Saturday, September 5, 2015
'गेले घ्यायचे राहून....!
शिक्षक दिनाच्या दिवशी माझ्या आर एम भट शाळेमधे विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या भूमिकेत शिरण्याची संधी मिळे. काही विद्यार्थी-विद्यार्थिनी उत्साहाने पुढे सरसावत. छान साड्या नेसून व नटून थटून ह्या वर्गमैत्रिणी व फुल पैंट मधले वर्गमित्र हातात पुस्तके,खडू घेऊन वर्गामधे शिरताक्षणीच हसू फुटत असे. गंभीर भाव चेहर्यावर आणण्याचे त्यांचे अवसान मजेदार वाटे. काही मात्र उगाचच ह्या वर्गातून त्या वर्गामधे पर्यवेक्षकाची जबाबदारी पार पाडण्याच्या मिषाने आपल्याला भावलेला 'शिक्षक वर्ग' न्याहाळण्यासाठी फिरतीवर असत. एकंदर हा दिवस गंमतीचा असे. आम्हा काही मित्रांसाठी मात्र त्याही दिवशी ही गंमत फक्त विद्यार्थी बनून पहाणेच नशिबी असे. त्या काळामधे आमच्या 'कर्तृत्वामुळे' दिनेश परब, डिमेलो, विद्या वैद्य, कलावार मैडम, लता जॉन, पगार मैडम अशा फारच कमी शिक्षकांशी जवळीक व प्रेमाचे संबंध असत. ह्या करता शिक्षक नव्हे तर आमचे विचित्र पराक्रमच जबाबदार असत. त्यांतूनच काटदरे, सोलाई मैडम व प्रि. जोशी सर माझ्यासारख्यावर त्यांच्या पध्दतीने 'प्रेमाचा वर्षाव' करीत. म्हणूनच शिक्षक ह्या पेशाबद्दल संमिश्र भावना मनामधे दाटल्यामुळे की काय शिक्षकाची भूमिका पार पाडण्याबद्दल आत्मविश्वासाचा अभाव मला मागे खेचत असे. सर्वात महत्वाचे म्हणजे शाळेत जाण्यासाठी, बाहेर जाण्यासाठी वा कुठे समारंभास जाण्यासाठी, केवळ शाळेच्या खाकी पैंट व पांढरा शर्ट ह्या गणवेषाच्या दोनच जोड्या असताना, शिक्षकाची भूमिका पार पाडण्यासाठी फुल पैंट कुठून आणणार हा प्रश्न सतावे. गरीबीचे मळभ मनातल्या उत्साहाने भरून आलेल्या आभाळामधे दाटून येई. शिक्षक होऊन पहाण्याची संधी हातून निसटून जाई. आज शिक्षक दिनी माझ्या सर्व शिक्षकांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करताना एका दिवसासाठी कां होईना शिक्षक होऊन पहावयास हवे होते असे वाटून मन खंतावते. 'नायक' चित्रपटातल्या, एक दिवसासाठीच्या मुख्यमंत्र्यासारखे एक दिवस 'शिक्षक' होता आले तर किती छान होईल! पुन्हा शाळेचे दिवस, तो वर्ग, तोच फळा, तीच बाके पण आपण मात्र समोर बाकावर नाही तर अनेकदा त्याच खुर्चीवर जिथे आपण पेनातील शाई वा खडूची पावडर टाकून गंमत करण्याचा आसुरी आनंद घेतला होता तिथे! विद्यार्थ्यांनीही मग आपल्याला शिकवू न देण्याचा चंग बांधावा. आपण ही एखाद्या आपल्यासारख्याच उपद्रवी विद्यार्थ्याला शिक्षा करताना शिक्षकांच्या मनात उठणारी कळ अनुभवावी. 'शिक्षक म्हणजे अनेक जीवने घडवणारा शिल्पकार' हे समजणे किंचितही राहून गेले असेल तर ते कळून यावे. 'शिक्षक' ह्या पवित्र भूमिकेचा स्पर्शही आयुष्य समृध्द करेल. शालेय जीवनातील माझ्या कैक चुका कधी माफ़ करून तर कधी योग्य शिक्षा देऊन माझ्या जीवनाला योग्य आकार देणार्या माझ्या सर्व शिक्षकांना आदरपूर्वक प्रणाम!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment