ती आई होती म्हणुनी......
-अजित सावंत
अतुलची आई देवाघरी गेली. अतुलने हे सांगितलं अाणी माझ्या नजरेसमोर माझे बालपण व शाळेतल्या दिवसातील आठवणी उभ्या राहिल्या. अतुल केंकरे माझा शाळेतील वर्गमित्र! त्याची आजी त्याच्या काकांसोबत मी रहात असलेल्या चाळीत रहात असे. अतुल शेजारच्या चाळीत रहात असला तरी आजीकडे येऊन तिथल्या मुलांसोबत तो जास्त रमत असे. म्हणूनच अतुलची व माझी मैत्री घट्ट होत गेली. अतुल व माझे स्वभाव टोकाचे वेगळे होते. अतुल शांत स्वभावाचा, बुध्दिबळ, कॅरम, क्रिकेट ह्या खेळांमधे रमणारा, वेळच्या वेळी गृहपाठ व अभ्यास मन लावून करणारा व कुणाच्या अध्यात ना मध्यात, अशा स्वभावाचा व म्हणून सर्वांनाच आवडत असे. माझा स्वभाव मात्र बराचसा मस्तीखोर, अभ्यासापासून फटकून राहून खोड्या करण्यातच आनंद घेणारा व बाॅक्सिंग हा धसमुसळेपणाचा आक्रमक खेळ सोडून इतर कोणत्याही खेळामधे फारसा रस नसणारा, असा अतुलच्या स्वभावाच्या विरुध्द टोकाचा होता. तरीही आमची मैत्री घट्ट होती व आजपर्यंत म्हणजे गेली ५० वर्षे तशीच जिवाभावाची राहिली. बालपणीच्या त्या दिवसांमधे, माझ्या शाळेतील 'उद्योगांमुळे' शाळेतील शिक्षक वर्ग त्रस्त असे. परंतु माझ्या खोड्या करण्याच्या व त्यातून नामानिराळा रहाण्याच्या माझ्या युक्त्याप्रयुक्त्यांचा आनंद माझे वर्गमित्र-मैत्रिणीही घेत असत. क्वचित प्रसंगी त्यांनाही माझ्या खोड्यांमुळे शिक्षकांकडून प्रसाद मिळे. पालकांना बोलावूनही घेतले जात असे. काही मित्रांच्या पालकांकडून माझ्यापासून दूर रहाण्याबाबत ताकीदही मिळे. अशा परिस्थितीत अतुल मात्र माझ्याशी मैत्री निभावून नेत माझा नेहमीच अपूर्ण रहाणारा अभ्यास पूर्ण करून घेण्यास मला जवळजवळ सक्ती करत असे. अतुलची आई मात्र माझे गुणदोष लक्षांत घेऊनही आमच्या मैत्रीच्या आड येत नसे. किंबहुना अतुलने व मी एकत्र अभ्यास करावा, एकमेकांना अभ्यासात मदत करावी असा तिचा कटाक्ष असे. अर्थात नियमित अभ्यास करणाऱ्या अतुलला मी काय मदत करणार कपाळ! परंतु मला अतुल रहात असलेल्या चाळीच्या प्रशस्त गच्चीत खेळायला जाण्याचे व शाळेतून परतल्यावर अतुलच्या घरी त्याच्या आईच्या हातचे खाणे ह्याचे मोठे आकर्षण असे. शाळा सुटली की मी घरी पोहोचल्यावर थोड्या वेळेतच शेजारच्या चाळीतून अतुल हाक देई. ती ऐकून माझ्या खोलीसमोर रहाणारी प्रेमळ रजनीकाकी 'अजिताक बोलय, अतुल आवाज देताहा' म्हणून निरोप देई. मी तसाच दप्तर टाकून अतुलच्या घराकडे धावत सुटे! अतुलच्या घरी पोहोचल्यावर, दहीवडे, इडली