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिक्रियांचा मागोवा घेत ब्रेकिंग न्यूज चा शोध घेण्यामधे मग्न राहतील. हे सारे भानावर येतील तेंव्हा पटावरची प्यादी हलवून प्रश्न सुटलेले नसून अधिक नवे प्रश्न सामोरे आलेले दिसतील़. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही काळ सोकावतो आहे हीच खरी चिंता आहे.
"मेरे एक हाथ में जूता और दूसरे हाथ में गीता है, जिसको जो चाहीए उस को वो ले ले" असे ठणकावून सांगणार्या पटनायक यांनी स्वतःच्या कर्तव्यकठोरतेचा आदर्श निर्माण केला होता हे त्यांचा राजीनामा मागणार्यानाही मान्य करावेच लागेल. मुंबईतील धनदांडग्यांच्या चाळ्यांना चाप लावणार्या ढोबळेंच्या पाठीशी ते ठामपणे ऊभे राहीले व जनतेच्या कौतुकास पात्र ठरले. ११ आॅगस्ट ची दंगल हाताळण्यामधे पटनायक यांनी अकार्यक्षमतेचे दर्शन घडवले की समयसूचकता दाखवून स्वतःची व पोलीस दलाचीही प्रतिमा पणाला लावून संयमाने परिस्थिती हाताळली व मुंबई पेटविण्याचा डाव ऊधळून लावला? याच्या मुळाशी जाण्याची खरे तर आवश्यकता होती.परंतु धार्मिक विद्वेषाच्या पायावरच ज्यांचे राजकारण आधारलेले आहे त्यांना संधी दवडायची नव्हती व आपसातील कुरघोडीच्या राजकारणामधे, वेळही गमवायचा नव्हता. मुंबई जळली काय अन् वाचली काय याचे भान ह्या तोंडाळ नेत्यांना कुठे राहीले होते!
ही दंगल घडवली कोणी? याचा शोध घेणे आता सुरु आहे. दंगलीमधे दुखावलेल्या ड्रग माफियांचा हात आहे येथपासून ते परदेशातून सूत्रे हलल्याचे धागेदोरे पोलीसांच्या हाताला लागत आहेत. राजकीय स्पर्धेपोटी शह काटशहाचे राजकारण, मुरब्बी नेत्यांनी रचल्याची शक्यताही नाकारता येत नाही. तसे जर घडले असेल तर पटनायकांना दिलेली शिक्षा म्हणजे 'चोर सोडून संन्याशाला फाशी' असे म्हणावे लागेल.
नवे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी 'मेरी वर्दीही मेरा धर्म है' असे सांगून पोलीसांचे मनोधैर्य उंचावण्याच्या अावश्यकतेवर जोर दिला आहें. परंतु आल्याआल्याच पटनायकांचे स्पेशल स्क्वाॅड बंद करण्याचा ऊतावीळपणाही केला आहे. कोणतीही माहीती न घेता घेतलेल्या या आगंतुक निर्णयाने मुंबईतील समाजद्रोही शक्तींचे तर फावणार नाही ना याची खातरजमा होणे जरुरीचे होते. कोणत्या परिस्थितीमधे कोणती आव्हाने आपल्यासमोर आहेत याचे आकलन सत्यपाल सिंह यांच्यासारख्या अनुभवी अधिकार्याला निश्चितच असणार अाहे, परंतु काळ आता सोकावलेला आहे याचे भान मात्र त्यांनी सदैव राखावयास हवे.

Friday, August 10, 2012

घी देखा लेकीन बडगा नही देखा, गिरणी मालकांना सांगण्याची गरज!

