Monday, February 18, 2013

पिक्चर अभी बाकी है दोस्त!

एका मराठी चॅनलवर मिलिंद सरवटेची मुलाखत पाहीली. अँकर निलेश खरेने स्वत: कमी बोलून ही मुलाखत चांगलीच रंगवली. काॅर्पोरेट क्षेत्रातला ' मराठी बिग बाॅस' म्हणून आज मिलींदचा बोलबाला असला तरी माझ्यासाठी तो वर्गमित्रच! एकमेकांच्या बालपणाचे आम्ही साक्षीदार! शाळेमधे मी पहिल्या बाकावर व मिलींद माझ्या मागल्या बाकावर बसत असे. कायदा व सुव्यवस्था नांदावी म्हणून वर्गशिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांचा तो एक भाग होता. मिस्किलपणा, खोडकरपणा, टवाळक्या याबाबत आमचे बरेचसे गुण जुळत होते. किंचितसा फरक होता तो एवढयापुरेसाच की बर्याचदा कंटाळून शिक्षकांनी बाहेर काढल्याने माझा बर्यापैकी वेळ वर्गाबाहेर जात असे. बाहेरही मोठी मजा असे. बाहेरूऩ वर्गातील इतर मुलांना वाकुल्या दाखवून हसवणे अन् पुन्हा शिक्षकांचे लक्ष गेल्यास पश्चातापदग्ध चेहरा करून साळसूदपणाचा आव आणणे हे मला अवगत होते. परिणामी हसणार्यांपैकी कुणाला तरी शिक्षकांच्या अवकृपेने माझ्या सोबतीसाठी बाहेर येणे भाग पडे. मिलींद मात्र 'रंगुनी रंगात सार्या रंग माझा वेगळा' म्हणत या सार्यातून सहीसलामत सटकण्यात यशस्वी होई. महापालीकेच्या शाळेतून ७वी झालेल्या मिलिंदने, नव्यानेच आर्. एम्. भट शाळेमधे सुरू झालेल्या इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता ८वी च्या वर्गामधे प्रवेश घेतला होता. बुजर्या वाटणार्या व आम्ही विद्यार्थ्यांनी 'शामळू' ठरवलेल्या या 'म्युन्सिपालटीच्या' शाळेतून आलेल्या मुलाने हळूहळू आपले रंग दाखवण्यास सुरूवात केली. खोड्यांचे नवनवे अभिनव प्रकार शोधून काढण्याबरोबरच, िशक्षकानी विचारलेल्या प्रश्नाना उत्तरे देण्यासाठी मिलिंदचे बोट उंचावलेले असे. मिलींदने स्वत:ची अशी क्रेडिबिलीटी शिक्षकांसमोर निर्माण केली होती. मिलिंदने एखादा खोडकरपणा केला असावा किंवा इतरांना त्यासाठी उत्तेजन दिले असावे अशी पुसटशी देखिल शंका शिक्षकाना येत नसे. एक साम्य मात्र आम्ही दोघानी जपले ते म्हणजे मिलिंद वर्गामधे पहिला आला ......व मी ही पहिला आलो,शेवटून!

मिलिंदने काॅर्पोरेट क्षेत्रातला मराठी बिग बाॅस होण्याची बीजे रुजण्याचा तो काळ होता. प्रोत्साहन देणे, कामे करवून घेणे, उद्दिष्टे ठरवून त्या दिशेने प्रयत्नशील रहाणे हे सारे उत्क्रृष्ट व्यवस्थापकाला आवश्यक असलेले गुण शाळेमधे असतानाच मिलिंदमधे होते पण त्याचबरोबर 'रिस्क अॅनालीसिस' ची क्षमताही! खोडकरपणा करायचाय, बालपणाचा व शालेय जीवनाचा आनंदही लुटायचाय पण अभ्यासाला फाटा देण्याची रिस्क पत्करून नव्हे याची पुरेपूर जाण त्या वेळीही त्याला होती. आज ठामपणे मिलिंद म्हणतो मराठी माणूस रिस्क घेण्याची हिंमत बाळगतो परंतु दुर्दैवाने रिस्क अॅनालिसिस करण्यामधे कमी पडतो. कुठवर रिस्क घेतली पाहीजे याचं भानच त्याला रहात नाही. मिलिंदच्या या मुद्द्यामधे खरोखरच किती तथ्य आहे. वेडात मराठे वीर दौडले सात अशीच स्थिती बर्याचदा जिगरबाज मराठी माणसांच्या वाट्याला येते. पर्वत िशखरावर पोहोचून आभाळ ताब्यात घेण्याची जिद्द बाळगणारा कधी डगमगून कच खातो किंवा स्वत:च संयम गमावून आत्मघात करतो अशी अनेक उदाहरणे दिसतात. मराठी असल्यामुळे आपल्या वाट्याला संधी कमी येतात असे म्हणणार्यांचा समाचार घेताना ' हे थोतांड आहे ' असे मत मिलिंद व्यक्त करतो ते स्वानुभवाच्या जोरावरच! आपण मराठी आहोत हीच आपली जमेची बाजू म्हणजे अॅसेट आहे हे तो आवर्जून सांगतो तेंव्हा ऐकणार्या प्रत्येक मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरून येतो. मस्टरला फाटा देऊन,सहकारी कर्मचार्यांवर विश्वास टाकून कंपनीविषयी आपुलकीची भावना निर्माण करणारा मिलिंद मराठी माणसाना नियमावर बोट ठेवणे सोडून द्या असे सांगतो ते मराठी माणसांच्या अंगी असलेल्या सचोटीचे, चांगुलपणाचे चीज व्हावे या साठी! उदारीकरणामुळे, कुणी अमक्याचा नातेवाईक, तमक्याच्या जातीचा म्हणून काॅर्पोरेट क्षेत्रामधे प्रगति करूं शकणार नाही तर ज्ञान व परिश्रम या जोरावरच प्रगति साध्य आहे हे सांगणारा मिलिंदच खर्या अर्थाने आजच्या मराठी तरूणाचा वाटाड्या! सुशिक्षित मराठी तरूणांना आक्रमक भाषेने भुलवणार्या नेत्यांच्या जयघोषांच्या गर्जनांच्या कोलाहलामधे मिलिंदचे शब्द मला दूर वरून येऊन कानी पडणार्या सुरावटीसारखे भासतात. मिलिंदच्याच शब्दांमधे 'कॅलिफोर्नियाचा कोकण' करणारा सिलिकाॅन व्हॅलीमधे कर्तृत्वाचा झेंडा फडकवणारा मराठी तरूण कुठेही कमी पडण्याची सुतराम शक्यता नाही, गरज आहे ती मी चांगला आहे, सक्षम आहे व माझं मराठी असणं मला कमीपणा आणणारं नसून, ते माझं बलस्थान आहे हे स्वत:च्याच मनावर सतत बिंबवण्याची! मिलिंदचे हे शब्द मला आश्वासक वाटतात. मराठी तरूणांच्या, काॅर्पोरेट क्षेत्रातील व उद्योग क्षेत्रातील उज्वल भविष्याची हमी देतात.

कुठलीही वस्तू बाजारामधे आणण्यासाठी त्या वस्तूचा प्रथम ब्रँड तयार करावा लागतो. अगदी यशस्वी होऊ पहाणार्या माणसाला सुध्दा स्वत:ची ब्रँड व्हॅल्यू तयार करावी लागते व माणूस हे कळत नकळत करत असतो. शाळेमधे शिक्षकानी कौतुक करावं म्हणून, पुढे मित्रांमधे स्वत:चं वेगळेपण जपावं म्हणून, नंतर आवडणार्या व्यक्तीला आपलंसं करण्यासाठी, अशा अनेक वेळी माणूस स्वत:चं मार्केटिंग करत असतो, स्वत:चा ब्रँड निर्माण करून! हे स्पष्ट करून मिलिंद पुढे म्हणतो - "हेच तर करायचं असतं यशस्वी होण्यासाठी,गरज असते फक्त स्वत:ची स्ट्रेन्थ ओळखण्याची". लालबाग-परळ मधे बालपण गेलेल्या अनेकांना एक वेगळीच शक्ती या परिसराने दिली. आपल्याकडे गमावण्यासारखं फारसं काहीच नाही ह्याची जाणीव हीच ती शक्ती! ह्या शक्तीच्या जोडीला, सामान्य कुटुंबातील जन्म व रक्ताची अन् जिव्हाळ्याची नातीही सामान्यांशी! ह्याचं भय , ह्याचा न्यूनगंड ज्यांना वाटला नाही, ज्यांनी कष्टकरी जीवनाशी जुळलेली नाळ हेच लेणं मानून मिरवलं, त्यांनी यश मिळवलं. काॅर्पोरेट क्षेत्रामधे, काम करत असताना मिलिंद सरवटे ह्या उच्च पदावरील अधिकार्याला,सामान्य कर्मचार्यांपासून ते अतिवरिष्ठांपर्यंत कुणाशीही सहजगत्या संवाद साधणं सोपं गेलं ते यामुळेच! मिलिंदसारखा बिग बाॅस जेंव्हा याची कबुली देतो तेंव्हा अनेक धडपडणार्या तरूणांचा तो आयकाॅन ठरतो.

मिलिंदचे वडिल बेस्ट मधे कर्मचारी होते. लालबागच्या बेस्ट वसाहतीमधे रहणार्या मिलिंदने तिथे राहूनच आपलं चार्टर्ड अकाऊंटंटचं शिक्षण पूर्ण केलं. सीए च्या परिक्षेच्या निकालाच्या दिवशी त्याने फलकावर लावलेला निकाल पाहीला. आपलं नांव उत्तीर्णांच्या यादीत दिसलं नाही म्हणून बहुधा आपला पुरताच निकाल लागला असावा असे वाटून तो हिरमुसला व जड पावलांनी तेथून निघू लागला. एव्हढ्यातच भेटलेल्या एका मित्राने त्याचे कडकडून मिठी मारून अभिनंदन केले. " मित्रा तू पहिला आलायस्, त्या तिथे एका वेगळ्या फलकावर अभिनंदनासहित तुझ्या निकाल लावला आहे" मित्र म्हणाला. मिलिंद म्हणतो "काही क्षण माझा विश्वासच बसेना.परंतु या धक्क्यातून सावरतानाच मला जाणीव झाली की आपल्यामधे काही वेगळीच क्षमता आहे. ही जाणीव होण्यासाठी झालेल्या उशीरामुळे माझ्याकडून अनेक उत्तम संधींकडे दुर्लक्ष झालं परंतु त्यानंतर मात्र आलेल्या प्रत्येक संधीला आत्मविश्वासाने सामोरा गेलो". आज पालकही सजग झाले आहेत. मुलांचा बुध्द्यांक जाणून घेऊन, विविध चाचण्यांद्वारे कल समजून घेऊन तसेच मुलांची आवड लक्षांत घेऊन त्यांना स्वत:चे क्षेत्र निवडण्यासाठी मार्गदर्शन व मदत करण्याची भूमिका बहुतांश सुशिक्षित पालकवर्ग घेताना दिसतो. अशा पद्धतीने स्वत:च्या भवितव्याचा मार्ग ठरवणारे तरूण केवळ पैसे कमावण्यासाठी नव्हे तर ध्येयपूर्तीचा आनंद मिळवण्यासाठीही काॅर्पोरेट क्षेत्रामधे पुढे येतील हा मिलिंदला वाटणारा विश्वास!

