Monday, May 5, 2014

रोखावेच लागेल आता मोरारजीच्या वारसांना!

        

                                              

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुका पार पडल्या. अब की बार...म्हणत कधी नव्हे इतक्या मोठ्या संख्येने गुजराती बांधव मतदानासाठी बाहेर पडल्याचे दिसले. मतदानाच्या सुट्टीला जोडून, आपल्या धंदा-व्यापारातून वेळ काढून गुजराती व्यापारी मुंबई बाहेर सुट्टी साजरी करण्यासाठी बाहेर पडत असत. लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर येथली रिसाॅर्टस् तुडुंब गर्दीने भरून वाहत. ही गर्दी प्रामुख्याने गुजराती भाषिकांची असे. ह्या वेळी मात्र अघटित घडले. ह्या सहलीच्या ठिकाणांकडे गुर्जर बंधूंची पावले वळलीच नाहीत. 'आपडा नरेनभाई माटे' सहलीच्या आनंदाचा त्याग करून मतदानाचे पवित्र कर्तव्य त्यानी पार पाडले. दक्षिण-मध्य मुंबईत महायुतीचा ऊमेदवार शिवसेनेचा असताना,मतदान केंद्राच्या बाहेर प्रदर्शित केलेल्या डमी मतपत्रिकेवर 'कमळ' कां दिसत नाही? हा प्रश्न अनेक गुजराती 'नवमतदार' विचारत होते. मुंबईतल्या मोदींच्या सभेतही ह्याच उत्साहाचे दर्शन घडले होते. कधीही कोणत्याही जाहीर राजकीय कार्यक्रमांना सहसा उपस्थित न रहणार्या बेपारीनी, नरेनभाईंच्या जाहीर सभेला आवर्जून उपस्थिति लावली होती. अब की बार, मोदी सरकार आणण्यासाठी करोडोंच्या थैल्या मोकळ्या करणार्या ह्या मोदी बंधूंसाठी खास शामियाना उभारून बसण्याची आरामदायी व्यवस्थाही करण्यांत आली होती. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार ह्यांनी आपले सारे कलाकौशल्य पणाला लावून भरलेल्या मैदानातली मराठी मायभगिनी-बांधवांची गर्दी मात्र कडक उन्हामधे अंगाची काहिली होत बेजार होऊन बसली होती. 

निवडणुकीदरम्यानचा 'नरेनभाई माटे, आपडा माणस माटे चा' उत्साह, मराठी माणसाना दिली गेलेली दुय्यम वागणूक ह्याच्या प्रतिक्रिया आता निवडणूक झाल्यानंतर उमटू लागल्या आहेत. मोदी जर चुकून माकून पंतप्रधानपदी विराजमान झाले तर मुंबई मधे गुजराती अधिकच वर्चस्व गाजवू लागतील अशी भीती काही राजकीय पक्षांना व नेत्यानाच नव्हे तर सामान्य मराठी माणसालाही वाटू लागली आहे. मुंबईतील मालाड,़कांदीवली, बोरीवली, घाटकोपर पााठोपाठ आता परळ-लालबाग, गिरगांव, दादर-शिवाजीपार्क, पार्ले-अंधेरी आदी मराठी वस्त्यावरील, मराठी ठसा पुसला जात आहे ह्याचा सल प्रत्येक अस्सल मराठी माणसाच्या मनात आहे हे नाकारून कसे चालेल? पुढच्या पालिका निवडणुकांमधे ह्या भागांमधून गुजराती भाषिक नगरसेवक निवडून आले तर आश्चर्य वाटायला नको! मराठी माणसाच्या नांवाने राजकारण करणार्यांना हे कळत नाही असे नाही पण वळतही नाही असा अनुभव येत असल्याने, राज्यकर्ते मराठी परंतु मराठी जनतेची स्थिती मात्र 'असुनी नाथ मी अनाथ' अशी झालेली आहे.

मराठी जनांच्या मनामधे गुजरातींबद्दलची अढी व गुजराथ्यांच्या मनामधे मराठींबद्दल असलेला आकस आजचा नाही. परस्परांबद्लच्या ह्या भावनांचे मूळ मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामधे आहे. गुजरात धार्जिण्या नेत्यांचा व उद्योगपतींचा मुंबई केंद्रशासित करण्याचा कुटिल डाव उधळून लावण्यासाठी अाचार्य अत्रे, एसेम जोशी, प्रबोधनकार ठाकरे काॅ. डांगे ह्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामधे १०५ हुतात्म्यांना प्राणांचे बलिदान द्यावे लागले. मराठी मनावर झालेल्या ह्या घावाची जखम आज महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला ५० वर्षे उलटून गेल्यानंतरही पूर्णपणे भरलेली नाही. मुंबई मधे व्यापार-धंद्यामधे करोडोंची गुंतवणूक करणार्या  शेठियांच्या मनामधे देखिल, ज्या मुंबईच्या आर्थिक नाड्या आपल्या हातात आहेत ती मुंबई आपण राजकीयदृष्ट्या गमावल्याचे शल्य आजही ठसठसत असते. ही खदखद, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची' अशा घोषणांतून बाहेर पडते. गुजरातवर ओढवलेले नैसर्गिक संकट असो वा मोदींची पंतप्रधान होण्याची आकांक्षा, थैल्या घेऊन धावत सुटणारे ज्या महाराष्ट्रामधे अमाप संपत्ती मिळवतात त्याच महाराष्ट्रावरील आपत्ती  प्रसंगी हात आखडता घेतात हे पाहून मराठी माणसांचे पित्त खवळले तर त्यांचे काय चुकले?

आज मराठी माणसासमोर मुंबईतल्या मराठी माणसाच्या अस्तित्वाच्या प्रश्नाबरोबरच मराठी संस्कृतीच्या रक्षणाचा प्रश्न उभा ठाकला आहे.  गिरणगांवाच्या छाताडावर उभे राहिलेल्या ऊत्तुंग टॅावर खाली आपले खोडकर बालपण, तारूण्यातला जोश गाडला गेला आहे ह्या जाणीवेने तो अस्वस्थ आहे. ज्या गिरण्या-कारखान्यांमधे आपण, आपल्या बापजाद्यांनी घाम गाळला तेथे उभ्या राहिलेल्या भव्य आलिशान माॅल मधे प्रवेश करताना त्याची छाती दडपून जाते. जिवाभावाचे नाते ज्यांच्याशी जुळले ती मैदाने, त्या शाळा कधी गायब झाल्या ते त्याला कळले देखिल नाही. रस्त्यावरच्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांसमोर, ज्यूस च्या स्टाॅलसमोर गाड्यांमधून येणार्या धनिक-वणिक बाळांचे अड्डे जमू लागले. ह्या गर्दीमधे सामान्य मराठी माणसाला बुजल्यासारखे होते. बर्याचदा गृहनिर्माण वसाहतींमधे वा उरल्यासुरल्या चाळींमधे मराठी माणूस अल्पसंख्यक होऊ लागला आहे. वसाहतीमधला सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रामधला दांडिया यांची एक वेगळीच स्पर्धा सुरू झाली आहे. आपल्या वसाहतींमधे मराठी माणसाना जागा विकत घेता येऊ नयेत याचे 'मांसाहारीना मज्जाव करणारे' अलिखित नियम कठोरपणे पाळणारे मात्र आपल्या भाईबंदानाच जागा घेता यावे ह्याचे डाव रचत आहेत. परिस्थितीच्या रेट्याने किंवा चाळमालकाच्या दबावाने ह्याच मंडळीना जागा विकणे मराठी माणसाला भाग पडत आहे. आपल्या धार्मिक सणांच्या दिवशी कत्तलखाने बंद ठेवावेत अशा मागण्याबरोबरच, आपल्या वसाहतीजवळचा मासळी बाज़ार हटविला जावा अशी कुजबूजही ह्या पक्क़्या शाकाहारीनी सुरू केली आहे.  गिरगांव मधील 'अनंताश्रम' ह्या सुप्रसिध्द परवडणार्या खानावळी पाठोपाठ लालबागचे 'क्षीरसागर', 'दत्त बोर्डींग' ह्या सारखी मांसाहारींची आवडती ठिकाणे, ह्या परिसरांतील मांस-मच्छी न खाणार्या वाढत्या लोकसंख्येमुळे काळाच्या उदरांत गडप होणार नाहीत ना? याची चिंताही मांसाहार प्रेमीना सतावू लागली आहे. सेनाप्रमुखांनी आवाज दिला तेंव्हा कोहिनूर मधे सोंगाड्या प्रदर्शित झाला हा इतिहास मराठी माणूस विसरलेला नाही. आज 'भारतमाता' चा घास घ्यायला टपलेल्यांपासून कधीही धोका होऊ शकतो ह्याची जाणीव मराठी चित्रपट रसिकाला आहे. ह्या सगळ्याला धनदांडग्या मुजोरीचा दर्प असल्याची  मराठी माणसाची खात्री पटली आहे. 

मराठी माणसाची ही अस्वस्थता समजून घेण्यामधे मराठीचा ठेका घेणारे राजकीय पक्ष व नेते दुर्दैवाने कमी पडत आहेत वा येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांतील मतांच्या हिशेबांनी त्यांचे ओठ शिवून टाकले आहेत. एखाद्याने ह्या मराठी संस्कृतीवर छुपा हल्ला चढविणार्या प्रवृतींशी 'सामना' करण्याचा रिकामटेकडा उद्योग केलाच तर त्याला त्याचे वरिष्ठ नेतेच तोंडघशी पाडत आहेत. ६० च्या दशकात कारकुनी करणार्या दक्षिण भारतीयांविरोधात 'बजाव पुंगी हटाव लुंगी' चा नारा देणार्या व ७७सालीच ह्या 'मोरारजीच्या वारसांची' पावले ओळखून, त्यांना ठाकरी भाषेत समज देणार्या शिवसेनाप्रमुखांचे वारसदार,आज ह्या धनशक्तीसमोर हतबल झाल्याचे विदारक चित्र पाहून मायमराठीच्या उरल्यासुरल्या आशाही संपल्या आहेत. आता पुन्हा पेटून उठावे लागेल ते मराठी माणसालाच!  आपल्या चुकांचे व उणीवांचे आत्मपरिक्षण करून, आपल्या एकजुटीची वज्रमूठ उगारण्यांत जर आम्ही मराठी कमी पडलो तर  रक्त सांडून मिळविलेली मुंबई, महाराष्ट्राला गमवावी लागेल. अब की बार जर मोदी सरकार आलेच तर हे घडवण्याची कारस्थाने रचली जातील म्हणूनच आता मोरारजीच्या वारसांना रोखावेच लागेल मुंबईतली मराठमोळी संस्कृती टिकविण्यासाठी!

अजित सावंत
मो. ९८२००६९०४६
ajitsawant11@yahoo.com


Thursday, August 1, 2013

लोकशाही धोक्यात आणणारा काॅर्पोरेट उद्योग


आजच्या लोकसत्तामधे 'कुणाच्या भांडवलावर कुणाची हा लेख  राजीव साने ह्यांनी लिहून, आम्हां वाचकांना उद्योग व श्रमिक यांच्यामधल्या बदललेल्या नात्याचे पदर उलगडून दाखवले आहेत. आपण वर्णिलेल्या मॅनेजमेंटशाहीलाच अलिकडे काॅर्पोरेट व्यवस्थापन असेही म्हणतात. व्यवस्थापन क्षेत्रातील उच्च शिक्षित तरूणांचेही ह्या क्षेत्रात 'टाॅपवर' जाण्याचे स्वप्न असते. हीच मंडळी पुढे आपल्या ज्ञानामुळे व अनुभवामुळे, ज्यांचे भांडवल व जोखीम अत्यल्प आहे त्यांच्या हातचे बाहुले बनून उद्योगातील श्रमिकांचे शोषण करण्याच्या, ग्राहक/करदाता/बचतदार ह्यांना भुलविण्याच्या, इन्स्टिट्यूशनल फायनान्स उपलब्ध करण्याच्या युक्त्या-प्रयुक्त्या शोधून काढतात. चाकरी, भले ती गलेलठ्ठ पगाराची असो, बजावणारी हीच मंडळी पंचतारांकित हाॅटेलांमधून भरणार्या परिषदा-परिसंवादांमधून,काॅर्पोरेट सोशल रिस्पाॅन्सिबिलिटी, उत्तम औद्योगिक संबंध राखण्याच्या पध्दती आदिंवर भरल्या पोटी चर्चा करतात. हे करीत असताना आपण प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष करीत असलेल्या श्रमिकांच्या, ग्राहकांच्या,बचतदारांच्या शोषणाला त्यांनी सोयीस्कररीत्या नजरेआड केलेले असते. 