बाॅम्बे डाईंगच्या मालकांनी गिरणी कामगारांच्या ५३८७ घरांसाठी जागा उपलब्ध करून दिलीच पाहीजे अशा आशयाचा निर्णय देऊन कोर्टाने उद्दाम गिरणी मालकांना चपराक लगावली व त्यांचे पितळ उघडे पाडले आहे. मालकांच्या अन्यायाविरोधामध्ये चिवट झुंज देणार्या कामगार संघटना या करीता अभिनंदनास पात्र आहेत. मुंबईमधे गिरण्या ऊभारून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठीच गिरणी मालकांना या जमिनी अत्यल्प दराच्या लीजवर दिल्या गेल्या होत्या या वस्तुस्थितीकडे डोळेझाक करून गिरण्यांच्या जमिनी मालकांना आंदण देण्याचे व कामगारांना देशोधडीला लावण्याचे घोर पातक न्यायालयांनीही नजरेआड केले. परिणामी वर्षानुवर्षे गिरणी धंद्याची लूट करून गब्बर झालेल्या व कामगारांची पिळवणूक करणार्या मालकांची चांदी झाली. जमिन विक्रीतून मिळालेल्या मलिद्याचा वाटा मालकांनी इमानेइतबारे आपल्या रक्षणकर्त्या राजकारणी नेत्यांना पोहोचवला. आपल्या रक्षणकर्त्यांकडून अभय प्राप्त झालेल्या मालकांची हिंमत अधिकच वाढली. अन्यायाच्या ओझ्याखाली पिचलेल्या कामगारांचे ऊरले सुरले हक्कही हिरावून घेण्याचे डाव आखण्यास लोभी गिरणी मालकांनी सुरुवात केली. कामगारांच्या घरांसाठी द्यावयाची जमीनही कशी गिळंकृत करता येईल याच्या पळवाटा शोधण्यास मालकांनी नोकरशहांना हाताशी धरले व गिरण्यांच्या जमिनींवर भव्य दिव्य माॅल्स् व ऊत्तुंग इमारती उभ्या राहील्या. गिरण्यांच्या जमिनीवर हक्क कुणाचा? गिरण्या बंद पाडून कापड धंदा बुडीत काढणार्या मालकांचा की गिरण्यांमधे घाम गाळलेल्या कामगाराचा? याचे उत्तर दुर्दैवाने राज्यकर्त्यानीही शोधले नाही ही वस्तुस्थिती आहे. आज सर्वोच्च न्यायालयांने दिलेल्या या निर्णयाने सरकारच्या डोळ्यांतही अंजन पडावे व अन्य मालकांनीही गिळंकृत केलेली कामगारांच्या हक्काची जमिन त्यांच्या घरांकरिता उपलब्ध होण्यासाठी सरकारने कायद्याचा बडगा दाखवावा तरच मालकांचे डोके ठिकाणावर येईल़़. "घी देखा लेकीन बडगा नही देखा" हे जोपर्यंत गिरणी मालकांना समजून येत नाही तो पर्यंत ह्या सोकावलेल्या बोक्यांची हाव संपणार नाही.

Saturday, May 26, 2012

जमिन भरणी करा पण श्रमिक व मध्यमवर्गियांचे हित नजरेसमोर ठेवून!

राज्य सरकारने नेमलेल्या एका समितीने, मुंबई व मुंबई महानगर प्रदेशातील जागा टंचाईच्या प्रश्नावर उपाय म्हणून २०२५ सालापर्यंत भरणी करून २४७१ एकर जमीन उपलब्ध करावी अशी सूचना केल्याचे वृत्त प्रसिध्द झाले आहे़. भाऊचा धक्का, शिवडी, वडाळा, उरण अाणि अलिबाग येथे ही जमीन भरणी करण्यात येणार अाहे.या जमिनीवर मध्यवर्ती व्यापार केंद्र उभारण्यात येणार असून दुबईतील 'पाम आयलंड' च्या धर्तीवर भरणी केलेल्या जमिनीचा विकास करण्यात येणार आहे असेही या बातमीमध्ये म्हटले आहे. समितीचा हा अहवाल अद्यापपर्यंत जनतेसाठी प्रकाशित केलेला नसला तरी याची वेळीच दखल घेऊन त्या वर लगोलग विचारमंथन सुरू होणे आवश्यक आहे.

