Saturday, December 20, 2014

कॉलेजातील निवडणुका - नेतृत्वाची खाणच!

"सर, मला बोलायचंय ! ... फक्त एकच मिनिट प्लीज़!"  भरलेल्या सभागृहामधे, कार्यक्रम एका महत्वाच्या टप्प्यावर पोहोचला असताना त्या आवाजाने सार्यांचच लक्ष वेधून घेतलं होतं. महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेच्या ' वार्षिक दिनाचा' तो कार्यक्रम, वाद्यवृंदाने सादर केलेल्या सुरेल हिंदी गाण्यांमुळे छान रंगला होता. संस्थेचे संचालक डॉ. म्हेत्रस यांचा वाढदिवसही त्याच दिवशी होता. आम्ही विद्यार्थ्यांनी ' तुम जियो हजारो साल..' ह्या गाण्याचा ठेका धरल्याने रंगत अधिकच वाढली होती. स्टुडंट कौन्सिल चा जनरल सेक्रेटरी ह्या नात्याने मनोगत व्यक्त करण्याची हौस अडखळतच पुरी करून मी सुटकेचा निश्वास सोडला होता. संचालक ह्या नात्याने डॉ. म्हेत्रस ह्यांचंही बोलून झालं होतं. आता फक्त प्रमुख पाहुण्यांचं मार्गदर्शन! श्रम व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण देणार्या राज्य शासनाच्या संस्थेच्या कार्यक्रमाला नुकतीच राज्याच्या कामगार खात्याची सूत्रे हाती घेतलेले मंत्री महोदय आवर्जून उपस्थित राहीले होते. मंत्री महोदयांना भाषणासाठी आमंत्रित करणार एव्हढ्यांतच तो आवाज उमटला. डॉ. म्हेत्रस सरांनी त्रासिक मुद्रेनेच नजर आवाजाच्या दिशेने रोखली. तो  होता संदीप पुणेकर! आपले वडिल डॉ. पुणेकर यांच्याकडून बुध्दिमत्तेचा वारसा लाभलेल्या संदीप बद्दल संस्थेमधे सर्वांच्याच मनामधे कौतुकाची भावना होती. नेटकेपणाने सुरू असलेल्या कार्यक्रमामधे व्यत्यय आला असला तरी संदीपला बोलण्यासाठी परवानगी नाकारणं म्हेत्रस सरांनाही अवघडच झालं होतं. मंत्री महोदयांनीही, संदीपला बोलू देण्यासाठी मान डोलावली.  संदीप मनामधे काहीतरी ठरवून व्यासपीठाकडे निघाला. तो काय बोलणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. मंत्री महोदयांच्या समोर संस्थेविषयी राज्य सरकारच्या दृष्टीकोनाबद्दल संदीप टिका टिप्पणी तर नाही ना करणार? असे भाव संचालक डॉ म्हेत्रसांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होते. संदीपने माईकचा ताबा घेतला. नव्या कामगार मंत्र्यांचं त्याने अभिनंदन केलं. भविष्यामधे कधीतरी  कामगार क़ायदे, कामगार कल्याण, औद्योगिक संबंध ह्या विषयातील उच्च शिक्षण घेतलेल्या संस्थेच्या विद्यार्थ्यांने राज्याचा कामगार मंत्री व्हावे ही भावना संदीपने व्यक्त केली. या करिता उद्योग क्षेत्रातील व्यवस्थापनामधले नेतृत्व विकसित करणार्या ह्या संस्थेच्या विद्यार्थ्यांमधून राजकीय नेते तयार करण्याची जबाबदारी आपण घ्यावी अशी विनंतीही त्याने मंत्री महोदयांना केली. विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करणार्या व अंगी नेतृत्वगुण असलेल्या अजित सावंतला म्हणजे मला राजकीय नेतृत्व करण्यासाठी तयार करावं अशी गळही त्याने आश्चर्यकारकरीत्या घातली. थोडक्यातच बोलून संदीप आपल्या जागेवर परतत असताना विद्यार्थ्यांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला. संदीपच्या आवाहनावर सर्वांच्याच पसंतीची मोहर उमटली होती. मंत्री महोदय बोलायला उभे राहिले. श्रम विज्ञान क्षेत्रामधल्या संस्थेच्या योगदानाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. उद्योग क्षेत्रामधे, औद्योगिक संबंध सुरळित राखण्याची जबाबदारी संस्थेचे विद्यार्थी व्यवस्थापनामधल्या उच्च पदांवरून पार पाडत आहेत ह्याचा गौरवपूर्ण उल्लेखही त्यांनी केला. बोलता बोलता त्यांनी संदीपच्या आवाहनातला धागा पकडला. "होय, भविष्यातले नेते ह्या संस्थेमधे तयार होत आहेत याची मला जाणीव आहे. म्हणून तुमचा प्रतिनिधी असलेल्या अजित सावंतचं नेतृत्व घडवण्याची जबाबदारी मी स्वीकारत आहे" असे म्हणून त्यांनी माझ्याकडे होकार मिळविण्यासाठी कटाक्ष टाकला. त्यांच्या या भाषणाला टाळ्याही मिळाल्या. मंत्र्यांचंच आश्वासन म्हणून मी हे सारं हसण्यावारी नेलं. परंतु माझ्यासोबत नेहमीच अभ्यासाला बसणार्या, राजकीय जाणीवा प्रगल्भ असणारा माझा हॉस्टेलमधला रूम पार्टनर शरद देशपांडे मात्र मला स्वस्थ बसू द्यायला तयार नव्हता. मी एकदा तरी जाऊन मंत्री महोदयांना भेटायला हवें असा लकडाच त्याने माझ्यामागे लावला. हो ना करता, मी एकदाचा मंत्रालयामधे गेलो. मंत्रालयामधे येण्याची माझी ही पहिलीच वेळ! मंत्री महोदयांच्या दालनामधे गर्दी पाहून मी हबकूनच गेलो. आज आपली व मंत्री महोदयांची भेट काही होत नाही,मी स्वत:च्याच मनाला बजावले. परंतु एव्हाना मला मंत्र्यांभोवतीची गर्दी, मंत्री महोदयांची विविध गार्हाणी, प्रश्न समजून घेण्याची, दिलासा देण्याची पध्दत याबद्दल कुतूहल वाटू लागले होते. कोपर्यातली रिकामी झालेली खुर्ची मी पटकावली व तेथूनच माझं निरिक्षण सुरू झालं. मंत्री महोदयांची नजर माझ्यावर पडली. त्यांनी मला ओळखलं असावं! खुणेनेच त्यांनी मला जवळ बोलावलं. अजित सावंत ना रे तू? करणार कां पक्षाचं काम? मी हसून मान डोलावली. जवळच बसलेल्या पक्षाच्या नेत्याशी त्यांनी माझी ओळख करून दिली. 'हा आपल्यासोबत कॉंग्रेस पक्षाचं काम करणार आहे. ह्याला पक्षामधे जबाबदारी द्या' असे आदेशच त्यांनी देऊन टाकले.३१ ऑक्टोबर, १९८४ ला पंतप्रधान इंदिराजी गांधी ह्यांची हत्या झाल्यानंतरच्या काळामधे माझं मन कॉंग्रेसकडे आकर्षित होऊ लागलं होतं. इंदिराजींच्या बलिदानाचा मनावर खोलवर परिणाम झाला होता. देशाची एकात्मता टिकवायची असेल तर कॉंग्रेसशिवाय पर्याय नाही ही भावना दृढ होऊ लागली होती. कॉंग्रेसमधे सक्रीय सहभाग घेणार्या मित्रांसोबत, निवडणुकीच्या मतदार स्लीपा लिहिणे व वाटणे, गाडीवरून प्रचार करणे, सभाबैठकाना जाणे सुरू होते. परंतु प्रत्यक्षांत पक्षाच्या कामामधे एका नेत्यासोबत त्याच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी माझ्यासाठी सुवर्णसंधी होती.  ह्या चालून आलेल्या संधीचा उपयोग कराया निर्णय मी घेऊन टाकला व माझी राजकीय वाटचाल सुरू झाली. 

