Friday, December 15, 2017

ती आई होती म्हणुनी

 ती आई होती म्हणुनी......
-अजित सावंत

अतुलची आई देवाघरी गेली. अतुलने हे सांगितलं अाणी माझ्या नजरेसमोर माझे बालपण व शाळेतल्या  दिवसातील आठवणी उभ्या राहिल्या. अतुल केंकरे माझा शाळेतील वर्गमित्र! त्याची आजी त्याच्या काकांसोबत मी रहात असलेल्या चाळीत रहात असे. अतुल शेजारच्या चाळीत रहात असला तरी आजीकडे येऊन तिथल्या मुलांसोबत तो जास्त रमत असे. म्हणूनच अतुलची व माझी मैत्री घट्ट होत गेली. अतुल व माझे स्वभाव टोकाचे वेगळे होते. अतुल शांत स्वभावाचा, बुध्दिबळ, कॅरम, क्रिकेट ह्या खेळांमधे रमणारा, वेळच्या वेळी गृहपाठ व अभ्यास मन लावून करणारा व कुणाच्या अध्यात ना मध्यात, अशा स्वभावाचा व म्हणून सर्वांनाच आवडत असे. माझा स्वभाव मात्र बराचसा मस्तीखोर, अभ्यासापासून फटकून राहून खोड्या करण्यातच आनंद घेणारा व बाॅक्सिंग हा धसमुसळेपणाचा आक्रमक खेळ सोडून इतर कोणत्याही खेळामधे फारसा रस नसणारा, असा अतुलच्या स्वभावाच्या विरुध्द टोकाचा होता. तरीही आमची मैत्री घट्ट होती व आजपर्यंत म्हणजे गेली ५० वर्षे तशीच जिवाभावाची राहिली. बालपणीच्या त्या दिवसांमधे, माझ्या शाळेतील 'उद्योगांमुळे' शाळेतील शिक्षक वर्ग त्रस्त असे. परंतु माझ्या खोड्या करण्याच्या व त्यातून नामानिराळा रहाण्याच्या माझ्या युक्त्याप्रयुक्त्यांचा आनंद माझे वर्गमित्र-मैत्रिणीही घेत असत. क्वचित प्रसंगी त्यांनाही माझ्या खोड्यांमुळे शिक्षकांकडून प्रसाद मिळे. पालकांना बोलावूनही घेतले जात असे. काही मित्रांच्या पालकांकडून माझ्यापासून दूर रहाण्याबाबत ताकीदही मिळे. अशा परिस्थितीत अतुल मात्र माझ्याशी मैत्री निभावून नेत माझा नेहमीच अपूर्ण रहाणारा अभ्यास पूर्ण करून घेण्यास मला जवळजवळ सक्ती करत असे. अतुलची आई मात्र माझे गुणदोष लक्षांत घेऊनही आमच्या मैत्रीच्या आड येत नसे. किंबहुना अतुलने व मी एकत्र अभ्यास करावा, एकमेकांना अभ्यासात मदत करावी असा तिचा कटाक्ष असे. अर्थात नियमित अभ्यास करणाऱ्या अतुलला मी काय मदत करणार कपाळ! परंतु मला अतुल रहात असलेल्या चाळीच्या प्रशस्त गच्चीत खेळायला जाण्याचे व शाळेतून परतल्यावर अतुलच्या घरी त्याच्या आईच्या हातचे खाणे ह्याचे मोठे आकर्षण असे. शाळा सुटली की मी घरी पोहोचल्यावर थोड्या वेळेतच शेजारच्या चाळीतून अतुल हाक देई. ती ऐकून माझ्या खोलीसमोर रहाणारी प्रेमळ रजनीकाकी 'अजिताक बोलय, अतुल आवाज देताहा' म्हणून निरोप देई. मी तसाच दप्तर टाकून अतुलच्या घराकडे धावत सुटे! अतुलच्या घरी पोहोचल्यावर, दहीवडे, इडली सांबार, डोसे, कांदेपोहे ह्या पैकी एखादा अतुलच्या आईने केलेला चविष्ट पदार्थ समोर येई. अतुलच्या घराला रस्त्याच्या दिशेला एक छोटी गॅलरी होती. तेथे बसून रस्त्यावरच्या गंमतीजमती पहात अतुल व मी ह्या पदार्थांचा आस्वाद घेत असू. अतुलची आई प्रेमाने आग्रह करकरून खाऊ घाली. माझ्या घरची आर्थिक स्थिती यथातथाच असल्याने व माझी आई नोकरी करीत असल्याने वेळेअभावी व आर्थिक चणचणीमुळे तिला जमेल तसे व झेपेल तसे आम्हां भावंडांचे खाण्यापिण्याचे लाड करण्याचा प्रयत्न करीत असे. परंतु काही चमचमीत व चविष्ट पदार्थांची ओळख अतुलच्या आईच्या हातच्या केलेल्या पदार्थांची चव चाखूनच होत असे. गच्चीत खेळून परत आल्यावर आम्ही अभ्यासाला सुरुवात करत असू. अतुलची बहिण अमिता जी अतुलपेक्षा मोठी व आमच्याच शाळेत आमच्या पुढच्या इयत्तेत होती, आमच्या अभ्यासावर देखरेख करत असे. कठीण असलेले गणित समजावून सोडवून देणे, संस्कृतचे व्याकरण व अनुवाद ह्याचीआमच्याकडून तयारी करून घेणे हे सारं ती तिचा स्वत:चा अभ्यास सांभाळून करत असे. अतुलच्या आईची तशी तिला शिकवणच होती. ती अभ्यास करून घेताना बऱ्याचदा अतुलचे लक्ष मात्र कुठल्या ना कुठल्या खेळाकडे लागलेले असे. कधी वर्तमानपत्रामधे दिलेल्या बुध्दीबळाच्या चाली पहात बुध्दीबळाचा डाव मांडून बसणे, तर मधेच मजल्यावरील चौकामधे कॅरमचा डाव मांडून बसलेल्या शेजारच्या मुलांसोबत एखाददुसरा डाव खेळणे, मधेच क्रिकेट वरच्या गप्पा रंगवणे ह्यांत अतुल जास्त रमत असे. आई त्याच्या मागावरच असे पण तो क्वचितच तिला दाद देत असे. माझा अभ्यास मात्र अमिता कसोशीने घेत असे. अभ्यासाची थोडीफार गोडी मला लागली  ती अशी अतुलच्या घरी अमितामुळे! आणी त्याचे श्रेय अतुलच्या आईचे! माझा एस एस सी परिक्षेचा अभ्यास असा अतुलसोबत व अमिताने घेतलेल्या परिश्रमांमुळे होत होता. परिक्षेचा निकाल लागला व मी चांगले मार्क्स मिळवून म्हणजे जवळजवळ फर्स्ट क्लासपर्यंत पोहोचून उत्तीर्ण झालो. अतुलही बऱ्यापैकी मार्क्स मिळवून पास झाला पण अतुलच्या घरी अतुलच्या आईला व अमिताला, अगदी गेल्या वर्षांपर्यंत ज्याच्या पास होण्याची बिलकुल शक्यता नव्हती, तो मी चांगल्या गुणांनी पास झाल्याचा मोठाच आनंद होता. अतुलच्या आईने अमिताकडून आमच्या अभ्यासासाठी करून घेतलेल्या मेहनतीचे ते फळ होते. अतुल व मी एकत्र अभ्यास करण्याच्या अतुलच्या आईच्या कल्पनेला मी प्रतिसाद दिला नसता तर मी  एसएससी तरी झालो असतो कां? हा प्रश्न आजही माझ्या मनांत रेंगाळत रहातो. 



