Monday, May 21, 2018

मैत्री-बंध

हे बंध रेशमाचे....
  •  

१९७५ ही आमची परळच्या आर् एम भट हायस्कूल मधील बॅच! १६ मुली २६ मुले असा आमचा वर्ग होता. लवकरच हा वर्ग  ‘व्रात्य  मुलामुलींचाम्हणून ओळखला जाऊ लागला. पण त्यासोबतच शिक्षकांच्या लेखी, आज, अर्थतज्ञ म्हणून ओळखला जाणारा मिलिंद सरवटे, पहिल्या क्रमांकासांठी त्याच्याशी स्पर्धा करणारा शामसुंदर सामंत,पुढे चार्टर्ड अकाऊंटंट झालेला श्रीकृष्ण आगरकर, आयटी क्षेत्रातील नामवंत वत्सला साखळकर, प्रवास वर्णनकार म्हणून प्रसिध्द मेधा कोठुरकर, शिक्षिकेच्या भूमिकेतील निर्मल कुलकर्णी, मानसशास्त्र तज्ञ म्हणून प्रसिध्द विजया भोसले अशा बुध्दिमान विद्यार्थ्यांचाही हा वर्ग होता. अमेरिकेत स्थायिक झालेला विष्णू महाडेश्वर, आज एका 

नामवंत रुग्णालयाचा मुख्य कार्यकारी अधिकारी असलेला चंद्रकांत नारकर, चिडखोर परंतु हुशार कांचन पाटील अशा खोडकर विद्यार्थ्यांमुळे वर्गात रंगत येत असे. सुरेंद्र बागवे, अतुल केंकरे, शेखर मयेकर, वैकुंठ जुवारकर, विजय कुलकर्णी, उमेश होशिंगही मंडळी वर्गाच्या सभ्यतेत भर घालीत. स्मिता माशेलकर तर चैतन्याचा धबधबाचलेखिका अलका गाडगीळउपमुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झालेली सीमा दळवी समाजसेवा करणारी जयश्री ठाकरे, वर्गात आहेत की नाहीत हेही कळत नसे अशा रोहिणी घोटगे, भारती परुळेकर मीना परुळकर आणि महादेव तांबे, हेमंत  पावसकर, मधुसूदन कांबळी, प्रविण गुरव, आनंद कदम, विनोद वळवईकर, ओफ पिरियडला गाणी म्हणण्यात पुढाकार घेणारे जयू नेत्रावळी किरण गुळगुळे अशा विभिन्न गुणांचा समुच्चय असलेल्यांचा हा वर्ग मैत्रीच्या घट्ट धाग्यांनी बांधला गेला नसता तर नवलच!

एसएससी झाल्यानंतर भेटी तुरळक झाल्या. २००० साली, मैत्रीचा रौप्य महोत्सव सर्वांनी एकत्र साजरा करावा अशी कल्पना पुढे आली. काही जणांचे पत्ते नव्हते, तर काही परप्रांतात वा परदेशी होते. ह्या साऱ्यांशी, संपर्क साधून एकत्र आणण्याची जबाबदारी कामगार चळवळीतील अग्रेसर विजय कुलकर्णीने चंदूने घेतली. मार्वे किनाऱ्यावरील रिसाॅर्टही बुक झाले. अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजे ३४ जण ह्या दिवसभराच्या कार्यक्रमात सहभागी झाले. विष्णू अमेरिकेतून तर मेधा कोठुरकर नायजेरियातून खास दाखल झाले. वैकुंठ गोव्यातून अनिल बनसोड नागपुरातून तर कांचन, निर्मल वत्सला पुण्यातून ह्या कार्यक्रमासाठी मुंबईत आले. भारत पराडकर ह्या अकाली दिवंगत मित्राला श्रध्दांजली वाहून सुरूवात झाली. २५ वर्षातील आयुष्यातल्या स्थित्यंतरांविषयी सारेच भरभरून बोलले. एकमेकांच्या फिरक्या घेत कार्यक्रम रंगत गेला. मावळत्या सूर्याच्या साक्षीने  पुन्हा भेटण्याची वचने देऊन आम्ही निघालो. आपले हे मैत्र किती उर्जा देणारे उत्साह वाढविणारे आहे याची खात्री सर्वांनाच पटली होती. वर्षातून दोनदा सहल, एकदा पावसाळयात दुसऱ्यांदा वर्षातील अखेरच्या आठवड्यात! २००० साली ठरविल्याप्रमाणे एकमेकांच्या घरी तसेच  मुरबाड, लोणावळा, खोपोली, मोराची चिंचोली, माहुली अशा ठिकाणी भेटत राहिलो. निसर्ग सानिध्यात, गप्पांच्या वर्षावात भिजून जात रम्य आठवणींना उजाळा देत मैत्रीचा आनंद मनमुराद लुटला. माझी पत्नी नीता ही शाळेमधे आमच्या दोन वर्षे मागे परंतु तीही ह्या मैत्रीचा धागा झाली. श्रावणातील एखादी संध्याकाळ भजी उत्सव, मिसळ स्पेशल, बटाटा वडा उत्सव म्हणून, पावसाची गाणी कविता म्हणत साजरा करण्याची प्रथा माझ्या घरी सुरू केली. मधल्या काळात, स्मिता राजे श्रीकृष्ण आगरकर जगातून निघून जाण्याचं दु: आमच्यासाठी मोठं होतं.

जेथे आम्ही आनंदाचे क्षण वेचले त्या शाळेबद्दल कृतज्ञतेच्या भावनेतून, एसएससी च्या  वर्गखोलीचे नूतनीकरण करावे अशी कल्पना पुढे आली.भराभर पैसे जमवले गेले. वर्गाची रंगरंगोटी झाली.जुनाट वायरिंग बदलले गेले. आमच्या ह्या प्रयत्नातून शाळेतील इतर माजी  विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली. शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नूतनीकरण केलेल्या वर्गामधे आम्ही  छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला. निवृत्त झालेले वृध्दत्वाकडे झुकलेले आमचे शिक्षक-शिक्षिका आवर्जून उपस्थित होत्या. आमच्यापैकी अनेकांनी सांगितलेल्या आठवणीनी शिक्षकांनाही भारावून गेल्यासारखे झाले होते. आपल्या विद्यार्थ्यांना अनेक वर्षांनी भेटताना मनोगत व्यक्त करताना त्यांच्याही भावना उचंबळून आल्या होत्या. आमच्या मैत्रीच्या बंधनांमुळे हा हृद्य सोहळा जुळून आला

४३ वर्षांच्या मैत्रीचे हे बंध केवळ सहली, मौजमजा ह्यामधे अडकून राहिले नाहीत तर एकमेकांच्या सुखदुःखामधे मदतीचा हात देण्यासही तत्पर राहिलो. एका मैत्रीणीवर पतिनिधनाचे आभाळ कोसळले. पतीच्या आजारपणातील खर्चामुळे खचलेल्या तिला नुसतेच शब्द नव्हे तर आर्थिक सहाय्य देण्याची गरज भासताच, सर्वांनीच आपआपल्या परीने हातभार लावण्याचा निर्णय घेतला. एक भरीव रक्कम ती नको नको म्हणत असताना तिच्या खात्यावर जमा देखिल केली. त्या दिवशी तिच्या डोळ्यातून ओघळलेल्या अश्रूनीच जाणीव करून दिली आहे की आयुष्याची साठी पार करताना आता खरी गरज आहे अशा निस्वार्थ निरपेक्ष मैत्रीची!


अजित सावंत