Sunday, November 29, 2015

समतोल 'घर वापसी'

'समतोल फाउंडेशन' ही संस्था स्टेशन परिसरातील मुलांशी संपर्क साधून व त्यांची कौटुंबिक माहीती मिळवून त्यांचे समुपदेशन करते. देशाच्या विविध भागातून आलेली ही ७ ते १४ वयोगटातील मुले बहुधा घर सोडून आलेली वा हरवलेली मुले असतात. त्यांना पुन्हा पालकांकडे पोहोचविणे व त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. आजवर सुमारे ५२०० मुलांना पुन्हा आपल्या घरी, आपल्या कुटुंबामधे पाठविण्याचे महत्वाचे काम 'समतोल फाउंडेशन' व संस्थापक विजय जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे हे कौतुकास्पद आहे. घरापासून व कुटुंबापासून नाते तुटलेल्या ह्या मुलांनी गुन्हेगारीपासून, अंमली पदार्थांच्या व्यसनांपासून व लैंगिक शोषणापासून दूर रहावे ह्या साठी ही संस्था दक्ष असते. आज ह्या संस्थेतील मुलांची त्यांच्या पालकांशी भेट घडवून ह्या मुलांना पालकांना सुपूर्द करण्याचा कार्यक्रम (मिलन समारोह) हेतू चॅरिटेबल ट्रस्ट, JIO मालाड, व स्ट्रीट चिल्ड्रेन्स् फाउंडेशन आणि समतोल फाउंडेशन च्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यांत आला होता. ह्या हृद्य सोहळ्यास माजी न्यायमूर्ती कमल किशोर तातेड व ज्येष्ठ सिनेअभिनेते सुरेश ओबेराॅय, पोलीस लांचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख किशोर जाधव हे उपस्थित होते. मुलांच्या शोधात वणवण फिरणाऱ्या मातापित्यांची अनेक महिन्यानंतर मुलांशी होणाऱ्या भेटीचे दृश्य मन हेलावणारे होते. घर सोडून आलेली मुले आईच्या कुशीत शिरून हमसीहमशी रडताना दिसत होती. आई वा बाप मारतात म्हणून घर सोडून आलेल्या मुलांना पुन्हा मायेची आस लागली होती व आई व वडिलही पुन्हा मारणार नाही याची खात्री पाणावलेल्या डोळ्यांनी देत होते.समाजातील दानशूर व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्यांचे हात 'समतोल फाउंडेशन' ला सहाय्य करण्यास सरसावलेले असतात.ह्या अतिशय चांगल्या कार्यक्रमामधे सहभागी होण्याचा आनंद ज्यांच्यामुळे लाभला त्या समतोल फाउंडेशन चे संस्थापक ह्यांना धन्यवाद व त्यांच्या उपक्रमास शुभेच्छा! ह्या स्तुत्य उपक्रमास आपलाही मदतीचा हात हवा आहे. संपर्क : विजय जाधव :98-92-961124



Tuesday, November 24, 2015

पिटूची आई, माझी आई आणि स्वेटर,मोजे, पर्स व बरंच काही...!