आपल्या मुलांना, घरी आलेल्या पाहुण्यांना उत्तम स्वैंपाक करून आग्रहाने खाऊ घालणे ह्यामधे अतुलच्या आईला मोठाच आनंद मिळे. अतुलच्या वडिलाना वीकएंडच्या दिवशी आॅफीसमधील सहकारी मित्रमंडळी घरी जमवून गप्पांची मैफल जमविण्याची आवड होती! स्वैंपाक करताना त्या सर्व पाहुण्यांची आवड लक्षांत घेऊन त्यांचं योग्य आदरातिथ्य करताना अतुलच्या आईची त्या १० x २० च्या छोट्या खोलीमधे तारांबळ उडत असे. परंतु ती हसतमुखाने ही जबाबदारीही पार पाडत असे. पुढे अतुल व मी दोघेही शालांत परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर दोघांचेही मार्ग वेगळे झाले. अतुलच्या वडिलांनी परळची जागा सोडली व गोरेगांवला नवा प्रशस्त ब्लाॅक घेऊन तेथे रहायला जाण्याचा निर्णय घेतला. अतुलचे  कुटुंब गोरेगांवला रहायला गेले. त्याने गोरेगांवच्याच पाटकर महाविद्यालयामधे प्रवेश घेऊन सायन्सचा अभ्यास सुरू केला. मीही काॅमर्स घेऊन डाॅ आंबेडकर महाविद्यालयामधे प्रवेश घेतला. मार्ग वेगळे झाले, रोजचे भेटणे बंद झाले, एकत्र अभ्यास करणेही अशक्य झाले. परंतु अतुलच्या व माझ्या मैत्रीत खंड पडला नाही. वेळ मिळेल तसे अतुलचे परळला माझ्या घरी येणे व माझे गोरेगांवला त्याच्या घरी जाणे सुरू राहिले. पुढे मी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होण्याआधी निरनिराळ्या कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये फिरून स्टेशनरी पुरवठा करण्याचा छोटा व्यवसाय सुरू केला. अतुलने आपल्या वडिलांना म्हणजे दादांना सांगून त्यांच्या कार्यालयाला स्टेशनरी पुरविण्याचे काम मला मिळवून दिले. त्या काळामधे बहुराष्ट्रीय कंपनीच्या कार्यालयाला स्टेशनरी पुरविण्याचे काम मिळणे म्हणजे माझ्यासाठी लाॅटरीच होती.पुरविलेल्या वस्तूंच्या बिलाचे पैसे मला वेळेवर मिळावेत म्हणून दादा स्वत: लक्ष देत. पुढे अतुल बी एस्सी परिक्षा पास होऊन पदवीधर झाला. त्याने नोकरीचा शोध सुरू केला. तेंव्हा मी वरळीच्या कॅंम्पा कोला कंपनीला फिल्टर पेपरचा पुरवठा करीत असे. तेथील प्राॅडक्शन मॅनेजर माझ्या परिचयाचे झाले होते. त्यांना गळ घालून मी अतुलला नोकरीवर ठेवण्याची विनंती केली. त्यांनी अतुलला मुलाखतीसाठी बोलावले व लगेच नोकरीवर 'प्राॅडक्शन केमिस्ट' म्हणून ठेवूनही घेतले. नेहमीच माझ्यासाठी काही ना काही करणाऱ्या माझ्या ह्या मित्रासाठी मीही काही करू शकलो याचा मला खूपच आनंद झाला. एक चांगला प्रामाणिक व कष्टाळू कर्मचारी मिळवून दिल्याबद्दल प्राॅडक्शन मॅनेजरही माझ्यावर खुश झाले. अतुलच्या आईला तर माझे भारीच कौतुक वाटले. 