आज उद्योगांमधे, मग ते खाजगी असोत वा सार्वजनिक, सरकारी आशिर्वादाने आपण सूचित केल्याप्रमाणे श्रमिकांचे शोषण उच्च कोटीला पोहोचले आहे. कंत्राटी कामगार प्रथेच्या अनिर्बंध वापरामुळे,मग ते सुरक्षा कर्मचारी, सफाई कामगार,लोडर आदि अल्पशिक्षित असो़त वा आयटी शी संबंधित सुशिक्षित/उच्च शिक्षित अभियंते असो़त, सारेच व्यवस्थेचा बळी ठरले आहेत. नोकरीची हमी म्हणजेच 'जाॅब सिक्युरिटी' तर कधीच इतिहास जमा करण्यांत आली आहे. कायद्यांचे संरक्षण हिरावून घेतलेल्या ह्या वर्गामधे असंतोषाची व नैराश्याची अदृश्य भावना वाढीस लागली आहे. त्यांत भरीस भर म्हणून महागाईने व करवाढीच्या ओझ्यांने कंबरडे मोडलेल्या सामान्य ग्राहक,गुंतवणूकदार, करदात्यामधेही अस्वस्थता वाढीस लागली आहे. ह्याची दखल वेळीच घेतली नाही तर इजिप्त,ब्राझील,ट्युनिशिया,तुर्कस्तान प्रमाणे असंतोषाची त्सुनामी येण्याचा दिवस उजाडण्यास फार जावा लागणार नाही. जे घडेल त्यांस काही प्रमाणात ह्या 'शाह्या' जबाबदार असतील. जगातील आदर्श लोकशाही व्यवस्था धोक्यामधे आणण्याचे पाप त्यांच्याकडून घडू नये ही अपेक्षा!

Friday, July 19, 2013

भ्रष्ट लायसन्स् अधिकार्यांना कारवाईचा 'जमाल'गोटा द्या!

पालिकेच्या जी उत्तर विभागातील लायसन्स् विभागाच्या वरिष्ठ निरिक्षकाला, दादर पश्चिम येथील भाजी विक्रेत्याकडून  लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्याचे वृत्त प्रसिध्द झाले आहे. ह्या वृत्तामधे, 'जमाल' नावाच्या मध्यस्थामार्फत भाजीविक्रेत्याने दरमहा सुमारे पंधरा हजार रूपये दिल्याचे म्हटले आहे. ह्यावरून पालिकेमधे भ्रष्टाचाराचा रोग किती मोठ्या प्रमाणात पसरला आहे ह्याची कल्पना येते. जकात,मालमत्ता कर,इमारत प्रस्ताव, इमारती व कारखाने,ह्या मलईदार खात्यांबरोबरच्या भ्रष्ट स्पर्धेमधे,आरोग्य,शिक्षण व अनुज्ञापन ही खातीही मागे रहाण्यास तयार नाहीत हे या पूर्वीही अनेक प्रसंगी सिध्द झाले आहे.

मुंबईतील रस्त्यांवरील अतिक्रमणे व फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच, लायसन्स खात्यातील एक वरिष्ठ अधिकारी फेरीवाल्यांकडून किती माया गोळा करतो हे पहाणे धक्कादायक आहे. केवळ दादर पश्चिम येथे सेनापति बापट मार्गावर, सुमारे ५०० च्या वर भाजी विक्रेते बसतात. फक्त ह्या भाजीवाल्यांकडूनच ५० लाखांच्यावर रक्कम जमा केली जाते. जी उत्तर विभागातील, रानडे रोड, केळकर मार्ग, दादर स्टेशन परिसर, कबुतर खाना परिसर, डिसिल्वा मार्ग येथून व माहीम दर्गा परिसरात रस्त्यावर रात्रौ उशिरापर्यत चालविल्या जाणारे अनधिकृत हाॅटेलवाले, यांच्याकडून जमा करण्यात येणारी रक्कमही दरमहा कोटींच्या घरात जाते. पालिकेच्या इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्गही ह्या भ्रष्ट उद्योगामधे हिरीरीने सहभागी होऊन आपआपल्या घरांवर सोन्याची कौले चढविण्यासाठी प्रयत्नशील असतात. अशा प्रकारे हा कोट्यावधींचा भ्रष्ट उद्योग अव्याहतपणे सुरू असतो. 'वर पर्यंत पोहोचवावे लागतात' असे सांगणारे ह्या मधे 'वरचेही' सामील आहेत याची कबुली देतात. 

ह्या मनोरंजक उद्योगाची माहीती घेताना, मध्यस्थाची भूमिका 'जमाल' कशा प्रकारे पार पाडतो हे पहाणे आवश्यक आहे. दि. १०. ९.२००७ च्या स्थापत्य समितीच्या बैठकीमधे नगरसेविका मीना देसाई ह्यांनी 'जमाल' च्या ह्या भूमिकेकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिकार्यांनी फेरीवाल्यांकडून हप्ते वसुली करण्यासाठी नेमलेला 'जमाल' आहें तरी कोण? अशी विचारणा त्यांनी केली होती. ह्या प्रश्नाला दि. २४.१०.०७ रोजी पालिकेकडून मासलेवाईक उत्तर देण्यात आले. कर्मचारीवृंदामधे श्री. जमाल नांवाची कोणतीही व्यक्ती कार्यरत नाही" असे नमूद करून या बाबत पोलीसांकडे पाठपुरावा करण्याचा सल्लाही मोंठ्या शहाजोगपणे देण्यास पालिकेचे अधिकारी कचरले नाहीत. एव्हढेच नव्हे तर या भानगडीत पडू नये असा मानभावी सल्लाही एका स्वपक्षीय आमदारामार्फत नगरसेविकेला देण्यात आला. २००७ साली ह्या घटनेवर पांघरूण घालणारे अधिकारी, 'जमाल' हा पालिकेच्या अधिकार्यांनी हप्ते वसुलीसाठी नेमलेला 'दलाल' आहे हे आता स्पष्ट झाल्यांने चांगलेच उघडे पडले आहेत. 