जमीन भरणी करून मध्यवर्ती व्यापार केंद्र निर्माण करण्याचा मार्ग जरी मोकळा होणार असला तरी या विकासाचे कोणते दूरगामी परिणाम मुंबई व आसपासच्या परिसरातील जनजीवनावर होणार आह्ेत हे पहाणे आवश्यक आहे. विशेषत: गरीबांचे,कामगारांचे व मध्यमवर्गियांचे विकासाच्या या अभूतपूर्व अवाढव्य प्रक्रियेमध्ये कोणते व कोठे स्थान असणार आहे हे सुरूवातीसच स्पष्ट होणे जरूरीचे आहे. अन्यथा बॅकबे रेक्लमेशन झाले, वांद्रे-कुर्ला काॅम्पलेक्स झाले, वांद्रे रेक्लमेशनही झाले, पुन्हा ये रे माझ्या मागल्या! उठताबसता ज्यांच्या तोंडी तळागाळातल्यांच्या उध्दाराची भाषा असे नेते भूखंड म्हटले की श्रीखंड ओरपण्यासाठी भान हरपून धावत सुटतात व मुंबईला आजचे वैभव प्राप्त करून देणारा श्रमिक मात्र विकासाच्या घोडदौडीच्या टापांखाली चिरडला जात असताना त्याकडे सोयीस्कर डोळेझाक करतात हाच आजवरचा अनुभव आहे. मुंबईमधल्या गिरण्या, मालकांनी बंद पाडल्यानंतर, गिरणगांवाच्या छाताडावर उभी राहीलेली टाॅवर संस्कृती, ऊच्चभ्रूंच्या मौजमजेची 'तीर्थ' स्थळे झालेले आलीशान माॅल्स व चकाकणार्या काचांच्या भिंतीआड हजारो कोटींचे व्यवहार जेथे दररोज चालतात अशी कार्यालये असणार्या देखण्या इमारती व त्याचबरोबर या सार्यामधे कुठेही स्थान नसलेला व देशोधडीला लागलेला एकेकाळचा लढाऊ गिरणी कामगार हे सारे नेतृत्वाच्या अशा दिवाळखोरीची व लोभाची साक्ष आहेत.

मुंबई व ठाणे परिसरामधे गिरण्या बंद झाल्या, अनेक इंजीनियरिंग, फार्मास्युटीकल्स, केमिकल्स व इतर उद्योग बंद पडले. स्थावर मालमत्तांच्या किंमती गगनाला भिडल्या. बंद उद्योगांच्या जमिनीच्या विकासातून मिळविलेल्या गडगंज नफ्याने मालक गब्बर झाले. उद्योगामधे वर्षानुवर्षे घाम गाळलेल्या कामगाराची मात्र दैना झाली. काही परागंदा झाले तर काहीनी व त्यांच्या कुटुंबियांनी मिळेल ती नोकरी,मिळेल ते काम स्वीकारून कसेबसे जगण्याचा मार्ग स्वीकारला. कामगाराला कायद्याचे संरक्षण देणारे, काही प्रमाणांत कां होईना, सामाजिक सुरक्षा देणारे संघटित क्षेत्र हळूहळू लयास जाऊन असंघटित क्षेत्राच्या वाढीस चालना मिळाली. कामगार कायद्यांचे संरक्षण केवळ कागदावर असलेला परंतु प्रत्यक्षांत मात्र रोजगाराची हमी नसलेला, किमान वेतन व आरोग्य विमा, निवृत्तीवेतन आदीसारख्या सामाजिक सुरक्षेपासून वंचित असलेला असंघटित कामगारांचा नवा वर्ग उदयास आला. मुंबई व ठाणे परिसरामधे या असंघटित क्षेत्रातील कामगारांचे प्रमाण एकूण कामगारांच्या संख्येच्या सुमारे ७०% आहे. जमिनींच्या विकासापाठचे अर्थकारण हेच मुंबईतील कष्टकर्यांच्या जीवनामधे व त्यांच्या सामाजिक स्थानामधे झालेल्या दुर्दैवी बदलापाठचे मूळ कारण आहे हे ध्यानात घेऊन या पुढे सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

विकासाच्या प्रक्रियेमध्ये वाढ होणार्या असंघटित क्षेत्रामधील कामगारांमधे प्रामुख्याने कंत्राटी कामगार, बांधकाम कामगार, सुरक्षा रक्षक, घरेलू कामगार, सफाई कर्मचारी,टॅक्सी व अाॅटो चालक आदींचा समावेश होतो. मुंबईतील कष्टकर्यांसाठी व मध्यमवर्गियांसाठी देखिल १९६० च्या दशकामधे गृहनिर्माण मंडळाने वसाहती उभ्या केल्या. तथापि, नंतरच्या काळामधे असे पुरेसे प्रयत्न झाले नाहीत. परिणामी मुंबईतील श्रमिक व मध्यमवर्गिय मुंबईबाहेर फेकला जाण्याची परिस्थिति निर्माण झाली. काल-परवापर्यंत श्रमिकांची म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर अोळखल्या जाणार्या मुंबईला 'धनिकांचे झगमगते शहर' ही नवी अोळख लाभली.दरम्यानच्या काळामधे "मुंबईचे शांघाय" करण्याची भाषा सुरु झाली. परंतु शांघायमधे विकास होताना श्रमिकांच्या रोजगाराचे रक्षण केले गेले. कष्टकर्यांच्या िनवार्याचे प्रश्नही सोडविले गेले. मुंबईच्या विकासाने मात्र गरिब व मध्यमवर्गियांच्या जीवनाचे लचके तोडले हे कटु सत्य नियोजनकारानी आता तरी मान्य करावयास हवे.

आज पुन्हा एकदा, प्रचंड मोठ्या प्रमाणांत, जमिन भरणी करून मुंबई व आसपासच्या परिसराचा विकास करण्याच्या, दुबईतील 'पाम आयलंडच्या' धर्तीवर 'मध्यवर्ती व्यापार केंद्र' निर्माण करण्याच्या योजना आखणे मुळीच गैर नाही. तथापि, विकासाच्या या अवाढव्य योजनेची आखणी करताना असंघटित क्षेत्रातील श्रमिकांच्या, मध्यमवर्गियांच्या रोजगारविषयक, िनवाराविषयक प्रश्नांसंबंधी योग्य काळजी घेतली गेली नाही तर पुन्हा पूर्वीच्याच चुकांची पुनरावृत्ती होईल. मोठाल्या उद्योगांबरोबर, सेवा क्षेत्रासोबत, असंघटित क्षेत्र सुध्दा देशाच्या अर्थकारणाचा पायाभूत घटक आहे याची खूणगाठ बांधूनच हे करावयास हवे, अन्यथा या कल्याणकारी राज्यामधे, येऊ घातलेल्या विकासामधे मूठभरांचे कल्याण होईल व कष्टकरी व मध्यमवर्गिय कायमचाच हुसकावून लावला जाईल.
ajitsawant11@yahoo.com
Cell: 9820069046






Monday, April 30, 2012

चिकित्सा योग्य पण तांतडीने उपचार आवश्यक

राहुल गांधीनी महाराष्ट्र्ातील काँग्रेस पक्ष संघटनेला जडलेल्या विविध व्याधींची योग्य चिकित्सा केली. ज्यांचेकडे पक्षाचे पालकत्व आहे त्यांचे कडून पालनपोषण व्यवस्थित होत नसल्यानेच मुडदुस जडला असावा याची खात्रीही त्याना पटली असावी. पक्ष व सरकार यामधे समन्वय राहीलेला नसल्याबाबत त्यांनी खेद व्यक्त केला. सरकारमधे असलेल्यांकडून कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे या बाबतची खंत त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाली. पक्षामधे काम करणार्याना डावलले जात आहे हे सांगतानाच त्यांनी पक्षातल्यांकडूनच पक्षाचा पराभव केला जात आहे हे निरिक्षणही त्यांनी नोंदवले.
उत्तर प्रदेश मधे स्वतः केलेल्या प्रचंड मेहनतीनंतरही अपयश पदरी पडलेल्या राहुलनी जे विश्लेषण पराभवानंतर केले जवळपास तसाच अभिप्राय त्यांनी महाराष्ट्रातील निवडणुकांना अजून पुरती दोन वर्षें बाकी असताना व्यक्त केला हे विशेष! राहुलनी केलेली ही नाडीपरीक्षा जरी योग्य असली तरी या व्याधींवर इलाज काय करणार हे मात्र राहुलनी स्पष्ट केले नाही. वर्षानुवर्षे पक्षासाठी निष्ठ्ेने राबणारे बंडासाठी का उभे ठाकतात व पक्षाच्या पराभवास कारणीभूत कां ठरतात हा प्रश्न स्वतःच्या स्वार्थासाठी कार्यकर्त्यांचा बळी देणार्याना विचारण्याचे राहुलनी टाळले. परिणामी कार्यकर्ते हवालदिल झाले व पक्षाच्या आजच्या स्थितीला जबाबदार नेत्यांनी सुटकेचे निश्वास सोडले.
राहुलजी रोगाचे निदान योग्य केलेत आता तांतडीने उपचार करा व आवश्यकता ध्यानांत घेऊन शस्त्रक्रिया करा अन्यथा राजाचा पोपट मृत्युपंथाला लागल्याचे सांगण्याचे धारिष्ट्य कोण करणार?