म्हटलं तर कॉलेजांमधल्या निवडणुकांच्या माध्यमातून राजकारणाची मुळाक्षरं गिरवून झालीच होती. पण ह्या निवडणुकातील डावपेच व कुरघोड्यामुळे राजकारणाशी ताटातूट झाली होती. शिवसेना ऐन भरात असल्याचा तो काळ होता. शिवसेनेची बालेकिल्ला असलेल्या परळ भागामधे रहात असल्याने शिवसेनेची आंदोलने, कार्यक्रम,ह्या बद्दल मनामधे सुप्त आकर्षण असे. कामगार मैदानावरची बाळासाहेबांची भाषणे भारावून टाकणारी असत. परिसरातले सर्वच सखेसोबती शिवसैनिक असल्याचा अभिमान मिरवत. घरी कम्युनिस्ट पक्षाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते असलेल्या  वडिलांच्या सहकार्यांचा, अगदी अहिल्याताईंपासून ते कॉ. पी.के.कुरणेंपर्यंत सर्व कम्युनिस्ट नेत्यांचा राबता असे. कम्युनिस्ट व शिवसेना ह्यांचं त्या काळातलं साप-मुंगुसाचं सख्य मला गोंधळात पाडत असे. पण मित्रांचा आग्रह मला सेनेच्या जवळ घेऊन जात असे. आग्रह कसला, सेनेशिवाय दुसर्या कशाचाही विचार मनाला शिवणं देखिल त्यांच्य दृष्टीने संघटनेशी केलेली ग़द्दारी असे. अशातच कॉलेजच्या निवडणुकांमधे शिवसेनेची विद्यार्थी शाखा 'भारतीय विद्यार्थी सेना' रस घेऊ लागली होती. ह्या संघटनेची सूत्रेही परळच्याच एका कडवट शिवसैनिकाकडे आल्याने, परळमधली विद्यार्थी मंडळी कॉलेजमधे जास्तच 'हिरोगिरी' करू लागली होती. कॉलेजच्या निवडणुका जाहीर झाल्या. मी व  माझ्या मित्रांनी तयारीला सुरूवात केली. ह्या वेळी मी निवडणूक जिंकून 'यूआर्' ( विद्यापीठ प्रतिनिधी) व्हायचं व विद्यपीठाच्या स्टुडंट कौन्सिल ची निवडणूक लढवून तेथेही जिंकायचं ह्या ईर्षेनेच जिद्दीला पेटून आमची गँग कामाला लागली. कोपर्यावरच्या मामाच्या हॉटेलमधे डावपेच ठरविण्यासाठी तासन् तास मिटींगा चालत. एव्हढ्यांतच विद्यर्थी संघटनेच्या नव्या कार्याध्यक्षांचे आदेश आले.आदेशानुसार मला निवडणूक लढविण्यास मनाई करण्यांत आली होती. आमच्याच गटातील एका सहकार्याला निवडणूक लढविण्यास सांगण्यांत आले होते. आम्हां सर्वांच्याच मते हे म्हणजे आम्हाला विश्वासात न घेता 'आपलीच चालविण्याचा' प्रकार होता. परंतु मांजराच्या गळ्यांत घंटा बांधायची कुणी? संघटनेच्या उमेदवाराला आम्ही निवडूनही आणलं. पण वर्ग प्रतिनिधींमधून एक यूआर् निवडून देण्यामधे मात्र पडद्यामागे डावपेच रचून विद्यार्थी  संघटनेच्या उमेदवाराची आम्ही 'खाट टाकली'. विद्यापीठावर भगवा फडकवायला निघालेल्या संघटनेच्या 'लढाऊ'  कार्याध्यक्षांना हा धक्काच होता. त्याच रात्री परळच्या शाखेत येण्याचा निरोप मला मिळाला. अपमानित झाल्याच्या भावनेने कार्याध्यक्ष संतापले होते. शिव्यांची बरसात करत त्यांनी माझी गचांडी धरली. गद्दारीची शिक्षा देण्यासाठी अनेकांचे हात शिवशिवत होते. प्रसंगाचं गांभीर्य ओळखून काही समंजस सैनिकांनी माझी सुटका होण्यासाठी धाव घेतली. माझी कणीक तिंबण्यासाठी आतुर झालेल्यांकडून मला सोडण्यांत आले ते परत शाखेमधे किंवा संघटनेच्या  कार्यक्रमामधे तोंड दाखवणार नाही ह्या अटीवरच! शिवसेनेशी माझा संबंध तुटला तो कायमचाच!