मुंबईतील रस्त्यांवरील अतिक्रमण रोखावयाचे असेल तर, राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अमलबजावणी होईल तेंव्हा होईल, परंतु प्रथम असे 'जमाल' नेमून परस्पर हप्ते वसुली करणार्या अधिकार्याना कठोर कारवाईचा 'जमालगोटा' द्यावयास हवा . ह्या साठी ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा आग्रह महापालिका आयुक्तांनीच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे धरावयास हवा म्हणजेच हप्ते वसुलीतून जमा झालेली कोट्यावधीची रक्कम वर पर्यंत म्हणजे नेमकी कुठपर्यंत जाते ते कळेल व ह्या भ्रष्टाचारास आळा घालण्याची योजना आखता येईल.

Monday, February 18, 2013

पिक्चर अभी बाकी है दोस्त!

एका मराठी चॅनलवर मिलिंद सरवटेची मुलाखत पाहीली. अँकर निलेश खरेने स्वत: कमी बोलून ही मुलाखत चांगलीच रंगवली. काॅर्पोरेट क्षेत्रातला ' मराठी बिग बाॅस' म्हणून आज मिलींदचा बोलबाला असला तरी माझ्यासाठी तो वर्गमित्रच! एकमेकांच्या बालपणाचे आम्ही साक्षीदार! शाळेमधे मी पहिल्या बाकावर व मिलींद माझ्या मागल्या बाकावर बसत असे. कायदा व सुव्यवस्था नांदावी म्हणून वर्गशिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांचा तो एक भाग होता. मिस्किलपणा, खोडकरपणा, टवाळक्या याबाबत आमचे बरेचसे गुण जुळत होते. किंचितसा फरक होता तो एवढयापुरेसाच की बर्याचदा कंटाळून शिक्षकांनी बाहेर काढल्याने माझा बर्यापैकी वेळ वर्गाबाहेर जात असे. बाहेरही मोठी मजा असे. बाहेरूऩ वर्गातील इतर मुलांना वाकुल्या दाखवून हसवणे अन् पुन्हा शिक्षकांचे लक्ष गेल्यास पश्चातापदग्ध चेहरा करून साळसूदपणाचा आव आणणे हे मला अवगत होते. परिणामी हसणार्यांपैकी कुणाला तरी शिक्षकांच्या अवकृपेने माझ्या सोबतीसाठी बाहेर येणे भाग पडे. मिलींद मात्र 'रंगुनी रंगात सार्या रंग माझा वेगळा' म्हणत या सार्यातून सहीसलामत सटकण्यात यशस्वी होई. महापालीकेच्या शाळेतून ७वी झालेल्या मिलिंदने, नव्यानेच आर्. एम्. भट शाळेमधे सुरू झालेल्या इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता ८वी च्या वर्गामधे प्रवेश घेतला होता. बुजर्या वाटणार्या व आम्ही विद्यार्थ्यांनी 'शामळू' ठरवलेल्या या 'म्युन्सिपालटीच्या' शाळेतून आलेल्या मुलाने हळूहळू आपले रंग दाखवण्यास सुरूवात केली. खोड्यांचे नवनवे अभिनव प्रकार शोधून काढण्याबरोबरच, िशक्षकानी विचारलेल्या प्रश्नाना उत्तरे देण्यासाठी मिलिंदचे बोट उंचावलेले असे. मिलींदने स्वत:ची अशी क्रेडिबिलीटी शिक्षकांसमोर निर्माण केली होती. मिलिंदने एखादा खोडकरपणा केला असावा किंवा इतरांना त्यासाठी उत्तेजन दिले असावे अशी पुसटशी देखिल शंका शिक्षकाना येत नसे. एक साम्य मात्र आम्ही दोघानी जपले ते म्हणजे मिलिंद वर्गामधे पहिला आला ......व मी ही पहिला आलो,शेवटून!

मिलिंदने काॅर्पोरेट क्षेत्रातला मराठी बिग बाॅस होण्याची बीजे रुजण्याचा तो काळ होता. प्रोत्साहन देणे, कामे करवून घेणे, उद्दिष्टे ठरवून त्या दिशेने प्रयत्नशील रहाणे हे सारे उत्क्रृष्ट व्यवस्थापकाला आवश्यक असलेले गुण शाळेमधे असतानाच मिलिंदमधे होते पण त्याचबरोबर 'रिस्क अॅनालीसिस' ची क्षमताही! खोडकरपणा करायचाय, बालपणाचा व शालेय जीवनाचा आनंदही लुटायचाय पण अभ्यासाला फाटा देण्याची रिस्क पत्करून नव्हे याची पुरेपूर जाण त्या वेळीही त्याला होती. आज ठामपणे मिलिंद म्हणतो मराठी माणूस रिस्क घेण्याची हिंमत बाळगतो परंतु दुर्दैवाने रिस्क अॅनालिसिस करण्यामधे कमी पडतो. कुठवर रिस्क घेतली पाहीजे याचं भानच त्याला रहात नाही. मिलिंदच्या या मुद्द्यामधे खरोखरच किती तथ्य आहे. वेडात मराठे वीर दौडले सात अशीच स्थिती बर्याचदा जिगरबाज मराठी माणसांच्या वाट्याला येते. पर्वत िशखरावर पोहोचून आभाळ ताब्यात घेण्याची जिद्द बाळगणारा कधी डगमगून कच खातो किंवा स्वत:च संयम गमावून आत्मघात करतो अशी अनेक उदाहरणे दिसतात. मराठी असल्यामुळे आपल्या वाट्याला संधी कमी येतात असे म्हणणार्यांचा समाचार घेताना ' हे थोतांड आहे ' असे मत मिलिंद व्यक्त करतो ते स्वानुभवाच्या जोरावरच! आपण मराठी आहोत हीच आपली जमेची बाजू म्हणजे अॅसेट आहे हे तो आवर्जून सांगतो तेंव्हा ऐकणार्या प्रत्येक मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरून येतो. मस्टरला फाटा देऊन,सहकारी कर्मचार्यांवर विश्वास टाकून कंपनीविषयी आपुलकीची भावना निर्माण करणारा मिलिंद मराठी माणसाना नियमावर बोट ठेवणे सोडून द्या असे सांगतो ते मराठी माणसांच्या अंगी असलेल्या सचोटीचे, चांगुलपणाचे चीज व्हावे या साठी! उदारीकरणामुळे, कुणी अमक्याचा नातेवाईक, तमक्याच्या जातीचा म्हणून काॅर्पोरेट क्षेत्रामधे प्रगति करूं शकणार नाही तर ज्ञान व परिश्रम या जोरावरच प्रगति साध्य आहे हे सांगणारा मिलिंदच खर्या अर्थाने आजच्या मराठी तरूणाचा वाटाड्या! सुशिक्षित मराठी तरूणांना आक्रमक भाषेने भुलवणार्या नेत्यांच्या जयघोषांच्या गर्जनांच्या कोलाहलामधे मिलिंदचे शब्द मला दूर वरून येऊन कानी पडणार्या सुरावटीसारखे भासतात. मिलिंदच्याच शब्दांमधे 'कॅलिफोर्नियाचा कोकण' करणारा सिलिकाॅन व्हॅलीमधे कर्तृत्वाचा झेंडा फडकवणारा मराठी तरूण कुठेही कमी पडण्याची सुतराम शक्यता नाही, गरज आहे ती मी चांगला आहे, सक्षम आहे व माझं मराठी असणं मला कमीपणा आणणारं नसून, ते माझं बलस्थान आहे हे स्वत:च्याच मनावर सतत बिंबवण्याची! मिलिंदचे हे शब्द मला आश्वासक वाटतात. मराठी तरूणांच्या, काॅर्पोरेट क्षेत्रातील व उद्योग क्षेत्रातील उज्वल भविष्याची हमी देतात.