अतुलच्या आईचं नाव 'कुमुदिनी'! ती मूळची गोव्यातील पेडण्याची, पण जन्म मात्र मुंबईतील दादरचा! चार भाऊ व तीन बहिणींपैकी एक! चारही भाऊ चांगलेच शिकून आपआपल्या क्षेत्रात व आयुष्यातही स्थिरस्थावर! बहिणीही चांगल्या घरी सुखात! ह्या साऱ्या भावंडांमधले व त्यांच्या मुलांमधेही ऋणानुबंध अगदी घट्ट! अतुलच्या आईचा ह्यामधे मोठा वाटा व भावंडांचेही तिच्यावर प्रेम! अतुलचे वडिल हे एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये आॅफीसर असल्याने कुटुंब तसे संपन्न! अतुलची आई ह्या पार्श्वभूमीवर तशी सामान्य गृहिणी! परंतु घराकडे, कुटुंबाकडे, मुलांकडे व नातेवाईकांकडेही तिचे लक्ष असे. आल्यागेल्याची आस्थेने विचारपूस करणे, यशाचे कौतुक करणे व नातेसंबंध जोपासत रहाणे हा तिचा स्वभाव होता. गोव्यातील मंगेशी व महालक्ष्मी ह्या देवस्थानांवर तिची अपार श्रध्दा! आयुष्यात दोन मोठे धक्के तिला पचवावे लागले. अतुलच्या वडिलांचे दादांचे १९८५ साली अकाली निधन झाले. अतुल तर तेंव्हा पंचविशीत होता. दु:ख बाजूस ठेवून अतुलच्या आईने दोन्ही मुलांना धीर देत कुटुंब सावरले. दोन्ही मुले अतुल व अमिता आपल्या संसारात आईच्या छायेत सुखाने वाटचाल करीत असतानाच अमिताला आजारपण आले व त्यातच भरल्या संसारातून एक मुलगा व पतीला मागे ठेवून ती निघून गेली. हा मोठाच धक्का होता. तोही तिने पचवला. अतुलच्या व अमिताच्या मुलांमधे आपल्या दोन्ही नातवंडांमधे आपले मन रमवित ती आयुष्य जगू लागली. टीव्ही वरील बातम्या, मालिका ह्या बरोबरच राजकीय चर्चात्मक कार्यक्रम ती आवडीने पहात असे. माझा सहभाग असलेला चर्चा कार्यक्रम ती आवर्जून पहात असे. कधीतरी माझी  परखड मते ऐकून तिला चिंताही वाटत असे. 'तुला भीती नाही कां वाटत?' तिने मला एकदा विचारलेही होते. अलिकडे तिला वयोपरत्वे होणाऱ्या आजारांनी ग्रासले. अतुल व त्याची पत्नी अनुजाने तिची खूप सेवा शुश्रुषा केली. तिच्या आजारपणाच्या काळात ती माणसांची नावे विसरत होती. तिला जवळच्या माणसांची ओळखही पटत नव्हती. परंतु मी तिला भेटायला गेल्यावर माझ्याकडे निरखून पहात मिनिटभर गेल्यावर तिने मला ओळखून मला हाकही मारली. माझ्यावर तिने केलेल्या मायेचे ते प्रतिकच होते जणू ! ह्या आजारपणातच तिने अन्नपाणी वर्ज्य केले व वयाच्या ८३व्या वर्षी अत्यंत शांतपणे झोपेतच जगाचा निरोप घेतला. 

अतुलची आई ही केवळ त्याचीच आई नव्हती तर मलाही आईसमान होती. तिने दिलेले प्रेम व माया विसरता येणार नाही. आयुष्याच्या विविध टप्प्यांवर अशी काही माणसे भेटतात व जीवनाला वेगळेच वळण देतात. पुढच्या जीवनमार्गाची दिशा नक्की करतात. माझी घसरत चाललेली गाडी शालांत परिक्षेच्या टप्प्यावरच सावरून मला अभ्यासाकडे वळवणारी अतुलची आई अशा माणसांपैकीच एक!
म्हणूनच तिला अश्रूपूर्ण नयनांनी श्रध्दांजली वाहताना कविवर्य ग्रेस ह्यांचे हे शब्द ओठांवर येतात -

'ती आई होती म्हणुनी'
घनव्याकुळ मीही रडलो'


Saturday, November 18, 2017

.....अन् मी इंदिरा 'भक्त' झालो!


इंदिरा गांधींच्या ह्या जन्मशताब्दी वर्षामधे मागे वळून पहात मी स्वत:लाच प्रश्न विचारतोय की मी इंदिरा भक्त कां व कसा झालो? तसे पहाता बालपणापासून माझ्यावर संस्कार होत होते ते डाव्या विचारांचे! घरी येणे जाणे असलेल्या कम्युनिस्ट नेत्यांच्या चर्चांमधून, भांडवलदारांचा पाठीराख्या काॅंग्रेसच्या कडवट विरोधाचे प्रतिबिंब पडत असे. काॅंग्रेस म्हणजे गरीबीला जबाबदार असलेला पक्ष अशी माझीही धारणा होऊ लागली होती. अचानक संस्थानिकांची तनखा बंदी, बॅंकांचे राष्ट्रीयीकरण, इंदिरा गांधींचा काँग्रेसमधील बड्या धेंडांशी सुरू झालेला संघर्ष, इंडिकेट व सिंडीकेट अशी काॅंग्रेसची विभागणी, अशा घटना एका पाठोपाठ एक आकार घेऊ लागल्या. इंदिरा गांधींची पुरोगामी व समाजवादी धोरणे ह्या मुळे काॅंग्रेस विरोध हाच राजकारणाचा पाया असलेल्या समाजवाद्यांसह कम्युनिस्ट मंडळीही प्रभावित होऊ लागली. हा बदल मला जाणवत असे.  

