Saturday, August 23, 2014

जोश जल्लोष व होश!






जोश जल्लोष होश!
 -अजित सावंत
दही हंडी उत्सव सुरक्षितपणे साजरा व्हावा म्हणून उच्च न्यायालयाने दही हंडीच्या उंचीवर २० फूटांचे बंधन आणणारे १८ वर्षाखालील बालगोविंदाना हंडीच्या थरावर जाण्यास मनाई करणारे आदेश दिले आयोजकांपासून राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांच्याच विविध प्रतिक्रिया उमटल्या. काही समंजस आयोजकांनी हंडीचा 'इव्हेंट' रद्द करून, राखून ठेवलेला  निधी सामाजिक  उपक्रमांसाठी खर्च करणार असल्याचे जाहीर करून नवा पायंडा पाडला. दही हंडी उत्सव समन्वय समितीने मात्र ह्या निर्णयाविरूध्द संताप व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या एका मंत्र्यांनी तर त्यांच्या ह्या प्रिय सोहऴ्यावर गदा येत असल्याबद्दल दूरचित्रवाहिनीवरच्या चर्चेमधे आसवे गाऴली   महाराष्ट्राची पुरोगामी परंपरा जपणारा हा उत्सव संपता कामा नये अशी आक्रमक भूमिका घेऊन सर्वोच्च न्यायालयामधे आपल्या उत्सव मंडळामार्फत याचिकाही दाखल केली. जीवघेण्या स्पर्धेतून लहानग्यांचे जीव धोक्यात घालणारी ही कोणती पुरोगामी परंपरा हा प्रश्न पुरोगामित्वाचा सतत उद्घोष करणाऱ्या त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनाही पडला नाही हे विशेष! येऊ घातलेल्या निवडणुका लक्षात घेऊन मौन स्वीकारणे त्यांनी  सोयीस्कर मानले असावे.  हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे ह्यांनी मात्र  वास्तववादी भूमिका घेतली. "दही हंडी उत्सव हा आमचा पारंपारिक उत्सव बंद होता कामा नये. या वर्षीही हा उत्सव जल्लोषातच साजरा होणार मात्र जल्लोषाचा आनंद साजरा करताना जीवघेणा खेळ नको" बालगोविंदांवरच्या बंदीचे स्वागत करून ह्या सणाला इव्हेंटचे स्वरूप आणू नये असेही उध्दव यांनी म्हटले. दही हंडी, गणेशोत्सव वा नवरात्रोत्सव  आदी हिंदूंच्या सण-उत्सवांचे गेल्या काही वर्षांमधे व्यापारीकरण करून, आपआपसातील स्पर्धेतूनच आपले नेतृत्व समाजावर थोपणाऱ्या  सणांना,उत्सवांना विकृत रंग फासण्यास कळत नकळत  हातभार लावणाऱ्या सर्वच पक्षांच्या नेत्यांनी लोक प्रतिनिंधीनी उध्दव यांच्या ह्या भूमिकेतून बोध घेणे अपेक्षित
 हिंदू धर्मिय हे मुळातच उत्सवप्रिय आहेत. सणवार,प्रथा-परंपरा हाच मुळी हिंदू धर्माचा गाभा आहे. हे सण उत्सव साजरे करणे, रूढी-परंपरांचे पालन करणे म्हणजेच हिंदू जीवनपध्दती होय! सण उत्सवांना हिंदू धर्मामधे जे अनन्यसाधारण महत्व आहे तसे जगातील अन्य कोणत्याही धर्मामधे नाही ही वस्तुस्थिती आहे. याचे एकमेव कारण म्हणजे हिंदू जीवनपध्दतीमधे, प्रेम आदर, कृतज्ञता बंधुभाव, श्रध्दा विश्वास, तसेच दुष्ट अत्याचार याबद्दलची चीड ह्या बाबतचे संस्कार ह्या सण वारातूनच होत असतात. हिंदूंमधील सहिष्णुता संयम आणि एकमेकांविषयीचा जिव्हाऴा आपुलकी ह्याचे उगम स्थानही ह्या सण उत्सवामधे आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
महाराष्ट्रापुरेसा हिंदू सण उत्सवांचा विचार केला तर गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, होळी रंगपंचमी, दही हंडी, गुढी पाडवा, मकर संक्रांत, नारळी पौर्णिमा रक्षा बंधन, नाग पंचमी, वट पौर्णिमा, बैल पोळा या दिपावलीच्या सर्वात मोठ्या सणासह, दत्त जयंती, राम नवमी, हनुमान जयंती हे उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. गणेशोत्सवामधे शुभ कार्याचे दैवत मानल्या जाणाऱ्या गणपतीबाप्पांचे पूजन करून पुढे येणाऱ्या, पीक कापणी च्या हंगामासाठी, लग्न सराईच्या काळामधे