कॉलेजमधल्या निवडणुकामधल्या सहभागाने, माझा वारंवार राजकारणाशी संबंध येत राहीला. पुढे कॉंग्रेस पक्षामधे सक्रीय होण्याची संधीही ह्याच माध्यमातून मिळाली.  कामगारांचे प्रश्न, भाडेकरूंच्या, झोपडीवासियांच्या समस्या जवळून पहाता आले. ह्या प्रश्नांची, समस्यांची उकल करण्यासाठी, हाती अधिकार असावेत ही भावना जोर धरू लागली. ह्यांतूनच महापालिका,विधानसभा निवडणुकांना सामोरं जाता आलं. निवडणुकांमधे जरी यश मिळालं नाही तरी समाजातील समस्यांकडे व प्रश्नांकडे पहाण्याचा डोळस दृष्टीकोन तयार झाला. कॉलेजच्या निवडणुकांमधूनच हे सामाजिक बांधिलकीचं, नेतृत्वगुणांचं, समाजाचं प्रतिनिधित्व करण्याच्या वृत्तीचं बाळकडू मिळालं हे कसं बरं नाकारता येईल?  सामान्य कुटुंबातून आलेल्या असंख्य तरूणांना पाठीशी मोठे आर्थिक बळ नसताना, राजकीय सत्तेशी दूरदूरचाही संबंध नसताना,राजकारणामधे येण्याची इच्छाशक्ती निर्माण होण्यामागे कॉलेजमधल्या निवडणुकांनी दिलेली हीच ती प्रेरणा! आज राज्यातल्या राजकीय क्षितीजावर महाविद्यालयांच्या, विद्यापीठांच्या राजकारणातून पुढे आलेले अनेक नेते स्वकर्तृत्वाने तळपत असताना दिसत आहेत त्याला देखिल हीच प्रेरणा कारणीभूत ठरली आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री गुरूदास कामत, राज्याचे माजी आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी,राज्याचे सध्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे, विधानसभा सदस्य अाशिष शेलार,अतुल भातखळकर व पराग अळवणी,कॉंग्रेसचे प्रवक्ते असलेले उल्हास पवार,भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये,राष्ट्रवादीचे प्रवक्ते नरेंद्र वर्मा यांच्यासह कॉलेजच्या निवडणुकांतून पुढे राजकारणामधे आलेल्या नेत्यांची लांबलचक यादी देता येईल. महाराष्ट्राच्या राजकारणावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे, प्रमोद महाजन,विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे,श्रीकांत जिचकार ह्यांचा राजकारणातील प्रवेश कॉलेज व विद्यापीठ निवडणुकांमुळेच सुकर झाला होता. 

