Monday, May 25, 2015

एम्आयएल्एस् च्या विद्यार्थी मित्रांनो........

कै. नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेच्या (एम् आय एल् एस्)) विद्यार्थी मित्रांनो, 
तुम्ही एमएलएस् हा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करून एका नव्या आत्मविश्वासाने श्रम व्यवस्थापन व संशोधन क्षेत्रामधे पाऊल ठेवणार आहात. श्रम विज्ञान क्षेत्रातील ह्या मान्यवर संस्थेमधे उच्च शिक्षण घेण्याचे भाग्य तुम्हाला व मल्हार लाभले. संस्थेच्या पायरीचा परीस स्पर्श झाला व अनेकांच्या जीवनाचे सोने झाले. अनेक सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्यांना ह्या संस्थेने आयुष्य घडविण्याची संधी उपलब्ध करून दिली. ह्या संधीचे सोने करणारे उच्च पदावर पोहोचले. परंतु दुर्दैवाने अनेकजण आपल्या ह्या संस्थेला पार विसरून गेले. काहीना तर आम्ही ह्या संस्थेतून उच्च शिक्षण घेतले हे सांगण्याऐवजी अन्य उच्चभ्रू संस्थांची नावे घेऊन खोटी प्रतिष्ठा मिरविण्यांत धन्यता वाटू लागली. आपली संस्था शासकीय आहे. अनेक बाबतीत मर्यादा आहेत. आपण संस्थेच्या पाठीशी उभे रहाण्याइतपत समर्थ झाल्यानंतर तरी संस्था अधिक मोठी कशी होईल व तिचा लाभ आपण समाजाच्या ज्या स्तरातून आलो त्या वर्गातील होतकरू विद्यार्थ्यांना कसा होईल याचा ध्यास प्रत्येक माजी विद्यार्थ्यांने घेतल्यास संस्थेचे व येथे शिकणार्या आपल्या भावंडांचे भवितव्य अधिक उज्वल होईल व संस्थेच्या ऋणाची थोडीशी परतफेड कृतज्ञतेच्या भावनेतून करता येऊ शकेल. संस्थेतून मिळालेले उच्च शिक्षण केवळ व्यवस्थापन क्षेत्रामधे उच्च पदावर पोहोचण्याचा पासपोर्ट आहे असे समजणेही चुकीचे आहे. ह्याच शिक्षणाच्या आधारे श्रम विज्ञान क्षेत्रातील संशोधक, कामगारांना न्याय मिळवून देणारे विधायक दृष्टीकोन बाळगणारे कामगार नेते, शासनाला मार्गदर्शन करू शकणारे अभ्यासू अधिकारी सुध्दा घडू शकतात ह्याचे भान पदवी घेऊन बाहेर पडणार्या विद्यार्थ्यांनी ठेवणे आवश्यक आहे. उद्योग क्षेत्रातील स्थित्यंतरे व कामगार कायद्यातील बदल पहाता संघटित क्षेत्र दिवसेंदिवस आक्रसले जात आहे. उद्योग क्षेत्राच्या दृष्टीकोनामधे होत चाललेले बदल, व्यवस्थापन शिक्षणाच्या उपलब्ध होत असलेल्या संधी यामुळे औद्योगिक संबंधांना फाटा मिळून, श्रम व्यवस्थापन यापुढे केवळ कर्मचारी भरती, प्रशिक्षण व कर्मचारी प्रशासन यापुरतेच मर्यादित राहील असे दिसते. म्हणूनच श्रम विज्ञान क्षेत्रामधे भवितव्य घडविण्याच्या केवळ व्यवस्थापनातीलच नव्हे तर अन्य संधींचाही मागोवा घ्यावा लागेल. त्याकरिता स्वत:ला सर्वतोपरी सक्षम करावे लागेल. चौफेर वाचन, विविध क्षेत्रामधे वावर, मान्यवरांशी संवाद, भाषेवरील प्रभुत्वासह वक्तृत्व कलेची जोपासना, याद्वारे व्यक्तीमत्व विकासासाठी प्रयत्न करावे लागतील. "चिंध्या पांघरून सोने विकत बसलो गिर्हाईक काही फिरकेना, सोने पांघरून चिंध्या पांघरून विकू लागलो, गिर्हाईक सरता सरेना' असे कवी सुधाकर गायधनी यांनी म्हटलेच आहे. स्वत:चे उत्तम सादरीकरण जगासमोर कसे करता येईल हे समजून घेतले तर तुम्ही निवडलेले क्षेत्र तुम्हाला सलाम ठोकेल. चला तर मग तयारीला लागा.  शुभास्ते पंथान: !

No comments:

Post a Comment