Tuesday, February 13, 2018

नाविकांचे बंड व मुंबईचा कामगार


नाविकांचे बंड व मुंबईचा कामगार 


११ फेब्रुवारी १९४५ हा दिवस ब्रिटिश सरकारने पकडलेल्या 'इंडियन नॅशनल आर्मी' ( सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेना) मधील लष्करी अधिकाऱ्यांच्या सुटकेच्या मागणीचा दिवस म्हणून देशभर पाळला गेला. मुंबईमधेही संप व निदर्शने झाली. कामगारांवर व जनतेवर ब्रिटिश सरकारने अमानुष लाठीमार व गोळीबार केले. ट्रेड युनियन पुढारी, कम्युनिस्ट व डाव्या काॅंग्रेस पुढाऱ्यांना तुरूंगात डांबण्यांत आले. जनतेच्या ह्या उठावाने लष्करामधे सुध्दा बंडाच्या वणव्याची ठिणगी पडली. भारतीय नौसैनिकांना ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीबद्दल ह्या नौसैनिकांच्या मनामधे संतापाची भावना निर्माण झाली होती. धुमसणाऱ्या ह्या  असंतोषाचा उद्रेक १७ फेब्रुवारी, १९४६ रोजी झाला. आयएन्एस् तलवार जहाजावरील नौसैनिकांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांचे हुकूम धुडकावून लावून बंडाचा झेंडा फडकावला. लगोलग मुंबई बंदरातील सर्व २२ नौकांवरील नौसैनिक ह्या उठावामधे सामील झाले. ह्या अनपेक्षित बंडाने ब्रिटीश सरकार गांगरून गेले. नाविकांच्या बंडाने स्वातंत्र्य आंदोलनातील अखेरच्या व निर्णायक पर्वाची सुरुवात झाली. उद्दाम ब्रिटीश अधिकाऱ्याने नाविकांना शस्त्रे खाली ठेवून शरण येण्याचा निर्वाणीचा इशारा दिला. अन्नपाण्याची रसद तोडली व शरण न आल्यास सर्व जहाजांना विमानातून बाॅम्ब टाकून बुडवून टाकून जलसमाधी देण्याची धमकी दिली. ह्या धमकीने नौसैनिक अधिकच चवताळून उठले. ही धमकी प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे प्रत्युत्तर लगेच दिले जाईल असा जबाब नौसैनिकांकडून दिला गेला. "आमच्या ताब्यातही तुमचे ब्रिटिश अधिकारी आहेत व आमच्या जहाजावरील तोफांची तोंडेही तुमची कार्यालये व गव्हर्नरच्या बंगल्याच्या दिशेने रोखलेली आहेत हे लक्षांत ठेवा" असा जबाब नाविकांकडून मिळताच ब्रिटीश अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. एव्हढ्यावरच हे नाविक थांबले नाहीत तर त्यांनी जहाजावरील ब्रिटीशांचा युनियन जॅक हा झेंडा उतरवला. काॅंग्रेसचा तिरंगा, मुस्लीम लीगचा हिरवा व कम्युनिस्टांचा लाल असे तीन झेंडे जहाजांवर डौलाने फडकू लागले. हे मोठेच धाडस होते परंतु ब्रिटिशांची पाशवी सत्ता उलथून टाकण्याची उर्मी त्यांना लढण्याची प्रेरणा देत होती. हादरलेल्या ब्रिटीश सरकारने बंडाला तोंड देण्यासाठी पुणे व नाशिक येथून गोऱ्या सैनिकांच्या पलटनी बोलावून घेतल्या. परिस्थितीची पहाणी करण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाचे पुढारी असलेले कामगार नेते काॅ डांगे व काॅ रणदिवे बंदर परिसरांत पोहोचले. बंड केलेल्या नाविकांशी त्यांनी चर्चा केली. परतताना त्यांना गोऱ्या सैनिकांच्या पलटणी रस्त्यांवरून जाताना दिसल्या. मुंबईमधे लगेचच मार्शल लाॅ लागू होण्याची ती सूचना होती. लगेच संध्याकाळी मुंबई कम्युनिस्ट पक्षाची सभा बोलाविण्यांत आली. हया सभेमधे, काॅ डांगे व काॅ बी टी रणदिवे ह्यांच्या सूचनेवरून मुंबईत सार्वत्रिक संप करून नाविकांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. ह्या निर्णयानुसार गिरण्यांच्या दरवाजावर सभा घेण्यास सुरूवात झाली. गिरण्यांमधे संप कमिट्या स्थापन झाल्या. कम्युनिस्ट पक्ष व कामगार संघटनांनी सार्वत्रिक संपाची हाक दिली. त्यांनी बंडखोर नौसैनिकांना संपूर्ण पाठिंबा जाहीर केला. २२ फेब्रुवारी, १९४६ चा हा सार्वत्रिक संप यशस्वी झाला. जनतेनेही हरताळ पाळून मुंबई बंद केली. रस्त्यावर उतरलेले कामगार व जनता ह्यांच्यावर, सार्वत्रिक संप व मुंबई बंद मुळे नामुष्की