मंत्रालयामधे कामगार मंत्र्यांसोबत आयटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी गेले होतो. मंत्री महोदयांना येण्यास थोडा वेळ लागणार होता म्हणून त्यांच्या कार्यालयाबाहेर प्रतीक्षाकक्षात बसलो. मोबाईलवर वाॅट्स अॅप संदेश, युट्यूब व फेसबुक चाळण्याचा चाळा करीत वेळ घालवावा ह्या हेतूने! मधेच प्रसाधनगृहात थोडे ताजतवाने होऊन येण्यासाठी उठलो. प्रसाधनगृहामधे केस विंचरण्यासाठी कंगवा काढण्यास पॅंटच्या मागील खिशामधे हात घातला व त्याच खिशात ठेवलेले पाकीट तेथे नसल्याचे माझ्या लक्षांत आले. येताना तर पाकीट सोबत होते व त्यातील ओळखपत्र मी प्रवेशद्वारावर दाखवलेही होते. येण्याजाण्याच्या मार्गावर, प्रवेशद्वाराजवळ, सुरक्षा नियंत्रण कक्षामधे व हाऊस किपिंग कर्मचाऱ्यांना कुणा अभ्यागतास पाकीट मिळाल्याबात व त्याने ते कुणाकडे सोपवले आहे कां याची चौकशी करून झाली. पाकीट मिळत नाही हे पाहून माझे धाबे दणाणले. पाकीटात बऱ्यापैकी रक्कम होती पण त्याचबरोबर क्रेडिट व डेबिट कार्डे, विविध ओळखपत्रे, वाहन चालक परवाना आदि महत्त्वाच्या वस्तू असल्याने अधिक चिंता होती. बॅंकाना कळवून कार्डांवरील व्यवहार थांबविण्याच्या सूचना दिल्या. आता पुन्हा ती कार्ड कार्यान्वित करणे, हरवलेली ओळखपत्रे नव्याने मिळवणे हा मोठा व्यापच पाठीशी लागणार होता. चिंताग्रस्त होऊन मार्गिकेमधे उभा असतानाच, एक तरुण व्यक्ती लगबगीने माझ्यापाशी आली. साधासाच पेहराव व हाती कागदपत्रे ठरवण्यासाठी असलेली पिशवी, अशा त्या व्यक्तीने तुम्ही अजित सावंत कां? असा प्रश्न केला. 'साहेब तुमचे पाकीट मला मिळाले आहे. मी ते घेऊन येतो. तुम्ही येथेच थांबा' असे सांगून तो निघूनही गेला. थोड्या वेळाने तो परतला ते पाकीट घेऊनच! माझा जीव भांड्यात पडला. क्षणातच माझ्या डोक्यावरचे चिंतेचे ओझे दूर झाले. 'साहेब, हे पाकीट मला प्रतिक्षाकक्षाजवळ काॅरिडाॅरमधे मिळाले. मी पाकीटातल्या ओळखपत्रावरचा फोटो पाहिला व तुम्हाला ओळखले. मी तुम्हाला गेला तासभर शोधतोय. माझे नाव मनोज राठोड! मी आमदार हरिभाऊ राठोडांसोबत असतो व त्यांच्याकडे गावांहून येणाऱ्यांची मंत्रालयातील कामे करण्यासाठी मदत करतो' त्यांने सांगितले. मी त्याचे मनापासून आभार मानले व विचारले 'तुम्ही मंत्रालयातच नोकरी करता कां?' हलकेच हसून त्या तरूण माणसाने आपण नोकरीस नसून ज्यांना मदत करतो ते काहीबाही देतात व तेच आपले चरितार्थ चालविण्यास पुरेसे असते असे समाधानाने सांगितले. मनोजची आर्थिक स्थिती साधारण असल्याचे एव्हाना मला स्पष्ट झालेच होते. पाकिटातले सर्व काही जागच्याजागेवर होते. 'मनोज पाकिटामधे चांगलीच रक्कम असताना तुला मोह कसा रे नाही झाला?' मी मनोजला खांद्यावर हात ठेवत विचारले. *'साहेब, इमानदारीने कमावलेले जगताना जवळ नाही उरणार तर बेईमानीने मिळालेले किती दिवस पुरणार?'* भ्रष्टाचाराच्या सुरस कहाण्या ज्या मंत्रालयाच्या काॅरिडाॅर मधे अनेकदा ऐकायला मिळाल्या तेथेच प्रामाणिक मनोजने त्याच्या साध्या निर्मळ भाषेत इमानदारीचे तत्वज्ञान समोर ठेवले होते. आपल्या कष्टाची रोजीरोटी कमावणाऱ्या मनोजच्या चेहऱ्यावर त्याचा अभिमान विलसत होता. मनोजला व त्याच्या इमानदारीने जगण्याच्या विचाराला मी मनोमन सलाम ठोकला. मनोजला मी कृतज्ञतापूर्वक काही बक्षिस देऊ केले. ते स्वीकारण्यास नकार देणाऱ्या मनोजच्या हाती बक्षिस कोंबून मी म्हणालो 'मनोज तुझ्या इमानदारीची दिलेली ही दाद आहे'. 'इमानदारीने कमावलेले जगताना जवळ नाही उरणार तर बेईमानीने मिळालेले किती दिवस पुरणार? मनोजचे हे विचार मंत्रालयाच्या भिंतीभिंतीवर, लिहून फ्रेम करून लावावेत असे माझ्या मनात येत असतानाच हसतमुख मनोजने माझा निरोप घेतला.