मध्यंतरीच्या काळामधे कॉलेजच्या निवडणुकांमधे होत असलेला राजकीय पक्षांचा वाढता हस्तक्षेप, हिंसाचाराच्या घटनांनी लावलेले गालबोट, कॉलेजमधल्या शिस्त व शांततेवर होणारे परिणाम, कॉलेज व्यवस्थापनांवर पडणारा ताण, अभ्यासाला मिळणारे दुय्यम स्थान ही कारणे पुढे करून ह्या निवडणुकांवर बंदी घालण्यांत आली. १९९२ मध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेमधे एका विद्यार्थ्याची हत्या झाली. कॉलेज निवडणुकीतील वादाचे पर्यवसान ह्या विद्यार्थ्याच्या हत्येमधे झाले असा निष्कर्ष काढून पोलीस मोकळे झाले. एका विद्यार्थी संघटनेच्या निरपराध पदाधिकार्याला पोलीसांनी ह्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला. पुढे ही दुर्घटना निवडणुकीच्या वादातून नव्हे तर गुंडांच्या टोळीने स्थानिक वर्चस्वाच्या भावनेतून घडवली होती हे प्रकाशात आलं. पोलीसांनी ह्या प्रकरणी नाहक गोवलेल्या व मनस्ताप सहन करावा लागलेला पदाधिकारी, आज विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलेला आहे. नुकतेच कॉलेजमधल्या  निवडणुकांद्वारे विद्यार्थी प्रतिनिधी निवडले जावेत असे निर्देश यूजीसीने  दिले आहेत. विद्यार्थी जगतामधे ह्या निर्णयाचं मोठ्या उत्साहाने स्वागत होत आहे. कॉलेजमधल्या निवडणुकांमधूनच राजकारणामधे पदार्पण करणारं भावी नेतृत्व तयार होण्याची थांबलेली प्रक्रिया ह्या निर्णयामुळे पुन्हा सुरू होईल यांत शंका नाही. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रांमधे गणना होणार्या आपल्या देशातील लोकशाहीचे भवितव्य तरूणांच्या वाढत्या सहभागामुळे उज्वल असल्याचे दिसत असताना, याच लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेला मात्र घराणेशाहीचा,भ्रष्टाचाराचा विळखा पडल्याचे विदारक चित्रही नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने समोर आलं आहे. घराणेशाहीविरहित व भ्रष्टाचारमुक्त लोकशाहीसाठी, कॉलेजमधे होणार्या निवडणुका हातभार लावतील. राजकारणामधे पदार्पण करून समाजासाठी योगदान देऊ इच्छिणार्या अनेकांचा मार्ग, सत्ता आपल्याच कुटुंबात रहावी ह्या अट्टाहासापोटी रोखण्याचं काम प्रस्थापित नेत्यांकडून होताना दिसतं. सत्तेचं वलय असलेल्या कुटुंबाचा वारसा नसतानाही राजकारणांत येऊन जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून काम करता येईल हा विश्वास कॉलेज निवडणुकांमधे सहभागी तरूणांमधे  जागवला जाईल हे नि:संशय! संगणक युगांतील आजच्या तरूणांचा संगणकाबरोबर गट्टी जमली आहे. ओबामा ते मोदी ह्या नेत्यांना मतदारापर्यंत नेण्यामधे 'सोशल मिडियाने' केलेल्या कामगिरीचं महत्व त्यांनी नेमकं हेरलं आहे. देशातील निवडणुकांमधे होत असलेला 'मसल पॉवर' चा वापर, मतदारांना प्रभावित करण्याचे प्रकार,आचारसंहिता भंगाचे गुन्हे ह्यांना आळा घालण्यासाठी सोशल मिडिया, त्याचे सर्व दोष व उणीवा टाळण्यांत आल्यास, भविष्यामधे सहाय्यभूत ठरणार आहे. कॉलेजातील निवडणुका ह्या सोशल मिडियाचा प्रभावी वापर करण्याची रंगीत तालीम ठरू शकतील.