ओढवलेल्या सरकारने गोळीबार करण्याचे आदेश दिले. परंतु गोळीबाराला न जुमानता लोक रस्त्यावरून हटायला तयार नव्हते. लाॅरीतून कामगार भागांत फिरणाऱ्या गोऱ्या सोजिरांनी अंदाधुंद गोळीबार करायला सुरूवात केली होती. परंतु रस्तोरस्ती मुंबईतील लढाऊ कामगारांनी गोळीबाराला न जुमानता ब्रिटीश सोजिरांना पळता भुई थोडी केली. कम्युनिस्ट महिला कार्यकर्त्या या संघर्षांत आघाडीवर होत्या. कामगार भागातून अन्नधान्य गोळा करून व सोबत कामगार महिलांना घेऊन हरप्रकारे ते जहाजांवर बंडखोर नाविकांना पाठविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे, बंडवाल्यांची उपासमार करण्याचा ब्रिटीश सरकारचा डाव उधळला गेला. नाविकांच्या बंडामधे मोलाची कामगिरी बजावणाऱ्या ह्या महिला नेत्यांवर व कामगार महिलांवर, एलफिन्स्टन पुलाजवळ गोऱ्या सैनिकांनी अमानुष गोळीबार केला. गोळीबारामधे काॅ कमल दोंदे मरण पावल्या. काॅ कुसुम रणदिवे ह्यांच्या पायात गोळी घुसली. कुसुम जयकर गंभीररीत्या जखमी झाल्या. लालबाग विभागातील तेजुकाया पार्क मधे झालेल्या गोळीबारात केशव बाबू व शंकर भागोजी हे दोन कामगार मृत्युमुखी पडले. डिलाईल रोड परिसरांत सशस्त्र पोलीसांबरोबर कामगारांनी युध्द पुकारले. ह्या कामगारांशी लढताना सशस्त्र पोलीसांनाही दोनदा पळ काढावा लागला. कामगार, सरकारविरोधात बेफाम झाले होते व मरणालाही सामोरे जाण्यास तयार झाले होते.  गोळीबारात दोन दिवसात तीनशे लोक ठार झाले. मफतलाल शहा नावाचे कामगार कार्यकर्ते भुलेश्वर भागात पोलीसांनी केलेल्या गोळीबारात बळी गेले. जागोजागी पडून राहिलेली प्रेते व जखमी आंदोलक ह्यांना हलविणे आवश्यक झाले होते. खाटांवरून प्रेते हलविण्याची जबाबदारी व जखमीना हाॅस्पिटलमधे हलविण्याची जबाबदारी कामगार कार्यकर्त्यांनी स्वीकारली. परंतु त्यासाठी लाॅऱ्यांमधून बेधुंद गोळीबार करीत येणाऱ्या गोऱ्या सोल्जरांना रोखणे आवश्यक होते. कामगारांनी ब्रिटीश सोजिरांच्या गाड्या अडविण्यासाठी नाक्यानाक्यावर बॅरिकेडस् म्हणजे अडथळे उभे केले. पोलीस गोळीबारात हुतात्मा झालेल्यांची प्रेते व जखमींना केईएम् हाॅस्पिटलमधे नेण्याचे काम कामगारांनी व कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी जिवावर उदार होऊन केले. नाविकांनी केलेले बंड, त्यांना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरलेले कामगार व सर्वसामान्य जनता ह्यांनी पुकारलेले युध्द ह्यामुळे ब्रिटीश सरकार हादरून गेले. काॅंग्रेस व मुस्लीम लीगच्या पुढाऱ्यांनी मात्र नाविकांच्या पुढाऱ्यांच्या मागे संप व बंड मागे घेण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. काॅंग्रेसचे नेते सरदार वल्लभभाई पटेल व मुंबई प्रांतिक काॅंग्रेसचे अध्यक्ष नाविकांच्या बंडाच्या विरोधात होते. सरदार वल्लभभाई पटेलांनी, नाविकांनी स्वीकारलेल्या हिंसात्मक मार्गाचा निषेध केला. 'संप मागे घ्या आम्ही बडतर्फी होऊ देणार नाही' असे आश्वासन देऊन सरदार पटेलांनी अरुणा असफ अलींना नाविकांच्या संप कमिटीसोबत बोलणी करण्यासाठी पाठवले. त्यांनी नाविकांना शांततेचे आवाहन केले. 'शस्त्रे खाली ठेवून बंड मागे घेण्यापूर्वी, कोणत्याही नाविकावर कारवाई होणार नाही व नाविकांच्या सर्व तक्रारी सोडविल्या जातील असे सरकारने आश्वासन द्यावे व हे आश्वासन पाळले जाईल ह्याची काॅंग्रेसने व मुस्लीम लीगने जबाबदारी स्वीकारावी अशी संप समितीच्या नेत्यांची मागणी होती.परंतु प्रथम शरणागती स्वीकारा असा पटेलांचा आग्रह होता. २४ ,फेब्रुवारी १९४६ रोजी संपाच्या सहाव्या दिवशीही सर्व गिरण्या बंद होत्या. दुपारनंतर पोलीसांनी चाळीचाळीतून शिरून मोठ्या प्रमाणात धरपकड केली. अनपेक्षित अशा ह्या कारवाईने कामगारांचा प्रतिकार थंडावला. 