'वो कहते है इंदिरा हटाव, मैं कहती हूॅं गरीबी हटाव' असे म्हणत इंदिरा गांधी बहुमत मिळवून सत्तेवर आल्या. गरिबांच्या कल्याणाच्या योजना आखणाऱ्या इंदिरा गांधीनी जनतेच्या मनामधे स्थान निर्माण केले. आम्हां शाळकरी मुलांच्या मनामधेही इंदिराजींबद्दल आदरभाव निर्माण होऊ लागला. एव्हढ्यांतच पूर्व पाकिस्तानमधे पाकिस्तानी लष्करशहानी पूर्व बंगालमधील जनतेवर केलेल्या अत्याचारांनी जनता होरपळून निघाली. इंदिरा गांधीनी पूर्व पाकिस्तानमधील जनतेच्या लढ्याला पाठींबा देऊन भारतीय फौजाना पूर्व पाकिस्तानमधे पाठवण्याचा निर्णय घेतला. युध्दाला तोंड फुटले. अमेरिकेच्या सातवे आरमार पाठवून युध्दामधे हस्तक्षेप करण्याच्या प्रयत्नांनी जराही विचलित न होता इंदिरा गांधीनी भारतीय फौजांची आगेकूच सुरूच ठेवली. १६ डिसेंबर १९७१ ह्या दिवशी पाकिस्तानी सैन्याने भारतीय फौजांसमोर शरणागती पत्करली. बलशाली भारताचे दर्शन जगाला घडविणाऱ्या कणखर व धैर्यशील नेत्या इंदिरा गांधी जनतेच्या गळ्यातील ताईत झाल्या.विरोधी पक्षाचे नेते अटलबिहारी वाजपेयी ह्यांनी देखिल इंदिराजींचा उल्लेख 'दुर्गा' असा करून त्यांच्या हिंमतीची दाद दिली. आम्हां मुलांमधेही पाकिस्तानला अद्दल घडविणाऱ्या इंदिराजींविषयी आपुलकीची भावना निर्माण झाली.