सांबार, डोसे, कांदेपोहे ह्या पैकी एखादा अतुलच्या आईने केलेला चविष्ट पदार्थ समोर येई. अतुलच्या घराला रस्त्याच्या दिशेला एक छोटी गॅलरी होती. तेथे बसून रस्त्यावरच्या गंमतीजमती पहात अतुल व मी ह्या पदार्थांचा आस्वाद घेत असू. अतुलची आई प्रेमाने आग्रह करकरून खाऊ घाली. माझ्या घरची आर्थिक स्थिती यथातथाच असल्याने व माझी आई नोकरी करीत असल्याने वेळेअभावी व आर्थिक चणचणीमुळे तिला जमेल तसे व झेपेल तसे आम्हां भावंडांचे खाण्यापिण्याचे लाड करण्याचा प्रयत्न करीत असे. परंतु काही चमचमीत व चविष्ट पदार्थांची ओळख अतुलच्या आईच्या हातच्या केलेल्या पदार्थांची चव चाखूनच होत असे. गच्चीत खेळून परत आल्यावर आम्ही अभ्यासाला सुरुवात करत असू. अतुलची बहिण अमिता जी अतुलपेक्षा मोठी व आमच्याच शाळेत आमच्या पुढच्या इयत्तेत होती, आमच्या अभ्यासावर देखरेख करत असे. कठीण असलेले गणित समजावून सोडवून देणे, संस्कृतचे व्याकरण व अनुवाद ह्याचीआमच्याकडून तयारी करून घेणे हे सारं ती तिचा स्वत:चा अभ्यास सांभाळून करत असे. अतुलच्या आईची तशी तिला शिकवणच होती. ती अभ्यास करून घेताना बऱ्याचदा अतुलचे लक्ष मात्र कुठल्या ना कुठल्या खेळाकडे लागलेले असे. कधी वर्तमानपत्रामधे दिलेल्या बुध्दीबळाच्या चाली पहात बुध्दीबळाचा डाव मांडून बसणे, तर मधेच मजल्यावरील चौकामधे कॅरमचा डाव मांडून बसलेल्या शेजारच्या मुलांसोबत एखाददुसरा डाव खेळणे, मधेच क्रिकेट वरच्या गप्पा रंगवणे ह्यांत अतुल जास्त रमत असे. आई त्याच्या मागावरच असे पण तो क्वचितच तिला दाद देत असे. माझा अभ्यास मात्र अमिता कसोशीने घेत असे. अभ्यासाची थोडीफार गोडी मला लागली ती अशी अतुलच्या घरी अमितामुळे! आणी त्याचे श्रेय अतुलच्या आईचे! माझा एस एस सी परिक्षेचा अभ्यास असा अतुलसोबत व अमिताने घेतलेल्या परिश्रमांमुळे होत होता. परिक्षेचा निकाल लागला व मी चांगले मार्क्स मिळवून म्हणजे जवळजवळ फर्स्ट क्लासपर्यंत पोहोचून उत्तीर्ण झालो. अतुलही बऱ्यापैकी मार्क्स मिळवून पास झाला पण अतुलच्या घरी अतुलच्या आईला व अमिताला, अगदी गेल्या वर्षांपर्यंत ज्याच्या पास होण्याची बिलकुल शक्यता नव्हती, तो मी चांगल्या गुणांनी पास झाल्याचा मोठाच आनंद होता. अतुलच्या आईने अमिताकडून आमच्या अभ्यासासाठी करून घेतलेल्या मेहनतीचे ते फळ होते. अतुल व मी एकत्र अभ्यास करण्याच्या अतुलच्या आईच्या कल्पनेला मी प्रतिसाद दिला नसता तर मी एसएससी तरी झालो असतो कां? हा प्रश्न आजही माझ्या मनांत रेंगाळत रहातो.