माझी आई ऐंशीच्य घरातली! फारश्या शिक्षित नसलेल्या माझ्या आईने महापालिकेत नोकरी केली. मी व माझ्या बहिणीने चांगलं शिक्षण घेऊन 'हापिसात' नोकरी करावी एव्हढंच तिचं माफक स्वप्न! कामगार चळवळीत कार्यरत माझ्या वडिलांच्या विचारांचा प्रभाव तिच्यावर असल्याने, सिनेमे, बुवाबाजी, गंडेदोरे, ऋण काढून सण साजरे करणे अशा गोष्टींपासून ती दूरच असे. आपण बरे की आपला संसार व नोकरी बरी असे तिचे जीवन होते. नाही म्हणायला,तिची व चाळीतल्या आमच्याच माळ्यावर रहाणाऱ्या साठी ओलांडलेल्या आजीची म्हणजेच 'पिटूच्या आईची' चांगलीच गट्टी जमली होती. पिटूच्या आईच्या वाट्याला अकालीच पतिनिधनाचं दु:ख आलं. पिटूच्या आईने मात्र मुलांचं संगोपन डोळ्यांत तेल घालून केलं. मोठा मनू व मधला छोटू शिकून नोकरीला लागले. त्यांनी स्वत:च्या स्वतंत्र जागा घेऊन बिऱ्हाडंही थाटली. धाकट्या पिटूनेही काॅलेज पूर्ण केले व तोही नोकरीस जात असे. रिकामपणचा विरंगुळा म्हणून लहान मुलामुलीना जमवून पत्त्यांचा खेळ मांडणे, रेडिओवरचे वनिता समाज,आपली आवड, श्रुतिका हे कार्यक्रम ऐकणे हे छंद पिटूच्या आईने जोपासले होते. पण त्याचबरोबर विणकामाची तिला मोठी आवड होती. पिटूच्या आईच्या विणकामाचं माझ्या आईला मोठं अप्रूप असे.आई कामावर जाताना आम्हां भावंडांना पिटूच्या आईच्या हवाली करत असे. पिटूची आई आमचा सांभाळ करत असे व लाडही! पिटूच्या आईने शिवलेला स्वेटर, मोजे आमच्याही वाट्याला येत असत. पिटूच्या आईने विणून दिलेला क्रोशाचा टेबल क्लाॅथ व दारावरचे तोरण पाहून आई हरखून जाई. कामावरून परतल्यावर पिटूच्या आईच्या बाजूस तासन् तास बसून ती पिटूच्या आईच्या हातची कला न्याहाळत बसे. एकीकडे गप्पा व दुसऱ्या बाजूला विणकाम सुरू असा कार्यक्रम सुरू राही. एकलव्याच्या एकाग्रतेने आईचे विणकामाचे प्रशिक्षण सुरू राही. एके दिवशी पैसे साठवून विकत आणलेल्या लोकरीचा एक छानसा स्वेटर आईने  पिटूच्या आईच्या हाती ठेवला. "अगो बाई, तू केलास कां हा?" पिटूच्या आईच्या स्वरात आनंद व आश्चर्य दोन्ही भरून आलं होतं. स्वेटर बऱ्यापैकी विणला होता पण कुठेकुठे मापात चुकलाही होता. आता मात्र पिटूच्या आईचा विचार पक्का झाला होता. आपल्या या शिष्येला क्रोशाच्या विणकाम कलेत पारंगत करायचेच ह्या निर्धाराने ती कामाला लागली. रोज कामावरून थकून भागून परतलेली माझी आई पिटूच्या आईच्या शिकवणीलाच जाऊ लागली व लवकरच तिने क्रोशाच्या विणकाम कलेत कौशल्य प्राप्त केल्याबद्दल पिटूच्या आईची शाबासकीही मिळवली.

अधून मधून लोकर, दोरे आणण्याइतपत पैसे जमवून माझी आई सुध्दा स्वेटर, मोजे, पर्स विणू लागली.  छंद तसा न परवडणारा होता. पण मिळालाच रिकामा वेळ तर विणकाम तिला आनंद देत असे. पुढे यथावकाश मुले मोठी झाली. वडिलांचे निधन झाले. आईने आता नोकरी करू नये असे आम्हां मुलांना वाटत होतेच. तिला नोकरीचा राजीनामा देण्यास आम्ही भाग पाडले. नोकरीच्या निमित्ताने सुरू असलेली तिची ओढाताण थांबली होती. काबाडकष्ट करण्याचे दिवस मागे पडून सुखाचे दिवस वाट्याला येऊ लागले होते. घरातील कामे स्वत: करण्याची तिची सवय मात्र तिला स्वस्थ बसू देत नव्हती. घरातील आम्ही सारी माणसे नोकरीधंद्यासाठी व नातवंडे शिक्षणासाठी बाहेर पडली की रिकामे घर तिला खायला उठे. टीव्ही मालिकातील तोचतोचपणाचा तर तिला कंटाळाच! हळू हळू तिने विणकामाला वेळ द्यायला सुरूवात केली. नात्यागोत्यातल्या लहान मुलांना तिने विणलेले स्वेटर व मोजे भेट म्हणून मिळू लागले. काॅलेजला जाणाऱ्या तरूण मुली आजीकडे पर्स विणून देण्याचा हट्ट धरू लागल्या. लग्न ठरलेल्या मुलीही आजीकडून रूखवतासाठी विणलेले काही बाही घेण्यासाठी लकडा लावू लागल्या. क्रोशाच्या विणकामातला आईचा आनंद दिवसागणिक वाढतच चाललाय! आईची करमणूकही तीच अन् भक्तीही तीच! एखाद्या नुकत्याच लग्न झालेल्या मुलीला आजीने विश्वासात घेऊन  "काय बातमी आहे का?" असं विचारावं अन् तिने लाजून दूर पळाल्यावर आजीने झबली, टोपरी, मोजे विणायला घ्यावेत हा तिचा शिरस्ता! गृहप्रवेशाच्या पूजेचं आमंत्रण कुणी घेऊन आला की आईने ठेवलंच त्याच्या हातात दाराचं विणलेले तोरण! दूर देशी शिक्षण घ्यायला जाणाऱ्या तरूण मुलाने आशिर्वाद घेण्यासाठी पायावर स्पर्श केला की त्याला मिळतो उबदार स्वेटर! आईच्या ह्या उद्योगाने तिला म्हातारपणी आनंद घ्यायला व द्यायलाही संधी मिळवून दिली. तिच्या मायेच्या बदल्यात तिला मिळू लागलं लहानथोरांचे प्रेम व शुभेच्छा! पिटूची आई आज हयात नाही. पण जाताना आनंद वाटण्याचा व मिळवण्याचा वसा माझ्या आईला देऊन गेली. क्रोशाचे स्वेटर, मोजे, झबली व टोपरी आणी तोरणे आता झाली आहेत माया,ममता, प्रेम, आस्था, आशिर्वाद असं बरंच काही..... !