कुठलीही वस्तू बाजारामधे आणण्यासाठी त्या वस्तूचा प्रथम ब्रँड तयार करावा लागतो. अगदी यशस्वी होऊ पहाणार्या माणसाला सुध्दा स्वत:ची ब्रँड व्हॅल्यू तयार करावी लागते व माणूस हे कळत नकळत करत असतो. शाळेमधे शिक्षकानी कौतुक करावं म्हणून, पुढे मित्रांमधे स्वत:चं वेगळेपण जपावं म्हणून, नंतर आवडणार्या व्यक्तीला आपलंसं करण्यासाठी, अशा अनेक वेळी माणूस स्वत:चं मार्केटिंग करत असतो, स्वत:चा ब्रँड निर्माण करून! हे स्पष्ट करून मिलिंद पुढे म्हणतो - "हेच तर करायचं असतं यशस्वी होण्यासाठी,गरज असते फक्त स्वत:ची स्ट्रेन्थ ओळखण्याची". लालबाग-परळ मधे बालपण गेलेल्या अनेकांना एक वेगळीच शक्ती या परिसराने दिली. आपल्याकडे गमावण्यासारखं फारसं काहीच नाही ह्याची जाणीव हीच ती शक्ती! ह्या शक्तीच्या जोडीला, सामान्य कुटुंबातील जन्म व रक्ताची अन् जिव्हाळ्याची नातीही सामान्यांशी! ह्याचं भय , ह्याचा न्यूनगंड ज्यांना वाटला नाही, ज्यांनी कष्टकरी जीवनाशी जुळलेली नाळ हेच लेणं मानून मिरवलं, त्यांनी यश मिळवलं. काॅर्पोरेट क्षेत्रामधे, काम करत असताना मिलिंद सरवटे ह्या उच्च पदावरील अधिकार्याला,सामान्य कर्मचार्यांपासून ते अतिवरिष्ठांपर्यंत कुणाशीही सहजगत्या संवाद साधणं सोपं गेलं ते यामुळेच! मिलिंदसारखा बिग बाॅस जेंव्हा याची कबुली देतो तेंव्हा अनेक धडपडणार्या तरूणांचा तो आयकाॅन ठरतो.

मिलिंदचे वडिल बेस्ट मधे कर्मचारी होते. लालबागच्या बेस्ट वसाहतीमधे रहणार्या मिलिंदने तिथे राहूनच आपलं चार्टर्ड अकाऊंटंटचं शिक्षण पूर्ण केलं. सीए च्या परिक्षेच्या निकालाच्या दिवशी त्याने फलकावर लावलेला निकाल पाहीला. आपलं नांव उत्तीर्णांच्या यादीत दिसलं नाही म्हणून बहुधा आपला पुरताच निकाल लागला असावा असे वाटून तो हिरमुसला व जड पावलांनी तेथून निघू लागला. एव्हढ्यातच भेटलेल्या एका मित्राने त्याचे कडकडून मिठी मारून अभिनंदन केले. " मित्रा तू पहिला आलायस्, त्या तिथे एका वेगळ्या फलकावर अभिनंदनासहित तुझ्या निकाल लावला आहे" मित्र म्हणाला. मिलिंद म्हणतो "काही क्षण माझा विश्वासच बसेना.परंतु या धक्क्यातून सावरतानाच मला जाणीव झाली की आपल्यामधे काही वेगळीच क्षमता आहे. ही जाणीव होण्यासाठी झालेल्या उशीरामुळे माझ्याकडून अनेक उत्तम संधींकडे दुर्लक्ष झालं परंतु त्यानंतर मात्र आलेल्या प्रत्येक संधीला आत्मविश्वासाने सामोरा गेलो". आज पालकही सजग झाले आहेत. मुलांचा बुध्द्यांक जाणून घेऊन, विविध चाचण्यांद्वारे कल समजून घेऊन तसेच मुलांची आवड लक्षांत घेऊन त्यांना स्वत:चे क्षेत्र निवडण्यासाठी मार्गदर्शन व मदत करण्याची भूमिका बहुतांश सुशिक्षित पालकवर्ग घेताना दिसतो. अशा पद्धतीने स्वत:च्या भवितव्याचा मार्ग ठरवणारे तरूण केवळ पैसे कमावण्यासाठी नव्हे तर ध्येयपूर्तीचा आनंद मिळवण्यासाठीही काॅर्पोरेट क्षेत्रामधे पुढे येतील हा मिलिंदला वाटणारा विश्वास!