इंदिरा गांधी १९७४ साली अशा लोकप्रियतेच्या शिखरावर असताना, आंदोलने सुरू झाली. गुजरात व बिहारमधे विद्यार्थ्यांनी सरकारविरूध्द रणशिंग फुंकले. जयप्रकाश नारायण ह्यांनीआंदोलन दडपू पहाणाऱ्या इंदिरा गांधी सरकार विरूध्द 'संपूर्ण क्रांती' चा नारा देत आंदोलनाचा रोख दिल्लीकडे वळवला. जयप्रकाशांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष संघटित होऊ लागले. जाॅर्ज फर्नांडिस ह्यांनी रेल्वेचा देशव्यापी संप पुकारला. ही आंदोलने व संप दडपशाहीच्यी मार्गाने मोडून काढू पहाणाऱ्या इंदिरा सरकारविरोधात वातावरण तापू लागले. मी एव्हाना तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेला महाविद्यालयीन विद्यार्थी झालो होतो. विद्यार्थ्यांमधे इंदिरा गांधींच्या विरोधात विद्यार्थीद्वेष्ट्या असल्याबद्दल संताप व्यक्त होऊ लागला होता. ह्या संताप यात्रेमधे मीही  सहभागी झालो. इतक्यातच, इंदिरा गांधीनी निवडणुकीत अवैध मार्गाचा अवलंब केल्याचा ठपका ठेवत दि. १२ जून १९७५ रोजी अलाहाबाद न्यायालयाने  त्यांना सहा वर्षे कोणत्याही संसदीय पदावर रहाण्यास मनाई करणारा आदेश दिला. इंदिरा गांधींच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर पकडला. २५ जून १९७५ रोजी दिल्लीमधे जाहीर सभेमधे जयप्रकाश नारायण ह्यांनी इंदिरा गांधींच्या राजीनाम्याची मागणी करतानाच पोलीस, लष्कर व सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारचे आदेश धुडकावण्याचे आवाहन केले. इंदिरा गांधीनी ह्याची गंभीर दखल घेत दुसऱ्याच दिवशी आणीबाणी जाहीर केली. विरोधी पक्षाच्या नेत्यांसह आणीबाणीला विरोध करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांनी तुरुंग भरून गेले. प्रसार माध्यमांवर बंधने लादून त्यांची मुस्कटदाबी करण्यांत येऊ लागली. दिल्लीतील तुर्कमान गेट परिसरामधे संजय गांधींच्या सूचनेवरून शेकडो झोपड्यांवर बुलडोझर फिरवून त्या जमीनदोस्त करण्यांत आल्या. सरकारी कार्यालयांमध्ये शिस्तिचा अतिरेक होऊ लागला. नसबंदी कार्यक्रमामधे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी केलेल्या अत्याचारांच्या कहाण्यांनी लोकांमधे सरकारविषयी तिरस्काराची भावना निर्माण झाली. आणीबाणी लादणाऱ्या इंदिरा गांधीविषयीचा माझा उरलासुरला आदर संपुष्टांत येऊ लागला. मार्च १९७७ मधे अनपेक्षितरीत्या इंदिरा गांधीनी आणीबाणी उठवून निवडणुका घेण्याची घोषणा केली. हुकूमशहा इंदिरा गांधी आणीबाणी लादून सत्ता आपल्या हाती कायम ठेवण्यासाठी लोकशाहीचा गळा घोटत आहेत असा प्रचार करणारे विरोधी पक्षही चकित झाले. ह्या धक्क्यातून सावरत कम्युनिस्ट वगळता विरोधी पक्ष जयप्रकाश नारायण ह्यांच्या नेतृत्वाखाली एकत्र झाले. जनता पक्षाची स्थापना झाली. जनता पक्षाला देशभर सर्व थरातून जनतेचा पाठिंबा मिळू लागला. मीही मित्रांसमवेत जनता पक्षाच्या सभांना उत्साहाने जाऊ लागलो. निवडणुका झाल्या. इंदिरा गांधींना व काॅंग्रेसला जनतेने सपशेल नाकारून जनता पक्षाला विजयी केले. खरीखुरी लोकशाही प्रस्थापित झाल्याचा आनंद मलाही झाला. जनता पक्षाचे सरकार मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखाली स्थापन झाले. परंत जनतेच्या आशा आकांक्षांच्या पूर्ततेकडे लक्ष देण्याऐवजी इंदिरा गांधींविरूध्द सूडबुध्दीने कारवाया करणे हेच उद्दिष्ट असल्याचे दिसू लागले. अशातच सूडाने पेटलेल्या नेत्यांनी इंदिरा गांधीना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्याचा आततायी निर्णय घेतला.अटकेतील इंदिरा गांधींविषयी जनतेमधे सहानुभूतीची भावना निर्माण झाली व जनता पक्षाच्या नेत्यांविषयी चीड! काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी देशभर ह्या अटकेच्या निषेधार्थ निदर्शने केली व लोकही त्यामधे उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. इंदिरा गांधी ह्यांना झालेली अटक न आवडल्याने आम्हीही ह्या निदर्शनांमधे सहभागी होऊ लागलो. जानेवारी १९७८ मधे इंदिरा गांधीनी काॅंग्रेस (आय) पक्षाची स्थापना केली व लगेचच फेब्रुवारी मधे झालेल्या कर्नाटक व आंध्र मधील विधानसभा निवडणुकांमधे जनता पक्षाला धूळ चारत विजय मिळवला. इंदिरा गांधींना लोक  पुन्हा स्वीकारीत असल्याची ही पावती होती. इंदिरा गांधींची विजयी घोडदौड आम्हां तरूणांना व विद्यार्थ्यांना प्रभावित करू लागली होती. मुसळधार पावसातून कधी जीपने, कधी ट्रॅक्टरने प्रवास करीत तर मध्येच वाहन बंद पडल्यावर चिखलातून, कंबरेपर्यंत पाण्यातून वाट काढीत, शेवटी हत्तीवर बसून बिहारमधील दलित हत्याकांड झालेल्या बेलचीतील दलितांचे अश्रू पुसणाऱ्या इंदिराजीनी आमच्यावरच नव्हे तर लाखो देशवासीयांवर आपल्या धैर्यशील स्वभावाने गारूड केले होते.

१९७९ मधे मोरारजी देसाईंचे जनता सरकार पायउतार झाले.चौधरी चरणसिंग ह्यांचे सरकारही  टिकू शकले नाही. जानेवारी १९८० मधे लोकसभेच्या निवडणुका झाल्या. जनतेने संधी देऊनही सरकार चालवू न शकलेल्या अकार्यक्षम व भांडखोर नेत्यांना विटलेल्या भारतीय जनतेने इंदिरा गांधींच्या नेतृत्वावर पसंतीचे शिक्कामोर्तब करीत त्यांच्या काॅंग्रेस ( आय) पक्षाला बहुमत देऊन निवडून दिले. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाचे आकर्षण पुन्हा एकदा आम्हां तरुणांना वाटू लागले.
 