शुभ कार्ये जुळुन येण्यसाठी विघ्नहर्त्याचे आशिर्वाद घेण्यसाठीच ह्या उत्सवाची योजना झाली असावी. पुढे लोकमान्य टिळकांच्या कल्पकतेमधून सामान्य जनांना संघटित करून राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्यात आले. परिणामी प्रबोधनाचे मोठे काम सार्वजनिक गणेशोत्सवातून महाराष्ट्रामधे सुरू झाले. पुढे पुढे नवरात्रोत्सवही सार्वजनिकरीत्या साजरा होऊ लागला. स्त्री शक्तीचा गौरव करून दुष्ट प्रवृत्तींचे निर्दालन करण्याची शक्ती स्त्री मधे आहे ह्याची कबुली देऊन ह्या आदिंशक्तीपुढे नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा  महाराष्ट्रातील जोशाने साजरा करण्याचा उत्सव! काळाच्या ओघामधे, ह्या उत्सवामधे तरूणाईला साद घालणाऱ्या 'दांडीया- गरबाने' शिरकाव केला मुंबईच्या गल्ल्या-बोळांमधे,मैदानांमधे, पटांगणांमधे रंगू लागलेल्या दांडिया गरबामधे, मोठ्या संख्येने सहभागी होणाऱ्या तरूण-तरूणींबरोबरच, प्रौढांचीही पावले थिरकू लागली. जोश-जल्लोषाचे एक प्रभावी माध्यम नव्याने तयार झाले. अग्निदेवतेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सार्वजनिकरीत्या होलिकोत्सव साजरा करण्याची प्रथा गांवागावातून होतीच परंतु ह्या उत्सवामधे कुणाच्या ना कुणाच्या नांवाने सार्वजनिकरीत्या बोंब ठोकून 'शिमगा' करण्याची सूट मिळत असल्याने ह्या उत्सवाचा आनंदही  द्विगुणित होऊ लागला. जोडीने रंगपंचमी निमित्त श्री कृष्णाचा आदर्श समोर ठेवून 'रंग' खेळण्याची संधी मिळत असल्याने हा सणही तरूणामधे लोकप्रिय झाला. गेल्या दोन तीन दशकामधे, सणांचा राजा मानल्या गेलेला 'दिवाळी' चा सण सार्वजनिक दिपोत्सव म्हणून साजरा लागला आहे. त्या निमित्ताने केली जाणारी रोषणाई, तरूणांच्या कल्पकतेमधून साकारलेले रस्त्या-रस्त्यावर लटकलेले शोभिवंत कंदिल, महिलांसाठी खास आयोजित केलेल्या जाणार्या ' फराळ-पाककृती स्पर्धा', तरूणांनाही आकर्षित करणाऱ्या रांगोळी स्पर्धा  अशा कला गुणांना वाव देणार्या उपक्रमांमुळे, कलात्मकता वाढीस लागली आहे. मकर संक्रातीनिमत्ताने आयोजित केले जाणारे महिलांचे सार्वजनिक हळदी-कुंकू समारंभ ही तर महिलांसांठी एकत्र येऊन, महिलांचे प्रश्न समस्या, प्रगतीच्या संधी ह्याचा आढावा घेण्यासाठीची पर्वणीच होय! गुढी पाडव्यानिमित्त निघू लागलेल्या शिस्तबध्द नववर्ष स्वागत यात्रांमधेही आबालवृध्द महिला पारंपारिक वेषामधे मोठ्या संख्येने सहभागी होऊ लागल्याने हिंदू रूढी परंपरांबाबतचे आकर्षण औत्सुक्य वाढीस लागत आहे. दत्त जयंती, रामनवमी, हनुमान जयंती ह्या सार्वजनिक रीत्या साजऱ्या केल्या जाणाऱ्या उत्सवांमधे जल्लोषाला स्थान नसते केवंळ भक्ती भावाची अभिव्यक्ति हेच उद्दिष्ट असते. साईंच्या नावानेही अलिकडे 'साई - भंडारा' महोत्सव ठिकठिकाणी आयोजित करून गरीबांना अन्नदान करून परोपकाराचा सामूहिक भोजनाद्वारे समतेचा मंत्र ही जपला जातो. असे विविध सण- उत्सव  साजरे केले जातात परंपरांचे जतन केले जाते. दही हंडीचा उत्सव तर जोश, जल्लोष, आनंद,उत्साह भरून उतू चालल्यागत! सोबत तरूणाईला खुणावणाऱ्या जिद्द,ाहस ह्यांच्या प्रदर्शनाची संधी, यामुळे सांघिक भावनेचा उत्तम आविष्कार असलेल्या ह्या उत्सवाने  आपलेपणाचे मानाचे स्थान प्राप्त केले आहे. या उत्सवामधे  महिलानीही साहसी वृत्तीच्या बाबतीत आपण तसूभरही मागे नाही हे सिध्द केले आहे. परंतु याच दहीहंडीच्या उत्सवावर घातलेल्या निर्बंधाबाबतचा वाद थेट न्यायालयात पोहोचल्याने सण उत्सव साजरा करताना पाळावयाच्या मर्यादांबाबतची चर्चा सुरू झाली आहे.
