Thursday, March 10, 2016

इतिहास डागाळणारे राजकारण नको!

'तुम्ही सावरकरांना सोडले आहे कां? सोडले असेल तर ते चांगले आहे' असा तिरकस टोमणा लोकसभेमधे  राहुल गांधीनी मारला व काॅंग्रेस मधील त्यांचे गणंगही आता आपली 'राहुल निष्ठा' सिध्द करण्याच्या प्रयत्नांत लागलेले आहेत. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामधे बलिदान देणारे थोर क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद हे अंतिम श्वासापर्यंत ब्रिटिशांशी लढत असताना सावरकर मात्र ब्रिटिशांकडे दयेची भीक मागत होते असे सांगत काॅंग्रेसच्या वतीने सावरकरांना ' नकली' देशभक्त संबोधणारे ट्वीट करण्यांत आले आहे. 'आमचीच देशभक्ती प्रखर व आम्ही ज्यांना देशभक्तीचा दाखवला देऊ तेच देशभक्त' असे रुजविण्याच्या भाजपच्या अविवेकी प्रयत्नांच्या खालच्या पातळीवर आता काॅंग्रेसही उतरत असल्याने 'राष्ट्रनेत्यांची आपआपसामधे वाटणी करून आपलीच देशभक्ती  खरी हे सिध्द करण्यांच्या देशातील दोन प्रमुख पक्षांच्या संघर्षाला किळसवाणे स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे. 

भारतीय जनता पक्षाला म्हणजेच पूर्वाश्रमीच्या जनसंघाला व त्या पक्षाच्या नेत्यांना देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामधे सहभाग घेतल्याची कोणतीही पार्श्वभूमी नाही. स्वातंत्र्य आंदोलनांमधे वा त्यानंतर देशासाठी दिलेल्या बलिदानाचा वारसा भाजपकडे किंवा ह्या पक्षाचे पितृत्व ज्यांच्याकडे आहे त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघापाशी नाही, किंबहुना  त्यांनी स्वातंत्र्य चळवळीशी द्रोह केल्याची उदाहरणे अनेक आहेत. त्याउलट काॅंग्रेसजवळ मात्र अगदी लोकमान्य टिळकांपासून, सरदार पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस आणी अर्थातच राष्ट्रपिता महात्मा गांधी व जवाहरलाल नेहरू यांच्यापर्यंत असंख्य काॅंग्रेस नेत्यांनी स्वातंत्र्याकरिता दिलेल्या योगदानाच्या, केलेल्या त्यागाच्या दैदिप्यमान इतिहासाचा वारसा आहे. हेच काॅंग्रेसचे बलस्थान आहे याची जाणीव भाजप तसेच आर्एस्एस् च्या धुरिणांना आहे. म्हणूनच ह्या बलस्थानांवर हल्ले चढवून ती खिळखिळी करण्याचे प्रयत्न भाजप व संघाकडून सतत होत असतात. न्यूनगंडाची भावना असे करण्यास भाजप व संघाला भाग पाडत असते. त्यातूनच कधी सरदार पटेल हिंदुत्ववादी होते असे बनावट चित्र रंगवून, महात्मा गांधीनी त्यांच्यावर अन्याय केल्याच्या कहाण्या रंगविल्या जातात. आजवर ज्यांचा विसर पडला होता त्या सरदार पटेलांचा अतिभव्य पुतळा उभा करून त्यांना भाजपच्या दावणीला बांधण्याची धूर्त चाल नरेंद्र मोदींकडून खेळली जाते. नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांच्या मृत्यूविषयीचे गूढ पुन्हा निर्माण करून व सरकारी दप्तरांतील फाईल खुल्या करून व नेताजींच्या कथित वारसांना पुढे करून पंडित जवाहरलाल नेहरूंकडे संशयाची सुई रोखण्याचा प्रयत्नही सुरू होतो. नेताजींवर आपला हक्क प्रस्थापित करता येतो कां याचीही चाचपणी सुरू होते. स्वातंत्र्योत्तर काळामधे देशाच्या एकात्मतेसाठी इंदिरा व राजीव ह्यांनी पत्करलेले हौतात्म्य तर भाजपा व संघाच्या खिजगणतीतही नसते.  भाजप व संघाच्या ह्या  कारस्थानांचा विचारांनी सामना करण्याचे सामर्थ्य, काॅंग्रेसपाशी असलेल्या, त्यागावर आधारलेल्या देशभक्तीच्या वारशामधे निश्चितच आहे परंतु दुर्दैवाने आपल्या अंगभूत शक्तीवर विश्वास ठेवून वैचारिक लढाई लढण्याऐवजी, हिंदुत्ववादी परंतु प्रखर राष्ट्रभक्त असलेल्या सावरकरांना नकली देशभक्त म्हणून हिणवून काॅंग्रेस, जनतेपासून काॅंग्रेसला वेगळे पाडण्याच्या  भाजपच्या डावाला बळी पडत आहे. 