कॉलेजच्या ह्या निवडणुकांनी माझ्या पिढीतील अनेकाना राजकारणाचा मार्ग दाखवला. त्यातून नेतृत्व विकसित झालं. सुशिक्षित, सुसंस्कृत नेत्यांनी समाजाचं, देशाचं नेतृत्व करावं असे आपण सारेच मान्य करतो. पण नेते एका रात्रीत तयार होत नाहीत. ते घडवावे लागतात. ते घडविण्याची प्रशिक्षण केंद्रे कॉलेजशिवाय अन्यत्र सुरू कशी करता येतील? निवडणुकामधे शिरणार्या राजकारणाची भिती कशासाठी? विविध राजकीय विचारांची ओळख विद्यार्थी दशेतच होणे यांत गैर ते काय? कॉलेजांमधे होऊ घातलेल्या निवडणुकांनी  पुन्हा एकदा विचारांची पक्की बैठक असलेले,सुशिक्षित व समाजाशी बांधिलकी जपणारं नेतृत्व विकसित करण्याची प्रक्रिया सुरू होईल. ह्या प्रक्रियेचं स्वागत करण्यास तरुणाईसोबतच आम्हीही उत्सुक आहोत.


अजित सावंत
मो. 9820069046
ajitsawant11@yahoo.com

(लेखक मुंबई कॉंग्रेसचे माजी सरचिटणीस व प्रवक्ता आहेत)







 

No comments:

Post a Comment