शाळेत असताना आम्ही विद्यार्थी एकमेकांच्या उपद्रवी खोड्या करत असू. बाकांवर चिंगम लावणे व बसणार्याच्या पँटला चिंगम चिकटल्यावर त्याची टर उडवणे हा नित्याचा सर्वांच्याच बाबतीत घडणारा प्रकार होता. याचा त्या वर्ग मित्रालाच नव्हे तर घरी त्याच्या आईलाही पँट धुताना त्रास होत असेल या कल्पनेने मिलिंदने एक अभिनव मार्ग शोधला. वर्गमित्रांची टर उडवण्याचा आनंद मनमुराद घेता यावा व त्यातील उपद्रव काढून टाकावा हा त्यामागचा उद्देश! रफ वहीच्या कागदाच्या निरनिराळ्या आकाराच्या व वेगवेगळ्या प्रकारांच्या सुरनळ्या करून, वर्गातील मुलांच्या पँटला कमरपट्ट्यामधे, मागच्या खिशामधे वा काॅलरच्या पट्टीमधे त्यांच्या नकळत खोवून ठेवणे व त्याला तशा अवस्थेत खांद्यावर हात ठेवून सर्वत्र फिरवणे हा एक नवा प्रकार त्याने आम्हाला दाखवला. ह्या उद्योगाचे 'तोफा लावणे' असे नामकरणही त्याने करून टाकले. तोफा लावण्याचे हे 'इनोव्हेशन' आम्हा सार्याना खूपच आवडले आणी हा उद्योग अगदी शालेय जीवन संपेपर्यंत चांगलाच फोफावला. इनोव्हेशन बद्दल मिलिंदची मुळातच असलेली ओढ हीच त्याची आज मेरिको इनोव्हेशन फाऊंडेशनला वाहून घेण्यापाठची प्रेरणा असावी.
इयत्ता ८ वी मधे एकत्र आलेले आम्ही वर्ग-मित्रमैत्रिणी गेली ४० वर्षे आमची मैत्री एंजाॅय करतोय! ंएकत्र येतो, पिकनिक्सना जातो, एकमेकांचे आनंद सोहळे साजरे करतो, शाळेसाठी काही करण्याचा प्रयत्न करतो, शिक्षकांची कृतज्ञतापूर्वक आठवण ठेवतो याचं अनेकांना आश्चर्य वाटतं. परंतु या मागे असते ती आमची धडपड, हरवलेलं सुंदर बालपण शोधण्याची! इतरांसाठी काॅर्पोरेट क्षेत्रातील मराठी बिग बाॅस असलेला मेरिको चे चीफ फायनान्स अाॅफीसर मिलिंद सरवटेही या शोधयात्रेमधे सहभागी होतात, तोच मिस्किलपणा व खोडकरपणा घेऊन! मिलिंद आमचा मित्र असल्याचा अभिमान आहेच, परंतु एव्हढ्यावरच आम्ही समाधानी नाही कारण ही चीज काय आहे हे आम्हीच तर ओळखतो. मराठी असल्याचा सार्थ अभिमान बाळगणार्या व लालबाग-परळ या कामगार भागाची लाभलेली पार्श्वभूमी हेच आपले बलस्थान वा अॅसेट मानणार्या मिलिंदने आता काॅर्पोरेट क्षेत्रातील कर्तबगार मराठी बिग बाॅसेस् ची यादी वाढती रहावी या साठी प्रयत्नशील रहाणे आवश्यक आहे. इनोव्हेशनचा, अभिनव कल्पनांचा मागोवा घेणार्या व मराठी माणसाची मानसिकता व काॅर्पोरेट क्षेत्राची गरज ओळखून मराठी तरूणाना योग्य दिशा दाखवण्याची कळकळ असणार्या मिलिंद सरवटेंसारख्या सर्वच मराठी बिग बाॅसेसनी आता कंबर कसण्याची गरज आहे. म्हणूनच मिलिंद मित्रा, तू शाहरूख खानच्या शब्दांत म्हणतोस तसा "पिक्चर अभी बाकी है दोस्त" !










Friday, December 28, 2012

चहाटळपणा आता पुरे, विचारांची लढाई लढा!

मुंबई महानगरपालीकेतील विरोधी पक्ष नेत्यांनी शिवाजी पार्क च्या प्रत्येक प्रवेशद्वारावर नामफलक लावण्याची मागणी करून आपण विनोदी असल्याचेही दाखवून दिले आहे. ज्याची गरज काँग्रेसलाच नव्हे तर गेल्या कित्येक दशकात कुणालाही वाटली नाही, अशी मागणी केवळ कुरापत काढण्यासाठीच केली जात आहे व त्या पाठी पालिका वर्तुळामधे अभ्यासपूर्ण रीतीने नागरी समस्या मांडण्यामधे व भ्रष्टाचारावर तुटून पडण्यामधे क़ायम अपयशी ठरलेले विरोधी पक्ष नेते नव्हे तर प्रदेश काँग्रेसचे अपरिपक्व नेतृत्व आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मुंबई महापालीकेमधे आता अन्य कोणत्याही नागरी समस्या ऊरल्या नसून 'शिवाजी पार्क' चे नामफलक हेच काम बाकी आहे असे मानणे हास्यास्पद व बालीश आहे हे या नेत्यांना समजावून सांगण्याची आवश्यकता आता निर्माण झाली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर, शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेऊन मनाचा उमदेपणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दाखवला. शिवाजी पार्क वर अंत्यसंस्कारास परवानगी देण्याच्या चाकोरीबाहेरच्या निर्णयाबरोबरच, स्मारकासाठी नियमबाह्य पध्दतीने जागा देता येणार नाही हे ठामपणे स्पष्ट करून कणखरपणाचे दर्शनही घडवले. असे असताना 'ठाकरे पार्क' होऊ देणार नाही अशा राणा भीमदेवी थाटाच्या घोषणा देऊन काय साध्य करावयाचे होते? मुख्यमंत्र्यांनी आपल्या निर्णय क्षमतेतून कमावलेले गमावण्याचा कर्मदरिद्रीपणा,प्रदेश काँग्रेस केवळ आपण सेनेशी दोन हात करण्यासाठी सज्ज आहेत हे दाखविण्याच्या खटाटोपापोटी करीत आहे की मुख्यमंत्र्यांविरूध्द चालविलेल्या अंतर्गत राजकारणाचा हा परिपाक आहे ? असा प्रश्न राजकीय वर्तुळातील व प्रसार माध्यमातीलही अनेकांना पडणे साहजिकच आहे.