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांबद्दल आक्षेप असणाऱ्यांनाही सावरकर हे प्रखर देशभक्त व ब्रिटिशांविरूध्द सशस्त्र क्रांतीची प्रेरणा देणारे क्रांतीकारी विचारांचे नेते होते हे मान्य करावयास हरकत नाही. सावरकरांनी ब्रिटिश सरकारकडे माफीची याचना केली होती हे उपलब्ध पुराव्यावरून खरे मानले तरी अंदमानच्या कोठडीमधे त्यांनी सोसलेल्या हालअपेष्टांना कमी कसे लेखता येईल? दयेची भीक मागण्यासंबंधीही अनेक इतिहासकारांमधे मतभिन्नता आढळते. सावरकरांची माफी याचना म्हणजे ब्रिटिशांची दिशाभूल करून तुरूंगाबाहेर पडून, देशामधे सुरू असलेला स्वातंत्र्य लढा अधिक तीव्र करता यावा यासाठी रचलेली चाल होती असे मत ज्येष्ठ विचारवंत व लेखक य. दि. फडके ह्यांनी नोंदविले होते. सावरकरांनी मांडलेल्या द्विराष्ट्र सिध्दांताशी मुस्लीम लीगच्या मोहमद अली जीनांची मते मिळतीजुळती होती.  महात्मा गांधी व डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना हा द्विराष्ट्र सिध्दांत मुळीच मान्य नव्हता. तर महात्मा गांधींच्या हिंदू-मुस्लीम एकतेच्या संकल्पनेला सावरकरांचा कायम विरोध होता. १९४२ साली तर, चले जाव आंदोलन चिरडण्यासाठी सर्व प्रमुख काॅंग्रेस नेत्यांना ब्रिटिश सरकारने तुरूंगात डांबले असताना, सावरकांची भूमिका चले जाव चळवळीमधे फूट पाडून ब्रिटिशांशी सहकार्य करण्याची होती. हे स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासांत नोंद झाले आहे. महात्मा गांधींच्या हत्येशी सावरकरांचा असलेला वा नसलेला संबंधही सतत चर्चेत राहिला आहे. परंतु  त्यामुळे  देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता संघर्षशील राहिलेल्या सावरकरांच्या अंत:करणात सतत तेवत असलेल्या तेजस्वी ज्योतीच्या प्रकाशाने  उजळून निघालेली इतिहासाची पाने वाचणे टाळून स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास कसा वाचता येईल? सावरकर हे प्रखर हिंदुत्ववादी असले तरी त्यांचे हिंदुत्व हे विज्ञाननिष्ठ हिंदुत्व होते. हे हिंदुत्व गाईला 'गोमाता' म्हणून गोहत्या बंदी लादणारे व कुणा निरपराधाची गोमांस खाल्ले म्हणून हत्या करणारेही नव्हते. पांच हजार वर्षांपूर्वी भारतात विमाने होती व शल्यचिकित्सेद्वारे धडावर वेगळे मस्तक लावण्याचे शास्त्र विकसित झाले होते अशा भ्रामक कल्पनांनी सावरकरांचे हिंदुत्व भारलेले नव्हते. परंतु, सावरकरांच्या विज्ञाननिष्ठ हिंदुत्वापासून ज्यांचे हिंदुत्व अनेक कोसांवर आहे व स्वातंत्र्यलढ्यांतील सावरकरांच्या सहभागाशी ज्यांचा काडीमात्र संबंध नाही  ते भाजप (पूर्वीचा जनसंघ ) व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज मात्र  वारसा मिरविण्यासाठी सावरकरांवर आपला हक्क दाखवित आहेत. असे असताना काॅंगेस मात्र सावरकरांना लक्ष्य करून 'सावरकर तुमचे' म्हणत कोणते राजकीय शहाणपण दाखवित आहे? हे त्यांचे त्यांनाच ठाऊक! 

महात्मा गांधी वा नेहरू असोत किंवा नेताजी सुभाषचंद्र, सरदार पटेल असोत वा स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांची राष्ट्रभक्ती व देशासाठीचे योगदान हे वादातीत आहे व असावयासही हवे. त्यांच्या जीवनातील अनेक टप्पे व घटना प्रेरणादायी आहेत. त्यांच्या काही निर्णयांविषयी, विचारांविषयी मतमतांतरे असूही शकतात. तत्कालीन परिस्थितीमधे नेमके काय घडले होते ह्याची अचूक चिकित्सा होणेही आज अवघड आहे.  परंतु अमक्यामुळे देशाचे वाटोळे झाले व तमक्याची देशभक्ती नकली हा उहापोह करणे किती योग्य आहे याचा विचार सर्वच पक्षांनी करणे आवश्यक आहे. भावी पिढ्यांना प्रेरणादायी ठरणारा  व उद्याचे देशभक्त नेते घडविण्याची क्षमता असणारा इतिहास आपणच तर डागाळून टाकीत नाही ना? याचा विचार ह्यानिमित्ताने राजकीय पक्षांकडून 'देशभक्तीच्याच' भावनेतून होणे योग्य ठरेल!
No comments:

Post a Comment