दि. ८ फेब्रुवारी,२०१५ रोजी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या डहाणू तालुक्यातील बोर्डी केंद्राच्या आचार्य भिसे विद्यानगराला भेट देण्याचा सुवर्णयोग जुळून आला. बोर्डीच्या रमणीय समुद्रकिनार्यावर निसर्गाच्या सानिध्यातील आचार्य भिसे, आचार्य चित्रे ह्या ऋषितुल्य व्यक्तीमत्वांच्या त्यागमय जीवनातून उभी राहिलेली ही ज्ञानमंदिरे मांगल्याची, पावित्र्याची अनुभूती देत उभी आहेत. रमाशंकर जुगलकिशोर बोर्लावाला 'शारदाश्रम' हे विद्यार्थ्यांचे वसतीगृह, सूनाबाई पेस्तनजी हकीमजी हायस्कूल, कटगारा पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, एन्. बी. मेहता सायन्स कॉलेज, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी सेंटर ह्या सर्व सुविधायुक्त इमारती, ज्ञानार्जनाची प्रेरणा व समाजातील दानशूर व्यक्तींच्या दातृत्वाची साक्ष देत उभ्या आहेत. आचार्य भिसे गुरूजींना त्यांच्या माजी विद्यार्थ्यांनी बांधून अर्पण केलेलं 'गुरूदक्षिणा' हे सारं आज पंचाहत्तरीकडे पोहोचलेल्या प्रभाकर राऊत सरांनी मोठ्या उत्साहाने फिरून दाखवलं. गुरूदक्षिणा सभागृहाच्या समोरच असलेला आचार्य भिसेंचा पुतळा पाहून आपेआपच हात जोडले गेले. संस्थेविषयीचा अभिमान, विद्यार्थ्यांविषयीचा जिव्हाळा राऊत सरांच्या शब्दाशब्दांतून जाणवत होता. प्रेमळ वागणुकीतून करडी शिस्तही डोकावत होती. या पेक्षाही महत्वाचं म्हणजे 'भिसे गुरुजींचा, चित्रे गुरुजींचा त्यागमय व शिक्षण क्षेत्राला वाहून घेण्याचा वारसा निरपेक्ष वृत्तीने पुढे न्यायचे खडतर व्रत आपण स्वीकारलं आहे ही भावनाही दिसून येत होती. संस्था उभ्या रहातात, अनेकांचं जीवन घडवतात, ते कैक आयुष्ये संस्थेच्या पायाचे दगड होण्यात धन्यता मानतात म्हणून! समाजातील दानशूरही मग पुढे सरसावतात. बोर्डीच्या समुद्र किनार्यावरील दातृत्व व कर्तृत्व ह्यांचा हा विलक्षण संगम किनार्यावर धडका देणार्या अमर्याद सागराला जणू कुसुमाग्रजांच्या शब्दांतच बजावून सांगतो
"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला!"
No comments:
Post a Comment