त्याच सुमारास पंजाबमध्ये फुटीरतावादी शक्तींनी डोके वर काढण्यास सुरूवात केली. जर्नेलसिंग भिंद्रनवाले ह्या संताने स्वतंत्र खलिस्तानची मागणी करून हिंसक कारवायांना चिथावणी दिली. हिंसेचा आगडोंब उसळला. ज्येष्ठ पत्रकार, पोलीस अधिकारी तसेच निरंकारी पंथाचे अनुयायी ह्यांच्या खुले आम हत्या होऊ लागल्या. अमृतसरच्या पवित्र सुवर्ण मंदीरामध्ये तळ ठोकून बसलेल्या भिंद्रनवाले व त्यांच्या सशस्त्र अनुयायांकडून अतिरेकी कारवायांची सूत्रे हलत व स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीला बळ दिले जाई. देशभर दहशतीचे वातावरण निर्माण झाले. पंजाबमधे वेळीच अतिरेक्यांना ठेचून काढणारा निर्णय घेण्याचे धैर्य व हिंमत  इंदिरा गांधींपाशी आहे याची मला खात्री होती. पंजाबला देशातून फुटून जाण्याच्या शक्यतेपासून वाचवायचे असेल तर कठोर धाडसी निर्णय घ्यावे लागतील याची खूणगाठ मनाशी बांधून इंदिरा गांधीनी लष्करी अधिकाऱ्यांशी  सुवर्ण मंदीरामध्ये लष्कर घुसवून तेथे ठाण मांडून बसलेल्या भिंद्रनवाले व त्यांच्या सशस्त्र अतिरेकी अनुयायांना हुसकावून लावण्यासंबंधी विचार विनिमय केला. असे करणे भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागणारे ठरेल असा सल्ला पंतप्रधान  इंदिरा गांधीना देण्यात आला. वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल पण देश एकसंघ ठेवण्यासाठी ही कारवाई करावीच लागेल असे सांगून इंदिरा गांधीनी लष्कराला सुवर्ण मंदीरामध्ये 'आॅपरेशन ब्ल्यू स्टार' ह्या कारवाईचे आदेश दिले. ह्या कारवाईत सशस्त्र प्रतिकार करणारे भिंद्रनवाले व त्यांचे अनेक अनुयायी ठार झाले. सुवर्ण मंदिराच्या भिंती रक्ताने माखल्या. पवित्र तख्ताचेही नुकसान झाले. शीख समुदायामधे संतापाची लाट उसळली. याची किंमत मोजावी लागणार होती ह्याची इंदिराजींना  कल्पनाही होती. ३१आॅक्टोबर,१९८४ रोजी इंदिरा गांधींच्या सुरक्षा व्यवस्थेतील शीख सुरक्षा रक्षकांनी गोळ्यांचा वर्षाव करून इंदिराजींची हत्या केली. इंदिराजीनी देशाच्या एकात्मतेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होत. ह्या धक्क्यातून सावरणे मला फारच अवघड गेले. काही दिवस आधीच सुरक्षा यंत्रणांनी सुरक्षा व्यवस्थेतील शीख सुरक्षा रक्षकाना वगळण्याचा निर्णय घेतला होता. परंतु धर्मनिरपेक्षता हे जीवनमूल्य मानणाऱ्या इंदिराजीनी 'आपण सेक्युलर नाही आहोत का?' असा प्रश्न विचारून हा निर्णय बदलला. इंदिराजींची धर्मनिरपेक्षतेवरची ही निष्ठा माझ्या मनावर ठसा उमटवणारी ठरली. भुवनेश्वर येथे इंदिराजीनी केलेल्या अखेरच्या भाषणातील काळजाचा ठाव घेणारे शब्द " देश सेवेमधे मला मृत्यू जरी आला तरी माझ्या शरीरातील रक्ताचा एक एक थेंब देशाला बलशाली बनवेल" माझ्या कानामधे गुंजत राहू लागले. कालपरवापर्यंत इंदिराजींवर कधी प्रेम करणारा तर कधी त्यांचा तिरस्कार करणारा मी इंदिराजींचा भक्त झालो. इंदिराजींच्या विचारांशी पक्की बांधिलकी ठेवून राजकारणामधे सक्रीय होण्याचा माझा निर्णय झाला. इंदिराजींना माझी हीच खरी श्रध्दांजली होती. वयाच्या पंचविशीमधे असा मोठा बदल जीवनामधे झाल्यावर मी इंदिराजींच्या जीवनाचा व त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा अधिक सखोल मागोवा घेण्यास सुरुवात केली. इंदिराजीनी राबवलेले अणुशक्ती कार्यक्रम व धोरण, हरित क्रांती योजना, सिक्किमचे सामीलीकरण, केलेले पर्यावरण विषयक कायदे, रशियाशी मैत्रीचे नाते जोडण्याची भूमिका हे पहाता इंदिराजींची विविध रुपे माझ्या समोर आली. इंदिराजी ह्या केवळ राजकीय नेत्या नव्हत्या तर त्या एक बहुआयामी व्यक्तीमत्व होत्या ह्याची खात्री पटत गेली. इंदिराजींविषयी माझ्या मनामधे अढी निर्माण करणारी आणीबाणी कशासाठी होती हे सखोल वाचन व अनेक मान्यवरांशी चर्चा केल्यावर उलगडत गेले. विरोधी पक्षांना फूस लावून भारतामधे अस्थिरता माजवण्याचा साम्राज्यवादी शक्तींचा डाव उधळून लावण्यासाठी इंदिराजीनी अपरिहार्यता म्हणून हा निर्णय घेतल्याची खात्री पटत गेली. इंदिराजी हुकूमशहा होत्या का? याचे उत्तर ठामपणे नाही असेच द्यावे लागेल कारण त्या हुकूमशाही प्रवृत्तीच्या सत्तालोलुप नेत्या असत्या तर आपल्या विरोधात प्रचंड जनक्षोभ आहे याची जाणीव असतानाही आणीबाणी उठवून निवडणुका घेण्याचा निर्णयच त्यांनी घेतला नसता. इंदिराजींच्या राजकारणाचे व व्यक्तीमत्वाचे पदर जसजसे उलगडले जाऊ लागले तसतसा मी इंदिराजींच्या विचारांशी अधिकाधिक निष्ठावंत होत इंदिराजींचा केवळ चाहताच नव्हे तर 'भक्त' झालो तो आयुष्यभरासाठी !


अजित सावंत

Sunday, October 1, 2017

इमानदारीचे उरत नाही तिथे बेईमानीचे किती दिवस पुरणार?