अगदी अलिकडच्या काळामधे, सण उत्सवांबाबत निरनिराळी बंधने घालण्यात येऊ लागली. आवाजाचे प्रदूषण रोखण्यासाठी, ध्वनिवर्धकांच्या वापरावर विशिष्ट डेसिबल ची तसेच वेळेची मर्यादा घालण्यांत आली. विसर्जन मिरवणुका तत्सम मिरवणुकांवरही आवाज़ प्रदूषण रोखण्यासाठी तसेच वाहतूक सुरळित राखण्यासाठीही  बंधने घालण्यांत आली. फटाक्यांच्या आवाजावरही निर्बंध घालण्यांत आले. नवरात्रामधे रात्र रात्र चालणाऱ्या दांडियाला रात्रौ १० वा. पर्यंतचीच मुभा देऊन चाप लावण्यात आला. महाराष्ट्रामधे कुतूहलाचा श्रध्देचा विषय ठरलेली बत्तीस शिराळ्यातील नागपंचमी, जिवंत नागांची पूजा प्रदर्शनत्या निमित्ताने नागांचा छळ करण्यास केलेल्या मनाई मुळे यंदा केविलवाण्या पध्दतीने साजरी झाल्याचे काहींचे म्हणणे आहे. रंगपंचमीच्या दिवशी नको ते 'रंग' उधळणाऱ्या रंगेल गड्यांना पोलीस कारवाईची वेसण घातली जाऊ लागली. पर्यावरणाची हानी करणारी वृक्षतोड होळीच्या निमित्ताने होत असल्याने त्या वर ही येणाऱ्या काळामधे कडक निर्बंध घातले जातील अशी शक्यता आहे. सण वार उत्सवावर ही बंधने घालण्यात न्यायालयेच अग्रेसर आहेत.  अलिकडच्या काळामधे पर्यावरण, प्रदूषण ह्या बाबत झालेली जागृती, निसर्ग प्राणिमात्र यांचे रक्षण करण्यासंबंधीच्या जबाबदारीची जाणीव, वाहतूक नागरी सुविधांवर पड़त असलेला ताण ह्या मुळे समाजातूनही सण उत्सवांवर विशिष्ट बंधने घालण्यासंबंधी आवाज़ उठू लागला आहे.
