Monday, May 21, 2018

तेरे आने की जब खबर महके....

गाणं मनातलं 

तेरे आने की जब खबर महके.....

गझल म्हणजे वेदनेचं गाणं! पण मनाला सुगंधित करणारी एक गझल मनांत रेंगाळत रहाते. तेरे आने की जब खबर महके, तेरी खुशबू से सारा घर महके ह्या गझल सम्राट जगजितसिंग ह्यांच्या आवाजातील सूर कानावर पडताक्षणी, रम्य स्मृतींशी जुळलेले सुगंध सभोवताली रुंजी घालू लागतात. रानडे रोडवरून दादर चौपाटीकडे जाताना नाक्यावर तेंव्हाच्या प्रेयसीसाठी आजच्या पत्नीसाठी घेतलेल्या मोगऱ्याच्या गजऱ्याचा सुवास दरवळू लागतो

शाम महके तेरे तसव्वुर से 
शाम के बाद फिर सहर महके

ह्या ओळीतील तसव्वुर शब्द अगदी रोमॅंटीक! तसव्वुर म्हणजे कल्पनारम्य! इथे तर अनेक क्षण कल्पनेपलिकडेही आनंद देणारेसमुद्रकिनारीच्या संध्याकाळचे असे क्षण पुन्हा ओंजळीत येऊन पडतात रातराणीच्या मांडवाखालचा सुगंध होऊन

रातभर सोचता रहा तुझ को
जहन दिल मेरे रातभर महके’ 

रात्रभर तुझा विचार करीत राहीलो अन् मनामधे सुगंध दरवळत राहीला ह्या शब्दांमधून  संध्याकाळ उलटून रात्री घरी परतताना तिने दिलेली रात्री उशाशी ठेवलेली चार सोनचाफ्याची फुले आठवतात

याद आए तो दिल मुनव्वर हो
दीद हो जाए तो नजर महके’ 
मुनव्वर म्हणजे प्रकाशमान! तिच्या नुसत्या आठवणीने मन उजळून निघतं नजरानजर झाली तर मग काय नजरच सुगंधित होते. ह्या किंवा 

वो घडी दो घडी जहाॅं बैठे
वो जमीं महके वो शजर महके’ 

ह्या ओळी तर अत्युच्च प्रेमाची साक्ष देणाऱ्या


जगजित सिंग ह्यांनीसहरह्या संग्रहासाठी २००० साली गायलेले हे गीत संगीतबध्द करताना जगजित ह्यांनी गीतकार नवाज देवबंदी ह्यांनी व्यक्त केलेल्या भावनांना योग्य न्याय दिला आहे. तू, तुझं असणं तुझी आठवण म्हणजे सुगंधाचं दरवळणं ह्या कल्पनेवर आधारित हे गाणं पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटतं ते ऐकताना दरवळणाऱ्या स्मृती-सुगंधामुळे!

No comments:

Post a Comment