नाविक बंडाला पाठिंबा देण्यासाठी ब्रिटिश लष्कराने केलेल्या गोळीबाराच्या व पोलीस अत्याचाराविरोधात २५ फेब्रुवारीला मुंबईत जनतेने कडकडीत हरताळ पाळला. काॅंग्रेस व मुस्लीम लीग ह्यांची प्रथम नाविकांनी शरणागती पत्करावी अशी भूमिका असल्याचे पाहून नाविकांनी शरणागती पत्करण्याचा निर्णय घेतला. संप मागे घेताना नाविकांच्या पुढाऱ्यांनी जाहीर केले की आमची शरणागती ब्रिटिश सरकारपुढे नसून ती भारतीय जनतेसमोर आहे. नौसैनिकाचे नेते दत्त ह्यांनी देशवासीयांनी नाविकांच्या बंडाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानताना मुंबईतील कामगारवर्गाने दिलेल्या लढ्याचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख केला. ब्रिटिश सरकारविरोधात लढताना हुतात्मा झालेल्या तीनशेच्या वर शहीदांना श्रध्दांजली अर्पण करताना दत्त म्हणाले " सैनिकांचे व सामान्य जनतेचे रक्त प्रथमच एकत्र सांडले. आम्ही सैनिक हे कदापि विसरणार नाही व तुम्हीही विसरणार नाही याची आम्हाला खात्री आहे.  इन्किलाब जिंदाबाद! जयहिंद! नौसैनिकांनी शरणागती स्वीकारल्यावर बंड शमले, शांतता प्रस्थापित झाली व कामगारही कामावर परतले. परंतु शरणागती स्वीकारलेल्या नाविकांना बंदरावर परतलेयावर लष्करी तुकड्यांनी ताब्यात घेऊन कैद केले. काॅंग्रेस व मुस्लीम लीगने दिलेले आश्वासन फोल ठरले. 

नाविकांच्या  बंडाचा व ह्या बंडाला मुंबईतील  जनतेने दिलेल्या साथीचा, भेदरून गेलेल्या ब्रिटीश सरकारने धसका घेतला. लष्कर व जनता एकत्र येऊन सरकारविरोधात एकत्र येऊन रस्त्यावर उतरल्याचा संदेश अगदी इंग्लंडपर्यंत पोहोचला. आता लवकरच भारतातून गाशा गुंडाळण्याची वेळ येऊन ठेपली आहे हे ध्यानांत यावयास ब्रिटीश सरकारला वेळ लागला नाही. ९ आगस्ट १९४२ रोजी सुरू झालेल्या 'चले जाव' आंदोलनानंतर, नाविकांच्या बंडाने व मुंबईतील झुंझार कामगारांनी ब्रिटीशांना निर्वाणीचा इशारा देऊन भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या अखेरच्या टप्प्यावर दैदिप्यमान इतिहास रचला. दुर्दैवाने ब्रिटीशांना भारतातून पळ काढण्यास भाग पाडणाऱ्या, स्वातंत्र्य आंदोलनातील ह्या अखेरच्या तेजोमय  पर्वाला स्वातंत्र्योत्तर काळामधे राज्यकर्त्यांकडून इतिहासामधे अनुल्लेखाने बाजूस सारण्यांत आले. अहिंसा व सत्याग्रह ह्या गांधीजींच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवून दिले असले तरी ब्रिटीशांना अखेरचा दणका झुंझार नाविकांनी व मुंबईच्या कामगारांनी दिला हे स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासातून कसे पुसता येईल?


अजित सावंत

(सामाजिक कार्यकर्ते व कामगार चळवळीचे अभ्यासक)
संदर्भ:
१. एस् ए डांगे एक इतिहास - लेखक, रोझा देशपांडे, बानी देशपांडे
२- कामगारांची मुंबई - लेखक के. डी. नाईक
३. मंजिल अजून दूरच, लेखक गंगाधर चिटणीस