मंत्रालयामधे कामगार मंत्र्यांसोबत आयटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी गेले होतो. मंत्री महोदयांना येण्यास थोडा वेळ लागणार होता म्हणून त्यांच्या कार्यालयाबाहेर प्रतीक्षाकक्षात बसलो. मोबाईलवर वाॅट्स अॅप संदेश, युट्यूब  व फेसबुक चाळण्याचा चाळा करीत वेळ घालवावा ह्या हेतूने! मधेच प्रसाधनगृहात थोडे ताजतवाने होऊन येण्यासाठी उठलो. प्रसाधनगृहामधे केस विंचरण्यासाठी कंगवा काढण्यास पॅंटच्या मागील खिशामधे हात घातला व त्याच खिशात ठेवलेले पाकीट तेथे नसल्याचे माझ्या लक्षांत आले. येताना तर पाकीट सोबत होते व त्यातील ओळखपत्र मी प्रवेशद्वारावर दाखवलेही होते. येण्याजाण्याच्या मार्गावर, प्रवेशद्वाराजवळ, सुरक्षा नियंत्रण कक्षामधे व हाऊस किपिंग कर्मचाऱ्यांना कुणा अभ्यागतास पाकीट मिळाल्याबात व त्याने ते कुणाकडे सोपवले आहे कां याची चौकशी करून झाली. पाकीट मिळत नाही हे पाहून माझे धाबे दणाणले. पाकीटात बऱ्यापैकी रक्कम होती पण त्याचबरोबर क्रेडिट व डेबिट कार्डे, विविध ओळखपत्रे, वाहन चालक परवाना आदि महत्त्वाच्या वस्तू असल्याने अधिक चिंता होती. बॅंकाना कळवून कार्डांवरील व्यवहार थांबविण्याच्या सूचना दिल्या. आता पुन्हा ती कार्ड कार्यान्वित करणे, हरवलेली ओळखपत्रे नव्याने मिळवणे हा मोठा व्यापच पाठीशी लागणार होता. चिंताग्रस्त होऊन मार्गिकेमधे उभा असतानाच, एक तरुण व्यक्ती लगबगीने माझ्यापाशी आली. साधासाच पेहराव व हाती कागदपत्रे ठरवण्यासाठी असलेली पिशवी, अशा त्या व्यक्तीने तुम्ही अजित सावंत कां? असा प्रश्न केला. 'साहेब तुमचे पाकीट मला मिळाले आहे. मी ते घेऊन येतो. तुम्ही येथेच थांबा' असे सांगून तो निघूनही गेला. थोड्या वेळाने तो परतला ते पाकीट घेऊनच! माझा जीव भांड्यात पडला. क्षणातच माझ्या डोक्यावरचे चिंतेचे ओझे दूर झाले. 'साहेब, हे पाकीट मला प्रतिक्षाकक्षाजवळ काॅरिडाॅरमधे मिळाले. मी पाकीटातल्या ओळखपत्रावरचा फोटो पाहिला व तुम्हाला ओळखले. मी तुम्हाला गेला तासभर शोधतोय.  माझे नाव मनोज राठोड! मी आमदार हरिभाऊ राठोडांसोबत असतो व त्यांच्याकडे गावांहून येणाऱ्यांची मंत्रालयातील कामे करण्यासाठी मदत करतो' त्यांने सांगितले. मी त्याचे मनापासून आभार मानले व विचारले 'तुम्ही मंत्रालयातच नोकरी करता कां?' हलकेच हसून त्या तरूण माणसाने आपण नोकरीस नसून ज्यांना मदत करतो ते काहीबाही देतात व  तेच आपले चरितार्थ चालविण्यास पुरेसे असते असे समाधानाने सांगितले. मनोजची आर्थिक स्थिती साधारण असल्याचे एव्हाना मला स्पष्ट झालेच होते. पाकिटातले सर्व काही जागच्याजागेवर होते. 'मनोज पाकिटामधे चांगलीच रक्कम असताना तुला मोह कसा रे नाही झाला?' मी मनोजला खांद्यावर हात ठेवत विचारले. *'साहेब, इमानदारीने कमावलेले जगताना जवळ नाही उरणार तर बेईमानीने मिळालेले किती दिवस पुरणार?'* भ्रष्टाचाराच्या सुरस कहाण्या ज्या मंत्रालयाच्या काॅरिडाॅर मधे अनेकदा ऐकायला मिळाल्या तेथेच प्रामाणिक मनोजने  त्याच्या साध्या निर्मळ भाषेत इमानदारीचे तत्वज्ञान समोर ठेवले होते. आपल्या कष्टाची रोजीरोटी कमावणाऱ्या मनोजच्या चेहऱ्यावर त्याचा अभिमान विलसत होता. मनोजला व त्याच्या इमानदारीने जगण्याच्या विचाराला मी मनोमन सलाम ठोकला. मनोजला मी कृतज्ञतापूर्वक काही बक्षिस देऊ केले. ते स्वीकारण्यास नकार देणाऱ्या मनोजच्या हाती बक्षिस कोंबून मी म्हणालो 'मनोज तुझ्या इमानदारीची दिलेली ही दाद आहे'. 'इमानदारीने कमावलेले जगताना जवळ नाही उरणार तर बेईमानीने मिळालेले किती दिवस पुरणार? मनोजचे हे विचार मंत्रालयाच्या भिंतीभिंतीवर, लिहून फ्रेम करून लावावेत असे माझ्या मनात येत असतानाच हसतमुख मनोजने माझा निरोप घेतला.

Friday, May 5, 2017

१ मे संघर्षाचा स्मरण दिन हा कंत्राटी सफाई कामगारांचा विजय दिन!

