मुंबई महानगरपालीकेतील विरोधी पक्ष नेत्यांनी शिवाजी पार्क च्या प्रत्येक प्रवेशद्वारावर नामफलक लावण्याची मागणी करून आपण विनोदी असल्याचेही दाखवून दिले आहे. ज्याची गरज काँग्रेसलाच नव्हे तर गेल्या कित्येक दशकात कुणालाही वाटली नाही, अशी मागणी केवळ कुरापत काढण्यासाठीच केली जात आहे व त्या पाठी पालिका वर्तुळामधे अभ्यासपूर्ण रीतीने नागरी समस्या मांडण्यामधे व भ्रष्टाचारावर तुटून पडण्यामधे क़ायम अपयशी ठरलेले विरोधी पक्ष नेते नव्हे तर प्रदेश काँग्रेसचे अपरिपक्व नेतृत्व आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मुंबई महापालीकेमधे आता अन्य कोणत्याही नागरी समस्या ऊरल्या नसून 'शिवाजी पार्क' चे नामफलक हेच काम बाकी आहे असे मानणे हास्यास्पद व बालीश आहे हे या नेत्यांना समजावून सांगण्याची आवश्यकता आता निर्माण झाली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर, शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेऊन मनाचा उमदेपणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दाखवला. शिवाजी पार्क वर अंत्यसंस्कारास परवानगी देण्याच्या चाकोरीबाहेरच्या निर्णयाबरोबरच, स्मारकासाठी नियमबाह्य पध्दतीने जागा देता येणार नाही हे ठामपणे स्पष्ट करून कणखरपणाचे दर्शनही घडवले. असे असताना 'ठाकरे पार्क' होऊ देणार नाही अशा राणा भीमदेवी थाटाच्या घोषणा देऊन काय साध्य करावयाचे होते? मुख्यमंत्र्यांनी आपल्या निर्णय क्षमतेतून कमावलेले गमावण्याचा कर्मदरिद्रीपणा,प्रदेश काँग्रेस केवळ आपण सेनेशी दोन हात करण्यासाठी सज्ज आहेत हे दाखविण्याच्या खटाटोपापोटी करीत आहे की मुख्यमंत्र्यांविरूध्द चालविलेल्या अंतर्गत राजकारणाचा हा परिपाक आहे ? असा प्रश्न राजकीय वर्तुळातील व प्रसार माध्यमातीलही अनेकांना पडणे साहजिकच आहे.
स्मारकाच्या प्रश्नावर दोन पावले मागे येऊन तसेच शिवाजी पार्क चे नामकरण शिवतीर्थ करण्याचे सद्यस्थितीत स्थगित करून सेनेनेही राजकीय शहाणपण दाखविले आहे. परंतु शिवतीर्थ या नावाला विरोध करून प्रदेश काँग्रेसकडून अज्ञान प्रकट केले जात आहे. सेनेच्या द्वेषापोटी केवळ विरोधाला विरोध म्हणून शिवतीर्थ असे नामकरण करण्यास विरोध करणे, म्हणजे विचारांची लढाई म्हणजे नेमके काय हेच प्रदेश काँग्रेसच्या बोलभांडाना कळले नसावे. शिवतीर्थ ह्या नांवाची कल्पना बाळासाहेबांची नसून, संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार आचार्य अत्रे यांची आहे ह्याचे ज्ञान कदाचित या उतावळ्यांना नसावे, अन्यथा शिवतीर्थ नांव देणे म्हणजे महाराष्ट्राच्या ११ कोटी जनतेचा अपमान ठरेल वगैरे खुळचट कल्पना मांडण्याची त्यांची हिंमत झाली नसती. आचार्य अत्रेंच्या महाराष्ट्र निष्ठेबद्दल व शिवभक्तीबद्दल शंका घेऊ शकेल असा अस्सल मराठी माणूस अजून जन्माला आला नाही व पुढील दहा हज़ार वर्षात येणार नाही. स्वातंत्र्यपूर्व काळामधे इंग्रजाळलेल्या वातावरणामधे, माहीम पार्क हे नांव बदलून शिवाजी पार्क असे देण्यात आले. ब्रिटीशांची शिवाजी महाराजांबद्दलची मते,आदर व आस्था, त्यांनी लिहीलेल्या इतिहासाच्या भाकड कथांमधूनच स्पष्ट होते व त्याचेच प्रतिबिंब शिवरायांचा उल्लेख 'शिवाजी' असा एकेरी करण्यामधे पडले असावे. प्रामुख्याने परिसरामधे मराठी भाषिकांची लोकवस्ती असताना या मैदानासाठी 'पार्क' हा इंग्रजी शब्द वापरणे कोणत्या सच्च्या मराठी माणसाला गैर वाटणार नाही? या पार्श्वभूमीवर, शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रातील भव्य स्मारकामुळे पावित्र्य लाभलेल्या या तीर्थ स्थळास शिवतीर्थ म्हणणे म्हणजे खर्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृती अधिक आदरपूर्वक जपणारे ठरेल. शिवाजी पार्क या नांवामधल्या शिवाजी या पूर्ण नांवाचे 'शिव' हे लघुरुप करुं नये असे मत मांडणारेही काही आहेत. परंतु शिव जयंती, शिव छत्रपती, शिवराय, शिव शंभू राजा, शिवशाही असे अनेक शब्द प्रचलित आहेत, अगदी शासकीय कारभारामधेदेखिल! 'शिव' हा शब्द शिवाजी महाराजांसाठीच वापरला जात आहे. असे असताना शिवतीर्थ नावाला आक्रस्ताळेपणाने विरोध करण्याने काँग्रेसच्याच प्रतिष्ठ्ेला बाधा येईल.
सत्ताधारी राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसकडून नेहमीच परिपक्व व भारदस्त भूमिकांची, जनतेची अपेक्षा असते, थिल्लर व बालीश विचारांची नव्हे! मुंबईच्या विकासाच्या प्रश्नांवर, नागरी समस्यांच्या सोडवणुकीवर, पालीकेतील काँग्रेस पक्षाने ठोस भूमिका घेण्याची,पालीकेतील सत्ताधारी युतीच्या भ्रष्टाचारावर तुूटून पडण्याची आज आवश्यकता असताना नाहक कुरापती काढण्याचा चहाटळपणा आता पुरे! मुंबईचे प्रश्न सोडविण्यासाठी व धर्मांधतेविरूध्द, जातीयतेविरुध्द लढण्यासाठी आणी काँग्रेसची जनताभिमुख धोरणे लोकांपर्यंत पोहोचविणे या साठी वेळ व शक्ती खर्च करावी हे जास्त बरे!
No comments:
Post a Comment