आपल्या मुलांना, घरी आलेल्या पाहुण्यांना उत्तम स्वैंपाक करून आग्रहाने खाऊ घालणे ह्यामधे अतुलच्या आईला मोठाच आनंद मिळे. अतुलच्या वडिलाना वीकएंडच्या दिवशी आॅफीसमधील सहकारी मित्रमंडळी घरी जमवून गप्पांची मैफल जमविण्याची आवड होती! स्वैंपाक करताना त्या सर्व पाहुण्यांची आवड लक्षांत घेऊन त्यांचं योग्य आदरातिथ्य करताना अतुलच्या आईची त्या १० x २० च्या छोट्या खोलीमधे तारांबळ उडत असे. परंतु ती हसतमुखाने ही जबाबदारीही पार पाडत असे. पुढे अतुल व मी दोघेही शालांत परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर दोघांचेही मार्ग वेगळे झाले. अतुलच्या वडिलांनी परळची जागा सोडली व गोरेगांवला नवा प्रशस्त ब्लाॅक घेऊन तेथे रहायला जाण्याचा निर्णय घेतला. अतुलचे कुटुंब गोरेगांवला रहायला गेले. त्याने गोरेगांवच्याच पाटकर महाविद्यालयामधे प्रवेश घेऊन सायन्सचा अभ्यास सुरू केला. मीही काॅमर्स घेऊन डाॅ आंबेडकर महाविद्यालयामधे प्रवेश घेतला. मार्ग वेगळे झाले, रोजचे भेटणे बंद झाले, एकत्र अभ्यास करणेही अशक्य झाले. परंतु अतुलच्या व माझ्या मैत्रीत खंड पडला नाही. वेळ मिळेल तसे अतुलचे परळला माझ्या घरी येणे व माझे गोरेगांवला त्याच्या घरी जाणे सुरू राहिले. पुढे मी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होण्याआधी निरनिराळ्या कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये फिरून स्टेशनरी पुरवठा करण्याचा छोटा व्यवसाय सुरू केला. अतुलने आपल्या वडिलांना म्हणजे दादांना सांगून त्यांच्या कार्यालयाला स्टेशनरी पुरविण्याचे काम मला मिळवून दिले. त्या काळामधे बहुराष्ट्रीय कंपनीच्या कार्यालयाला स्टेशनरी पुरविण्याचे काम मिळणे म्हणजे माझ्यासाठी लाॅटरीच होती.पुरविलेल्या वस्तूंच्या बिलाचे पैसे मला वेळेवर मिळावेत म्हणून दादा स्वत: लक्ष देत. पुढे अतुल बी एस्सी परिक्षा पास होऊन पदवीधर झाला. त्याने नोकरीचा शोध सुरू केला. तेंव्हा मी वरळीच्या कॅंम्पा कोला कंपनीला फिल्टर पेपरचा पुरवठा करीत असे. तेथील प्राॅडक्शन मॅनेजर माझ्या परिचयाचे झाले होते. त्यांना गळ घालून मी अतुलला नोकरीवर ठेवण्याची विनंती केली. त्यांनी अतुलला मुलाखतीसाठी बोलावले व लगेच नोकरीवर 'प्राॅडक्शन केमिस्ट' म्हणून ठेवूनही घेतले. नेहमीच माझ्यासाठी काही ना काही करणाऱ्या माझ्या ह्या मित्रासाठी मीही काही करू शकलो याचा मला खूपच आनंद झाला. एक चांगला प्रामाणिक व कष्टाळू कर्मचारी मिळवून दिल्याबद्दल प्राॅडक्शन मॅनेजरही माझ्यावर खुश झाले. अतुलच्या आईला तर माझे भारीच कौतुक वाटले.