स्मारकाच्या प्रश्नावर दोन पावले मागे येऊन तसेच शिवाजी पार्क चे नामकरण शिवतीर्थ करण्याचे सद्यस्थितीत स्थगित करून सेनेनेही राजकीय शहाणपण दाखविले आहे. परंतु शिवतीर्थ या नावाला विरोध करून प्रदेश काँग्रेसकडून अज्ञान प्रकट केले जात आहे. सेनेच्या द्वेषापोटी केवळ विरोधाला विरोध म्हणून शिवतीर्थ असे नामकरण करण्यास विरोध करणे, म्हणजे विचारांची लढाई म्हणजे नेमके काय हेच प्रदेश काँग्रेसच्या बोलभांडाना कळले नसावे. शिवतीर्थ ह्या नांवाची कल्पना बाळासाहेबांची नसून, संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार आचार्य अत्रे यांची आहे ह्याचे ज्ञान कदाचित या उतावळ्यांना नसावे, अन्यथा शिवतीर्थ नांव देणे म्हणजे महाराष्ट्राच्या ११ कोटी जनतेचा अपमान ठरेल वगैरे खुळचट कल्पना मांडण्याची त्यांची हिंमत झाली नसती. आचार्य अत्रेंच्या महाराष्ट्र निष्ठेबद्दल व शिवभक्तीबद्दल शंका घेऊ शकेल असा अस्सल मराठी माणूस अजून जन्माला आला नाही व पुढील दहा हज़ार वर्षात येणार नाही. स्वातंत्र्यपूर्व काळामधे इंग्रजाळलेल्या वातावरणामधे, माहीम पार्क हे नांव बदलून शिवाजी पार्क असे देण्यात आले. ब्रिटीशांची शिवाजी महाराजांबद्दलची मते,आदर व आस्था, त्यांनी लिहीलेल्या इतिहासाच्या भाकड कथांमधूनच स्पष्ट होते व त्याचेच प्रतिबिंब शिवरायांचा उल्लेख 'शिवाजी' असा एकेरी करण्यामधे पडले असावे. प्रामुख्याने परिसरामधे मराठी भाषिकांची लोकवस्ती असताना या मैदानासाठी 'पार्क' हा इंग्रजी शब्द वापरणे कोणत्या सच्च्या मराठी माणसाला गैर वाटणार नाही? या पार्श्वभूमीवर, शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रातील भव्य स्मारकामुळे पावित्र्य लाभलेल्या या तीर्थ स्थळास शिवतीर्थ म्हणणे म्हणजे खर्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृती अधिक आदरपूर्वक जपणारे ठरेल. शिवाजी पार्क या नांवामधल्या शिवाजी या पूर्ण नांवाचे 'शिव' हे लघुरुप करुं नये असे मत मांडणारेही काही आहेत. परंतु शिव जयंती, शिव छत्रपती, शिवराय, शिव शंभू राजा, शिवशाही असे अनेक शब्द प्रचलित आहेत, अगदी शासकीय कारभारामधेदेखिल! 'शिव' हा शब्द शिवाजी महाराजांसाठीच वापरला जात आहे. असे असताना शिवतीर्थ नावाला आक्रस्ताळेपणाने विरोध करण्याने काँग्रेसच्याच प्रतिष्ठ्ेला बाधा येईल.

सत्ताधारी राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसकडून नेहमीच परिपक्व व भारदस्त भूमिकांची, जनतेची अपेक्षा असते, थिल्लर व बालीश विचारांची नव्हे! मुंबईच्या विकासाच्या प्रश्नांवर, नागरी समस्यांच्या सोडवणुकीवर, पालीकेतील काँग्रेस पक्षाने ठोस भूमिका घेण्याची,पालीकेतील सत्ताधारी युतीच्या भ्रष्टाचारावर तुूटून पडण्याची आज आवश्यकता असताना नाहक कुरापती काढण्याचा चहाटळपणा आता पुरे! मुंबईचे प्रश्न सोडविण्यासाठी व धर्मांधतेविरूध्द, जातीयतेविरुध्द लढण्यासाठी आणी काँग्रेसची जनताभिमुख धोरणे लोकांपर्यंत पोहोचविणे या साठी वेळ व शक्ती खर्च करावी हे जास्त बरे!

Tuesday, November 20, 2012

महाराष्ट्राच्या विकासाच्या योजना हे बाळासाहेबांचे स्मारक!

बाळासाहेबांच्या महायात्रेला महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून आलेल्या लाखोंची गर्दी लोटली. हे सारे फक्त शिवसैनिक नव्हते तर सर्व पक्षांचे, विचारांचे, धर्म व जातींचे बाळासाहेबांवर प्रेम करणारेही होते. त्यांत भक्त होते,अनुयायी होते,चाहते होते,मित्र होते आणी आयुष्यभर बाळासाहेबांसोबत राजकीय वैर असलेले शत्रूही होते. वैर्यांनीही प्रेम करावं असा 'दिलदार माणूस' होते बाळासाहेब! तरी देखिल बाळासाहेबांची चिता पूर्णपणे विझतही नाही तोवर बाळासाहेबांच्या स्मारकावरून वाद सुरु व्हावा ही घटना दुर्दैवी आहे़. म्हणूनच हा वाद सर्व संबंधितंानी ताबडतोब थांबविणे आवश्यक आहे. त्याकरिता दोन्ही बाजूंनी समंजसपणा दाखवून महाराष्ट्राच्या महान नेत्याचे उचित व प्रेरणादायी स्मारक एक नव्हे तर अनेक कशी होतील याची योजना आखावयास हवी.