विविध सण उत्सव साजरे करण्यावर निर्बंध येत असताना हितसंबंधी नेते पक्षांनी मात्र याविरोधात आपल्या राजकारणाला सोयीस्कर असे अर्थ लावून ह्या निर्बंधाविरोधामधे ओरड सुरू केली आहे. कुणाला महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरा धोक्यात आल्याचा साक्षात्कार झाला आहे तर कुणाचा हिंदू धर्मावरच घाला आला असल्याचा ठाम  समज झाला आहे. सण उत्सवांच्या व्यापारीकरणाला हातभार लावून आपणच आपल्या प्रिय सण उत्सवांच्या मुख्य उद्दिष्टांचाच पराभव करीत आहोत याचे भान आपल्यालाही राहिले आहे कां? हाही एक प्रश्न आहे. राजकारण्यांनी आपले नेतृत्व मतदारसंघ मज़बूत करण्याचे माध्यम म्हणून उत्सवांचा वापर करण्यास सुरूवात केली लाखोंच्या संख्येने उत्सवामधे सहभागी होणाऱ्या ग्राहकांना लक्ष्य करण्यासाठी  'मार्केटिंग' ची अनेकविध तंत्रे वापरली जाऊ लागली. लाखों रूपयांचे  प्रायोजकत्व ऊत्सवांना लाभू लागले त्यातून केल्या जाणाऱ्या भव्य सजावटी, माध्यमातून केली जाणारी अप्रत्यक्ष जाहीरातबाजी, बक्षिसांच्या भव्य रकमांचे त्यातून होणाऱ्या चुरशींचे आकर्षण यामुळे प्रचंड गर्दी ह्या उत्सवांना लोटू लागली. ह्या गर्दीचा लाभ घेऊन, राजकीय स्वार्थ साधणारे व्यावसायिक फ़ायदा उठवणारे सोकावले उत्सवा-उत्सवांमधे गर्दी खेचण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. थरांच्या हंड्या   थरावर पोहोचल्या.  लाखोंची बक्षिसे जाहीर करणारा एक समाजसेवक केवल ह्याच भांडवलावर उमेदवारी मिळवून निवडूनही आला. यंदा ठाण्यामधे एका 'डॅंशिंग' पुढार्याने १० थर लावून हंडी फोडल्यास २५ लाखांचे बक्षिसही जाहीर केले. राज्यमंत्री असलेल्या ह्या नेत्याच्या पुढाकाराने साजऱ्या होणाऱ्या दही हंडी उत्सवाने सर्व क़ायदे नियम धाब्यावर बसवून त्यांना अपेक्षित 'जल्लोषामधे'  उत्सव साजरा केला. राज्यकर्तेच ज़र न्यायालयांनाही वाकुल्या दाखवून आपले 'बालहट्ट' पुरवून घेऊ लागले तर सामान्य जन ही कसे मागे रहातील. अनेक छोट्या मोठ्या पुढार्यांनीही न्यायालयीन आदेशाचा 'दही काला' करून टाकला. म्हणायला ठाण्यांतील एका  लोकप्रतिनिधीने न्यायालयीन आदेशाचे पालन करून आपल्या उत्साही सहकारी लोकप्रतिनिधीना 'संस्कृतीचा' धड़ा घालून दिला.
दही हंडी च्या उत्सवावर घालण्यांत आलेले निर्बंध झुगारून देणाऱ्या नेत्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या राज्य शासनावर, न्यायालयाच्या अवमानप्रकरणी कारवाई अपेक्षित आहे तशी ती होईलच, परंतु हिंदू धर्म पुरोगामी परंपराही धोक्यात आल्याची ओरड करून उत्सवांचे व्यापारीकरण विकृतिकरण करणाऱ्या  कथित हिंदू नेते पुरोगामी परंपरांचे स्वयंभू रक्षक ह्यांना समाज कसा आवर घालणार हा खरा प्रश्न आहे. लहानग्यांचे जीव धोक्यांत घालून स्वतःचे नेतृत्व मिरविणाऱ्यांचे इव्हेंट आम्ही यापुढे खपवून घेणार नाही. वृध्द रूग्णांना वेठीस धरणारेआवाजाचे प्रदूषण वाहतुकीचा खोळंबा करणारे उत्सव आनंददायी असूच शकत नाहीत म्हणून यापुढे बंद! पर्यावरणाला हानी पोहोचवून सण साजरे करणे आम्हाला मान्य नाही. या अशाच भूमिका घेऊन समाजाचे प्रबोधन करण्याचे ठोस भूमिका घेण्याची जबाबदारी समाज धुरिणांची सुसंस्कृत नेत्यांचीही आहे. सुदैवाने अशी भूमिका हिंदुत्ववादी म्हणविणाऱ्या शिवसेनेनचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे ह्यांनी घेतली. पुढे मनसे प्रमुख राज ठाकरे ह्यानीही संयम पाळला. पुरोगामी म्हणवणारे शासनकर्ते मात्र नरो वा कुंजरो वा  अशा वृत्तीने आपल्याच हुल्लडबाज नेत्यांपुढे शरण गेले. येऊ घातलेला गणेशोत्सव, त्यानंतर येणार्या नवरात्रौत्सव पुढील अनेक उत्सव, हिंदूंचे अन्य धर्मियांचेही, समाजहिताच्या दृष्टिकोनातून नियमांच्या चौकटीत बसवावे लागतील उत्सव म्हणजे जोश-जल्लोष  परंतु होश बाळगूनच ह्याची जाणीव हुल्लडबाजांना करून द्यावी लागेल.

अजित सावंत

ajitsawant11@yahoo.com

No comments:

Post a Comment