१ मे कामगार दिनाच्या परळ येथील कामगार मैदानातील अनेक कामगार मेळाव्यांना मी अगदी १० वर्षांचा असतानासुध्दा माझे वडील काॅ पी जी सावंत ह्यांच्यासोबत उपस्थित रहात असे. वातावरण भारलेले असे. मैदानावर सर्वत्र लाल बावटे व व्यासपीठासमोर डौलाने फडकणारा लाल झेंडा उपस्थित कामगारांमधे चैतन्य निर्माण करत असे. 'जगातील कामगारांनो एक व्हा', 'लाल बावटे की जय', 'कामगार एकजुटीचा विजय असो' ह्या घोषणांनी आसमंत निनादून जाई. डोक्यावर लाल टोपी व दंडाला लाल पट्टी बांधलेले तरूण कामगारांचे पथक 'रेड गार्डस्' सभेची चोख व्यवस्था व बंदोबस्तही ठेवत असे. शेकडोंच्या संख्येने कामगार हातामधे लाल झेंडे घोषणा देत सभेला येत.कालांतराने मुंबईमधे शिवसेनेचा उदय झाला व कम्युनिस्ट व सेनेमधे संघर्ष सुरू झाला. मुंबईतील कामगार चळवळ व पर्यायाने कम्युनिस्टांचे वर्चस्व मोडून काढण्याचा डाव सत्ताधाऱ्यांनी सेनेला हाताशी धरून रचला. सेनेकडे तरुणांचा ओघ वाढत चालला तसतसा कम्युनिस्ट चळवळीचा प्रभावही ओसरू लागला. संपफोड्या सेनेने अनेक कारखान्यातील डाव्या कामगार संघटना सरकारी आशीर्वादाने मोडीत काढून आपले वर्चस्व प्रस्थापित केले. पुढे १९८२ साली झालेल्या गिरणी संपाचे पर्यवसान सरकार व मान्यताप्राप्त कामगार संघटना आणी मालकवर्ग ह्यांच्या हातमिळवणीमुळे गिरण्या बंद होण्यांत झाले. हजारो गिरणी कामगार बेकार झाले व देशोधडीला लागले. नंतरच्या काळात जमिनीला येत असलेली सोन्याची किंमत पाहून उद्योगपतीनी धडाधड कारखाने बंद पाडून कारखान्यांच्या जमिनी विकून आपले उखळ पांढरे करण्यास सुरूवात केली. परिणामी मुंबईतील कामगारवर्ग हळूहळू मुंबईबाहेर फेकला जाऊ लागला. कामगार चळवळही क्षीण झाली. मे दिनाच्या भव्य मिरवणुका व कामगारांच्या मेळाव्यांना कामगारांच्या तुरळक उपस्थितीने ओहोटी लागली. ह्या पार्श्वभूमीवर आज १ मे कामगार दिनानिमित्त 'कचरा वाहतूक श्रमिक संघाने' २७०० कंत्राटी सफाई कामगारांना मुंबई महापालिकेच्या नोकरीत कायम करून सर्व लाभ देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून मिळविल्यानिमित्त विजय मेळावा आयोजित केला होता. ह्या विजय मेळाव्यामधे ज्येष्ठ कामगार नेते काॅ यशवंत चव्हाण, काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांच्यासह डाव्या चळवळीतील अनेक नेते उपस्थित होते. कालपरवापर्यंत किमान वेतन व अन्य सुविधांपासून वंचित २७०० कामगारांना पालिकेच्या नोकरीत कायम होण्याचा निर्णय झाल्याने कामगारांच्या उत्साहाला उधाण आले होते. १२ वर्षांच्या संघर्षातून, काॅ मिलिंद रानडे, काॅ विजय दळवी, काॅ दिपक भालेराव ह्यांच्या नेतृत्वाखाली कंत्राटी सफाई कामगारांनी मिळविलेला हा विजय अलिकडच्या काळामधे ढेपाळत चाललेल्या कामगार चळवळीने मिळवलेला मोठा विजय आहे. शोषणाच्या वरवंट्याखाली पिचलेल्या, देशातील तमाम कंत्राटी कामगारांना हा विजय संघर्षाची प्रेरणा देईल व खऱ्या अर्थाने पथदर्शी ठरेल. ह्या विजय मेळाव्यामुळे अनेक वर्षांमधे प्रथमच १ मे कामगार दिन हा एका वेगळ्या उत्साहात साजरा झाला. पुन्हा एकदा मन आश्वस्त झाले. शोषणकर्त्यांशी संघर्ष करून कामगारांना यश मिळवता येते. कानांमधे घोषणा गुंजत राहिल्या 'कामगार एकजुटीचा विजय असो!'

Tuesday, January 3, 2017

हे गड, ते गड व मावळ्यांचा गनिमी कावा

मुंबईतील शिवाजी पार्क मधे देखिल मुख्य प्रवेशद्वारावर,सेना भवनकडे तोंड करून राम गणेश गडकरींचा पुतळा बसविण्यांत आला होता. पुढे अचानक गडकरी पुतळ्याची रवानगी आज गडकरी चौक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चौकात झाली. कशासाठी कोण जाणे? पुतळा अगदी थेट सेना भवनासमोर बसवला गेला. शिवाजीमहाराजांच्या मावळ्यांना प्रथम शिवाजी पार्क येथे व नंतर सेना भवनासमोर पुतळा बसवताना गडकरींच्या पुतळ्याचे वावडे नव्हते व आज ही नाही. गडकरी सुध्दा येथून तिथे विनातक्रार आले. मग ५५ वर्षे पुण्यांतील संभाजीराजे उद्यानात असलेल्या गडकरींच्या पुतळ्याबाबत मात्र आज संभाजीराजांच्या शिपायांचा राग कां बरे उफाळून यावा बरे? ह्या मावळ्यांची व शिपायांची भक्ती व राग कधी कुठे उफाळून येतो हे स्वत: राजेच जाणोत! निवडणुकांचे नगारे वाजू लागलेत महाराज...