Friday, May 13, 2016

मन झाले 'सैराट' सैराट

काल सैराट पाहिला. आजच्या धकाधकीच्या जीवनात बहुसंख्य लोक समाजातील अनेक घडमोडी व वास्तवापासून दूर असतात. स्वत:समोरचे प्रश्न किंवा सुखवस्तू असण्यातून जोपासलेली चंगळवादी वृत्ती ह्यामुळे आजूबाजूला व विशेषत: आपल्यापासून भौगिलिक दृष्ट्या दूर किंवा सामाजिक दृष्ट्या अंतर राखून असलेल्यांच्या जीवनामधे काय घडत आहे याचे संपूर्ण भान त्यांना येत नाही. वर्तमानपत्रांतून वा टीव्हीवरच्या बातम्या पाहून माहीती मिळते परंतु वास्तवाचे भान येत नाही कारण माणसे आत्मकेंद्री व आत्ममग्न झाली आहेत. सामाजिक प्रश्नांची भयाणता केवळ माहीती मिळाल्याने कळली असती तर लोक अनेक प्रश्नांपासून अलिप्त राहू शकले नसते. अशा परिस्थितीमधे, समाजातील वास्तवावर नेमके बोट ठेवणारे सैराट सारखे चित्रपट त्यांना हलवून जागे करण्याचे मोठेच काम करतात. जातीचा वृथा अभिमान व सत्तेचाछ माज दोन प्रेमी जीवांची कशी ससेहोलपट करतात व शेवटी त्यांनी कष्टपूर्वक उभे केलेले जीवन स्वत:चा अहंगंड जोपासण्यासाठी उद्ध्वस्त करतात याचे हे चित्रण आहे. आजही ग्रामीण भागामधे समाजातील जातीय व आर्थिक उतरंडीमधे अगदी तळाला असलेल्या कुटुंबाचे जिणे दाखवल्याने अजूनही सामाजिक व आर्थिक समतेपासून समाज कित्येक मैल दूर आहे हे शहरी लोकांना समजून येते. साहित्यातून, चित्रपटातून  अनेकदा सामोरी आलेली ही प्रेम कहाणी, प्रेमिकांच्या जीवनातील सामाजिक व आर्थिक विषमतेचे अंतर किंवा जाती-धर्माने उभ्या केलेल्या भिंती, त्या ओलांडण्याचे त्यांनी केलेले धाडस व त्यामधे त्यांना आलेले यश वा अपयश ह्या नेहमीच्याच सूत्रावरची असली तरी ही कथा केवळ प्रेमाचीच नव्हे तर विशिष्ट समाजाच्या वाट्याला येत असलेल्या झिडकारलेपणाची, गांवगुंडांच्या माजाची तसेच जातपंचायत आदी प्रश्नांना हात घालून पुढे मंग्या, लंगडा प्रदीप, सलीम  ह्यांच्यासाख्या सच्च्या मित्रांची व यास्मिन दीदी ही मुस्लीम शेजारीण, तसेच स्वत:च्या कष्टमय जगण्यांतही प्रेमिकांना आश्रय देण्याचे मनाचे मोठेपण दाखविणाऱ्या अम्माचीही आहे. कोणत्याही जातीचा उल्लेख टाळला आहे परंतु ह्या कहाणीतील संघर्ष खाणारे-पिणारे व अर्धपोटी जगणारे ह्यांच्यामधला आहे. वरणभात तूप खाणारे ह्या पासून दूर आहेत! सोशल मिडीयावरच्या अंगावर येणाऱ्या प्रतिक्रियांचा अनुभव मी स्वत:ही घेत आहेच. जातीच्या अहंकारापोटी वा सामाजिक वास्तवाच्या अज्ञानापोटी अशा 'सैराट' प्रतिक्रिया देत आहेत. परंतु रोज किमान १० माणसे सैराट पाहिला कां असे विचारतात व चित्रपटगृहातही समाजातील सर्वच स्तरांतील लोक गर्दी करून एकमेकांच्या खुर्चीला खुर्ची लागून चित्रपट पहातात ह्या मधेच सैराटचे यश आहे. चित्रपट उत्कृष्ट झाला असला तरी काही तांत्रिक उणीवांवर बोट ठेवता येऊ शकते पण प्रेक्षकानीच डोक्यावर घेतल्याने त्या दोषांची चर्चा करणे निरर्थक आहे. असो सैराट आवडला. सर्वांनी पहावा. आजच्या युगामधे गैरलागू असलेला आपल्या जातीबाबत असलेला खोटा अभिमान दूर लोटून!  वास्तवातील जिणं जगणारे कलाकार व दिग्दर्शक नागराज मंजुळे ह्यांना दादा देण्यासाठी. अन् थोडंसं जळत्या वास्तवाचं भान येण्यासाठीही!  निश्चितच आवडेल.

No comments:

Post a Comment