Friday, May 5, 2017

१ मे संघर्षाचा स्मरण दिन हा कंत्राटी सफाई कामगारांचा विजय दिन!

१ मे कामगार दिनाच्या परळ येथील कामगार मैदानातील अनेक कामगार मेळाव्यांना मी अगदी १० वर्षांचा असतानासुध्दा माझे वडील काॅ पी जी सावंत ह्यांच्यासोबत उपस्थित रहात असे. वातावरण भारलेले असे. मैदानावर सर्वत्र लाल बावटे व व्यासपीठासमोर डौलाने फडकणारा लाल झेंडा उपस्थित कामगारांमधे चैतन्य निर्माण करत असे. 'जगातील कामगारांनो एक व्हा', 'लाल बावटे की जय', 'कामगार एकजुटीचा विजय असो' ह्या घोषणांनी आसमंत निनादून जाई. डोक्यावर लाल टोपी व दंडाला लाल पट्टी बांधलेले तरूण कामगारांचे पथक 'रेड गार्डस्' सभेची चोख व्यवस्था व बंदोबस्तही ठेवत असे. शेकडोंच्या संख्येने कामगार हातामधे लाल झेंडे घोषणा देत सभेला येत.कालांतराने मुंबईमधे शिवसेनेचा उदय झाला व कम्युनिस्ट व सेनेमधे संघर्ष सुरू झाला. मुंबईतील कामगार चळवळ व पर्यायाने कम्युनिस्टांचे वर्चस्व मोडून काढण्याचा डाव सत्ताधाऱ्यांनी सेनेला हाताशी धरून रचला. सेनेकडे तरुणांचा ओघ वाढत चालला तसतसा कम्युनिस्ट चळवळीचा प्रभावही ओसरू लागला. संपफोड्या सेनेने अनेक कारखान्यातील डाव्या कामगार संघटना सरकारी आशीर्वादाने मोडीत काढून आपले वर्चस्व प्रस्थापित केले. पुढे १९८२ साली झालेल्या गिरणी संपाचे पर्यवसान सरकार व मान्यताप्राप्त कामगार संघटना आणी मालकवर्ग ह्यांच्या हातमिळवणीमुळे गिरण्या बंद होण्यांत झाले. हजारो गिरणी कामगार बेकार झाले व देशोधडीला लागले. नंतरच्या काळात जमिनीला येत असलेली सोन्याची किंमत पाहून उद्योगपतीनी धडाधड कारखाने बंद पाडून कारखान्यांच्या जमिनी विकून आपले उखळ पांढरे करण्यास सुरूवात केली. परिणामी मुंबईतील कामगारवर्ग हळूहळू मुंबईबाहेर फेकला जाऊ लागला. कामगार चळवळही क्षीण झाली. मे दिनाच्या भव्य मिरवणुका व कामगारांच्या मेळाव्यांना कामगारांच्या तुरळक उपस्थितीने ओहोटी लागली. ह्या पार्श्वभूमीवर आज १ मे कामगार दिनानिमित्त 'कचरा वाहतूक श्रमिक संघाने' २७०० कंत्राटी सफाई कामगारांना मुंबई महापालिकेच्या नोकरीत कायम करून सर्व लाभ देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून मिळविल्यानिमित्त विजय मेळावा आयोजित केला होता. ह्या विजय मेळाव्यामधे ज्येष्ठ कामगार नेते काॅ यशवंत चव्हाण, काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांच्यासह डाव्या चळवळीतील अनेक नेते उपस्थित होते. कालपरवापर्यंत किमान वेतन व अन्य सुविधांपासून वंचित २७०० कामगारांना पालिकेच्या नोकरीत कायम होण्याचा निर्णय झाल्याने कामगारांच्या उत्साहाला उधाण आले होते. १२ वर्षांच्या संघर्षातून, काॅ मिलिंद रानडे, काॅ विजय दळवी, काॅ दिपक भालेराव ह्यांच्या नेतृत्वाखाली कंत्राटी सफाई कामगारांनी मिळविलेला हा विजय अलिकडच्या काळामधे ढेपाळत चाललेल्या कामगार चळवळीने मिळवलेला मोठा विजय आहे. शोषणाच्या वरवंट्याखाली पिचलेल्या, देशातील तमाम कंत्राटी कामगारांना हा विजय संघर्षाची प्रेरणा देईल व खऱ्या अर्थाने पथदर्शी ठरेल. ह्या विजय मेळाव्यामुळे अनेक वर्षांमधे प्रथमच १ मे कामगार दिन हा एका वेगळ्या उत्साहात साजरा झाला. पुन्हा एकदा मन आश्वस्त झाले. शोषणकर्त्यांशी संघर्ष करून कामगारांना यश मिळवता येते. कानांमधे घोषणा गुंजत राहिल्या 'कामगार एकजुटीचा विजय असो!'

No comments:

Post a Comment