अतुलच्या आईचं नाव 'कुमुदिनी'! ती मूळची गोव्यातील पेडण्याची, पण जन्म मात्र मुंबईतील दादरचा! चार भाऊ व तीन बहिणींपैकी एक! चारही भाऊ चांगलेच शिकून आपआपल्या क्षेत्रात व आयुष्यातही स्थिरस्थावर! बहिणीही चांगल्या घरी सुखात! ह्या साऱ्या भावंडांमधले व त्यांच्या मुलांमधेही ऋणानुबंध अगदी घट्ट! अतुलच्या आईचा ह्यामधे मोठा वाटा व भावंडांचेही तिच्यावर प्रेम! अतुलचे वडिल हे एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये आॅफीसर असल्याने कुटुंब तसे संपन्न! अतुलची आई ह्या पार्श्वभूमीवर तशी सामान्य गृहिणी! परंतु घराकडे, कुटुंबाकडे, मुलांकडे व नातेवाईकांकडेही तिचे लक्ष असे. आल्यागेल्याची आस्थेने विचारपूस करणे, यशाचे कौतुक करणे व नातेसंबंध जोपासत रहाणे हा तिचा स्वभाव होता. गोव्यातील मंगेशी व महालक्ष्मी ह्या देवस्थानांवर तिची अपार श्रध्दा! आयुष्यात दोन मोठे धक्के तिला पचवावे लागले. अतुलच्या वडिलांचे दादांचे १९८५ साली अकाली निधन झाले. अतुल तर तेंव्हा पंचविशीत होता. दु:ख बाजूस ठेवून अतुलच्या आईने दोन्ही मुलांना धीर देत कुटुंब सावरले. दोन्ही मुले अतुल व अमिता आपल्या संसारात आईच्या छायेत सुखाने वाटचाल करीत असतानाच अमिताला आजारपण आले व त्यातच भरल्या संसारातून एक मुलगा व पतीला मागे ठेवून ती निघून गेली. हा मोठाच धक्का होता. तोही तिने पचवला. अतुलच्या व अमिताच्या मुलांमधे आपल्या दोन्ही नातवंडांमधे आपले मन रमवित ती आयुष्य जगू लागली. टीव्ही वरील बातम्या, मालिका ह्या बरोबरच राजकीय चर्चात्मक कार्यक्रम ती आवडीने पहात असे. माझा सहभाग असलेला चर्चा कार्यक्रम ती आवर्जून पहात असे. कधीतरी माझी परखड मते ऐकून तिला चिंताही वाटत असे. 'तुला भीती नाही कां वाटत?' तिने मला एकदा विचारलेही होते. अलिकडे तिला वयोपरत्वे होणाऱ्या आजारांनी ग्रासले. अतुल व त्याची पत्नी अनुजाने तिची खूप सेवा शुश्रुषा केली. तिच्या आजारपणाच्या काळात ती माणसांची नावे विसरत होती. तिला जवळच्या माणसांची ओळखही पटत नव्हती. परंतु मी तिला भेटायला गेल्यावर माझ्याकडे निरखून पहात मिनिटभर गेल्यावर तिने मला ओळखून मला हाकही मारली. माझ्यावर तिने केलेल्या मायेचे ते प्रतिकच होते जणू ! ह्या आजारपणातच तिने अन्नपाणी वर्ज्य केले व वयाच्या ८३व्या वर्षी अत्यंत शांतपणे झोपेतच जगाचा निरोप घेतला.
अतुलची आई ही केवळ त्याचीच आई नव्हती तर मलाही आईसमान होती. तिने दिलेले प्रेम व माया विसरता येणार नाही. आयुष्याच्या विविध टप्प्यांवर अशी काही माणसे भेटतात व जीवनाला वेगळेच वळण देतात. पुढच्या जीवनमार्गाची दिशा नक्की करतात. माझी घसरत चाललेली गाडी शालांत परिक्षेच्या टप्प्यावरच सावरून मला अभ्यासाकडे वळवणारी अतुलची आई अशा माणसांपैकीच एक!
म्हणूनच तिला अश्रूपूर्ण नयनांनी श्रध्दांजली वाहताना कविवर्य ग्रेस ह्यांचे हे शब्द ओठांवर येतात -
'ती आई होती म्हणुनी'
घनव्याकुळ मीही रडलो'
अजित,
ReplyDeleteअप्रतिम. आपल्या जिवाभावाच्या मित्राची आई आपलीदेखिल आईच असते. तू व्यक्त केलेल्या अतुलच्या आईबद्दलच्या भावना खरोखरच कालजाला भिडल्या.
अतुलच्या आईला भावपूर्ण श्रद्धांजली.