Monday, May 21, 2018

मदतीचा हात....

कृष्णा वाखुरे ह्या एम्ए करणाऱ्या अंध विद्यार्थ्याची बॅग रेल्वे स्टेशनवर हिसकावून घेतली गेली. बॅगमधे असलेल्या लॅपटाॅपसोबत त्याचे महत्वाचे साधन ॲंजेलो प्लेयर गेले. त्यामुळे कृष्णासमोर अडचणी निर्माण झाल्या. अंध विद्यार्थ्यांसाठी हे उपकरण वरदानच असते कारण त्याचा उपयोग अभ्यासाकरिता होतो.  हतबल झालेल्या कृष्णाने ही अडचण माझ्या कानावर घातली. योगायोगाने माझे ज्येष्ठ मित्र सुप्रसिध्द वास्तुविशारद व अभा नाट्य परिषद, अभा मराठी साहित्य महामंडळ, मुंबई मराठी साहित्य संघ, आदी विविध संस्थांमधे कार्यरत श्री गुरूनाथ दळवी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी त्यांना मी फोन केला. दळवीनी माझ्याजवळ पंचाहत्तरीनिमित्त कुणा संस्था वा व्यक्तींना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली व नांवे सुचविण्यास सांगितले. मी दोन सामाजिक संस्थांचे नांव सुचवतानाच कृष्णा वाखुरे ह्या अंध परंतु होतकरू व महत्वाकांक्षी विद्यार्थ्याला मदत करण्याची विनंती केली. कृष्णा हा मराठवाड्यातील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलागा! दारिद्र्य कुटुंबाच्या पाचवीलाच पुजलेले. कृष्णा मुंबईत शिकतो व सरकारी वसतीगृहात रहातो. ट्रेनमधे पुस्तके विकून गुजराण करतो व थोडे पैसे गावी कुटुंबाला पाठवतो. परंतु शिकून सरकारी अधिकारी होण्याची जिद्द त्याने जोपासली आहे. कृष्णाची कहाणी ऐकून दळवींनी तात्काळ होकार दिला. दळवीनी स्वत: नरिमन पाॅईंट येथे जाऊन उत्तम उपकरण खरेदी केले व कृष्णाला घरी बोलावून दिले देखिल! गुरूनाथ दळवींची कृष्णाच्या शिक्षणाला हातभार लावणारी ही कृती मनाला भावली. कृष्णाला मदतीचा हात देऊन त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणाऱ्या दळवी दांपत्याने समाजामधे दातृत्व आहे तोपर्यंत डरण्याचे कारण नाही हा संदेशच जणू दिला.

No comments:

Post a Comment