शाळेत असताना आम्ही विद्यार्थी एकमेकांच्या उपद्रवी खोड्या करत असू. बाकांवर चिंगम लावणे व बसणार्याच्या पँटला चिंगम चिकटल्यावर त्याची टर उडवणे हा नित्याचा सर्वांच्याच बाबतीत घडणारा प्रकार होता. याचा त्या वर्ग मित्रालाच नव्हे तर घरी त्याच्या आईलाही पँट धुताना त्रास होत असेल या कल्पनेने मिलिंदने एक अभिनव मार्ग शोधला. वर्गमित्रांची टर उडवण्याचा आनंद मनमुराद घेता यावा व त्यातील उपद्रव काढून टाकावा हा त्यामागचा उद्देश! रफ वहीच्या कागदाच्या निरनिराळ्या आकाराच्या व वेगवेगळ्या प्रकारांच्या सुरनळ्या करून, वर्गातील मुलांच्या पँटला कमरपट्ट्यामधे, मागच्या खिशामधे वा काॅलरच्या पट्टीमधे त्यांच्या नकळत खोवून ठेवणे व त्याला तशा अवस्थेत खांद्यावर हात ठेवून सर्वत्र फिरवणे हा एक नवा प्रकार त्याने आम्हाला दाखवला. ह्या उद्योगाचे 'तोफा लावणे' असे नामकरणही त्याने करून टाकले. तोफा लावण्याचे हे 'इनोव्हेशन' आम्हा सार्याना खूपच आवडले आणी हा उद्योग अगदी शालेय जीवन संपेपर्यंत चांगलाच फोफावला. इनोव्हेशन बद्दल मिलिंदची मुळातच असलेली ओढ हीच त्याची आज मेरिको इनोव्हेशन फाऊंडेशनला वाहून घेण्यापाठची प्रेरणा असावी.
इयत्ता ८ वी मधे एकत्र आलेले आम्ही वर्ग-मित्रमैत्रिणी गेली ४० वर्षे आमची मैत्री एंजाॅय करतोय! ंएकत्र येतो, पिकनिक्सना जातो, एकमेकांचे आनंद सोहळे साजरे करतो, शाळेसाठी काही करण्याचा प्रयत्न करतो, शिक्षकांची कृतज्ञतापूर्वक आठवण ठेवतो याचं अनेकांना आश्चर्य वाटतं. परंतु या मागे असते ती आमची धडपड, हरवलेलं सुंदर बालपण शोधण्याची! इतरांसाठी काॅर्पोरेट क्षेत्रातील मराठी बिग बाॅस असलेला मेरिको चे चीफ फायनान्स अाॅफीसर मिलिंद सरवटेही या शोधयात्रेमधे सहभागी होतात, तोच मिस्किलपणा व खोडकरपणा घेऊन! मिलिंद आमचा मित्र असल्याचा अभिमान आहेच, परंतु एव्हढ्यावरच आम्ही समाधानी नाही कारण ही चीज काय आहे हे आम्हीच तर ओळखतो. मराठी असल्याचा सार्थ अभिमान बाळगणार्या व लालबाग-परळ या कामगार भागाची लाभलेली पार्श्वभूमी हेच आपले बलस्थान वा अॅसेट मानणार्या मिलिंदने आता काॅर्पोरेट क्षेत्रातील कर्तबगार मराठी बिग बाॅसेस् ची यादी वाढती रहावी या साठी प्रयत्नशील रहाणे आवश्यक आहे. इनोव्हेशनचा, अभिनव कल्पनांचा मागोवा घेणार्या व मराठी माणसाची मानसिकता व काॅर्पोरेट क्षेत्राची गरज ओळखून मराठी तरूणाना योग्य दिशा दाखवण्याची कळकळ असणार्या मिलिंद सरवटेंसारख्या सर्वच मराठी बिग बाॅसेसनी आता कंबर कसण्याची गरज आहे. म्हणूनच मिलिंद मित्रा, तू शाहरूख खानच्या शब्दांत म्हणतोस तसा "पिक्चर अभी बाकी है दोस्त" !