दुपारी चार वाजता 'मातोश्री ' वर पोहोचलो. शिवसैनिक,शिवसेना नेते आणि पोलिसांच्या सहकार्यामुळे प्रचंड गर्दी असूनही उद्धवजीना भेटणे शक्य झाले. उद्धवजींच्या भेटीच्या दालनामध्ये मा. अंतुले साहेब, संजय राउत ,अनंत तरे, दिवाकर रावते ,विनोद घोसाळकर आदी नेते मंडळी बसलेली होती. अन्तुलेसाहेबांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द, बाळासाहेबांचा व त्यांचा स्नेह, रायगड जिल्ह्याचे राजकारण ई. रंगलेल्या गोष्टींमुळे माझ्याही मनावरचा तणाव थोडा हलका झाला. परवापासून पसरलेल्या अफवांमुळे भेदरलेले मन थोडे ताळ्यावर आले. उद्धवजी दालनात येताच मात्र पुन्हा वातावरण धीरगंभीर झाले. अनेक रात्रींचे जागरण व जन्मदात्या पित्याची मृत्यूबरोबर सुरू असलेली झुंज याचे प्रचंड ताण तणाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होते. बाळासाहेबांच्या तब्येतीची माहिती देतानाच, हा तणाव कणखरपणे बाजूला सारून आपण केवळ बाळासाहेबांचे नव्हे तर शिवसेनाप्रमुखांचे पुत्र आहोत, याची जाणीव म्हणूनच परिस्थितीला सामोरे जाण्याचे धैर्यही त्यांच्या वागण्याबोलण्यातून जाणवत होते. बाळासाहेबांची नाडी, रक्तदाब व्यवस्थित आहे व ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत हे त्यांनी सांगितले. अंतुले साहेबांनी वडिलकीच्या नात्याने स्वतःच्या तब्येतीचीही काळजी घ्या असे सुचविले. त्यावर जरा डोळा लागणेही शक्य नाही आणि त्याला काही इलाज नाही असे उद्धवजी म्हणाले. बाळासाहेबांची दुर्दम्य इच्छाशक्ती व लाखोंच्या प्रार्थना हे संकट परतवून लावतील हा विश्वास घेउनच उद्धवजींचा निरोप घेतला. परमेश्वर उद्धवजीनाही शक्ती देवो!
बाहेर पडताना माझे ऐन तारुण्यातले म्हणजे विशीतले दिवस आठवले. तेंव्हा मी परळला राहत होतो. तमाम तरूण वर्ग बाळासाहेबांच्या विचारांनी भारलेला होता. बाळासाहेबांच्या शब्दासाठी जीव द्यायला आणि जीव घ्यायलाही अनेक तरूण तयार असत. माझ्याही जीवनावर बाळासाहेबांचा मोठा प्रभाव पडला. राजकारणाची गोडी निर्माण झाली ती घरामध्ये माझे कम्युनिस्ट विचारांचे वडील व मैदानावरचे बाळासाहेब यांच्यामुळेच ! पुढे इंदिराजीन्च्या हत्येमुळे संदर्भ बदलले. राजकारणाच्या वाटाही बदलल्या. बाळासाहेबांच्या विचारांबाबत मतमतांतरे झाली. पण एक गोष्ट मात्र मनावर ठसून राहिली ती म्हणजे मुंबई मराठी माणसाचीच आहे व मुंबई मध्ये मराठी माणसाचा, भाषेचा आणि संस्कृतीचा सन्मान राखला गेलाच पाहिजे हे सांगणारा नेता एकच 'बाळासाहेब ठाकरे'!
बाळासाहेब तुम्ही शतायुषी व्हा! महाराष्ट्राला अजूनही तुमचे छत्र हवे आहे.
No comments:
Post a Comment