बाळासाहेबांचे जीवन म्हणजे धगधगते यज्ञकुंडच! शिवाजी पार्कवर म्हणजेच शिवतीर्थावर जर बांधकाम स्वरूपात स्मारक शक्य नसेल तर बाळासाहेबांच्या दैवताजवळच 'धगधगते यज्ञकुंड' तयार करून तेथे समिधा अर्पण करण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करणे उचित ठरेल . याकरिता कमी जागा लागेल व मैदान प्रेमीनाही दिलासा मिळेल, अर्थात् सर्व कायदेशीर परवानग्या घेऊनच ! तसे म्हटले तर ज्या शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या गर्जना घुमत असत , त्या जिवाचा कान करून ऐकण्यासाठी लाखोंची गर्दी लोटत असे ते संपूर्ण शिवतीर्थ हेच बाळासाहेबांचे खरे स्मारक! म्हणून अधिकृतपणे 'शिवतीर्थ हे नांव प्रथम जाहीर करणे ही बाळासाहेबांना खरी श्रध्दांजली!

मुंबईमध्ये बाळासाहेबांचे अतिभव्य स्मारक व्हावे ही केवळ शिवसैनिकांची नव्हे तर सर्वांचीच अगदी शासनाचीही इच्छा अाहे. म्हणूनच दादर भागातच हे स्मारक ऊभे करण्या संबंधीही विचार करता येऊ शकेल. इंदू मिलच्या बहुचर्चित जमिनीवर डाॅ बाबासाहेब आंबेडकर व बाळासाहेब यांचे एकत्रितपणे स्मारक झाल्यास एक आगळावेगळा समतेचा संदेश देणारे स्मारक म्हणून संपूर्ण देशाला प्रेरणादायी ठरेल. याचाही विचार समंजसपणे करावयास हरकत नाही.

बाळासाहेबांची स्मारके व्हावयास ज़रूर हवी परंतु खर्या अर्थाने बाळासाहेबांची स्मारके आहेत, तो मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, ५५ ऊड्डाण पूल, झोपडपट्टी पुनर्वसन योजना जी बाळासाहेबांच्या कर्तृत्वाची व दूरदर्शीपणाची साक्ष देत आहेत, महाराष्ट्राच्या विकासाची प्रेरणा देत आहेत. विकासाच्या अशाच भव्य दिव्य योजना हेच महाराष्ट्राच्या हिताची सदैव तळमळ जपणार्या महान नेत्याचे, खरेखुरे स्मारक होय!

Friday, November 16, 2012

बाळासाहेब तुमचे छत्र अजूनही हवे आहे!

दुपारी  चार वाजता  'मातोश्री ' वर पोहोचलो. शिवसैनिक,शिवसेना नेते आणि पोलिसांच्या सहकार्यामुळे प्रचंड गर्दी असूनही उद्धवजीना भेटणे शक्य झाले. उद्धवजींच्या भेटीच्या दालनामध्ये मा. अंतुले साहेब, संजय राउत ,अनंत तरे, दिवाकर रावते ,विनोद घोसाळकर आदी नेते मंडळी बसलेली होती. अन्तुलेसाहेबांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द, बाळासाहेबांचा व त्यांचा स्नेह, रायगड जिल्ह्याचे राजकारण ई. रंगलेल्या गोष्टींमुळे माझ्याही मनावरचा तणाव  थोडा हलका झाला. परवापासून पसरलेल्या अफवांमुळे  भेदरलेले मन थोडे ताळ्यावर आले. उद्धवजी दालनात येताच मात्र पुन्हा वातावरण धीरगंभीर झाले. अनेक रात्रींचे जागरण व जन्मदात्या पित्याची मृत्यूबरोबर सुरू असलेली झुंज याचे प्रचंड ताण तणाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होते. बाळासाहेबांच्या तब्येतीची माहिती देतानाच, हा तणाव कणखरपणे बाजूला सारून आपण केवळ बाळासाहेबांचे नव्हे तर शिवसेनाप्रमुखांचे पुत्र आहोत, याची जाणीव म्हणूनच  परिस्थितीला सामोरे जाण्याचे धैर्यही त्यांच्या  वागण्याबोलण्यातून जाणवत होते. बाळासाहेबांची नाडी, रक्तदाब व्यवस्थित आहे व ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत हे त्यांनी सांगितले. अंतुले साहेबांनी वडिलकीच्या नात्याने स्वतःच्या तब्येतीचीही  काळजी घ्या असे सुचविले. त्यावर जरा डोळा लागणेही शक्य नाही आणि त्याला काही इलाज नाही असे उद्धवजी म्हणाले. बाळासाहेबांची दुर्दम्य इच्छाशक्ती व लाखोंच्या प्रार्थना हे संकट परतवून लावतील हा विश्वास घेउनच उद्धवजींचा निरोप घेतला. परमेश्वर उद्धवजीनाही शक्ती देवो!
बाहेर पडताना माझे ऐन तारुण्यातले म्हणजे विशीतले दिवस आठवले. तेंव्हा मी परळला राहत होतो. तमाम तरूण  वर्ग बाळासाहेबांच्या विचारांनी भारलेला होता. बाळासाहेबांच्या शब्दासाठी जीव द्यायला आणि जीव घ्यायलाही  अनेक तरूण  तयार असत. माझ्याही जीवनावर बाळासाहेबांचा मोठा प्रभाव पडला. राजकारणाची गोडी निर्माण झाली ती घरामध्ये माझे कम्युनिस्ट विचारांचे वडील व मैदानावरचे  बाळासाहेब यांच्यामुळेच ! पुढे इंदिराजीन्च्या हत्येमुळे संदर्भ बदलले. राजकारणाच्या वाटाही  बदलल्या. बाळासाहेबांच्या विचारांबाबत मतमतांतरे झाली. पण एक गोष्ट मात्र मनावर ठसून राहिली ती म्हणजे मुंबई मराठी माणसाचीच आहे व मुंबई मध्ये मराठी माणसाचा, भाषेचा आणि संस्कृतीचा सन्मान राखला गेलाच पाहिजे हे सांगणारा नेता एकच 'बाळासाहेब ठाकरे'!
बाळासाहेब तुम्ही शतायुषी व्हा! महाराष्ट्राला अजूनही तुमचे छत्र हवे आहे.