Saturday, November 14, 2015

दिवाळीचा पाचवा दिवस..!

काल भाऊबीज झाली. दिवाळीचे चार दिवस आनंदात गेले. पण आमच्यासाठी आजही दिवाळी! बालिकाश्रम ह्या संस्थेतील आश्रमकन्यांसमवेत आजचा दिवस साजरा करताना आजही दिवाळीच असे वाटले. बालिकाश्रम ह्या संस्थेमधे ६ ते १२ वयोगटातील अनाथ मुलींचे योग्य संगोपन केले जाते. उत्तम संस्कार व मुलींच्या आरोग्य व शिक्षणाची सर्व आवश्यक काळजी घेणे हे बालिकाश्रमाचे वैशिष्ट्य! ह्या मुलींनी आज बालदिन म्हणजेच चाचा नेहरूंचा जन्मदिन साजरा केला. ह्या छोट्या पऱ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य व त्यांनी एकसाथ दिलेल्या 'हॅपी दिवाळी' ह्या शुभेच्छा दिपावलीचा आनंद शतगुणित करणाऱ्या होत्या. आपणां सर्वांना विनंती कृपया ह्या मुलींच्या आयुष्यांत आनंद फुलविण्याच्या प्रयत्नांना साथ द्या! बालिकाश्रमाला भेट देण्यासाठी जरूर संपर्क साधा. माझ्या सर्व मित्रांना विनम्र आवाहन ह्या संस्थेला ज्या उद्योग व्यवसायाशी संबंधित असाल तेथून ह्या संस्थेसाठी सीएस्आर निधी किंवा देणग्या उपलब्ध करून देऊन संस्थेच्या कार्याला हातभार लावून एक अनोख् समाधान प्राप्त करा.

मराठी तितुका टिकवावा...

वरळी कोळीवाडा 'स्लम' घोषित करण्याचा डाव म्हणजे 'उच्चभ्रूंच्या मुंबईसाठी' मूळ रहिवाशी,सामान्यांना हुसकावून लावण्याच्या कटाची पुढची पायरी!  उच्चभ्रूंसाठी वरळीमधे सागर सन्मुख उत्तुंग इमारतींचा मार्ग मोकळा करताना मूळचा मुंबईकर मुंबईबाहेर फेकला जाण्याची चिंता आहे. वरळी कोळीवाड्यातच नव्हे तर धारावी सह मुंबईत ह्यापुढे येथील मूळ मराठी रहिवाशी रहावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच गृहनिर्माणाच्या योजना आखावयास हव्यात. ६० च्या दशकात कामगारांसाठी व मध्यमवर्गियांसाठी म्हाडाने अभ्युदय नगर, पंतनगर, कन्नमवार नगर, टागोर नगर, आदर्श नगर, डी एन नगर अशा वसाहती वसवल्या म्हणून काही प्रमाणात सामान्य मराठी माणूस मुंबईत टिकून राहीला. गेल्या काही वर्षांमधे राज्यकर्त्यांनी गृहनिर्माण बिल्डरांच्या हाती सोपविण्यांत धन्यता मानली. गिरण्यांच्या जमिनी, ३ के  खाली जमिनी धनिकांच्या मुंबईसाठी आंदण दिल्या गेल्या. लालबाग परळ, दादर, गिरगांव येथील पुनर्वसन योजनांमधूनही दामदुप्पट भावाने पुनर्वसित सदनिका खरेदी करण्यात विशिष्ट समाज आघाडीवर राहीला व त्यामुळेही मुळ मराठी बाहेर गेला. मुंबईत चार दिवस मांस विक्री बंदी करणारे आता पूर्वीच्या लालची सत्ताधाऱ्यांच्याही चार पावले पुढे जातात की काय असे वाटू लागले आहे. हे रोखावे लागेल. त्यासाठी मराठी माणूस एकवटावा लागेल.
'मराठी माणूस टिकवावा, मुंबईत महाराष्ट्र धर्म दिसावा' ही तो तमाम मराठी माणसांची इच्छा!