Sunday, November 23, 2014

होऊ दे पुन्हा मराठी अस्मितेचा एल्गार

मागासलेल्या महाराष्ट्राच्या विकासासाठी मते देण्याचे आवाहन करून भाजपने सर्वाधिक जागा जिंकलेल्या विधानसभा निवडणुकानंतर, या पुढे विकासाचेच राजकारण होणार आहे व अस्मितांच्या राजकारणाला लोकानी नाकारले आहे असा साक्षात्कार काही बुध्दिमंताना होऊ लागला आहे. त्यातच विदर्भवादी भाजप व अखंड महाराष्ट्रवादी शिवसेना ह्यांची २५ वर्षांची मैत्रीही संपुष्टात आल्याने अस्मितांचा संघर्ष अटळ होणार असल्याचे दिसत आहे. मोदींच्या व त्यांच्या तथाकथित विकासाच्या राजकारणाच्या प्रेमात आकंठ बुडालेलले हे मराठी' विचारवंत लावत असलेला अस्मितांचा अर्थ ह्या निमित्ताने तपासून पहाण्याची आवश्यकता वाटू लागली आहे. 

सोशल मिडीयाच्या प्रभावामुळे म्हणा वा मतदानाचे कर्तव्य बजावण्यासाठी सतत होत असलेल्या जनजागृतीमुळे म्हणा,  १८ ते २५ वयोगटातील बहुसंख्य तरूण मतदानाचे कर्तव्य पार पाडीत आहेत. त्यांचे संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन तसेच महाराष्ट्राची सामाजिक जडण घडण, पुरोगामी परंपरा यांचेशी घट्ट भावनिक नाते जुळलेले नसेलही कदाचित! परंतु महाराष्ट्राच्या संस्कृतीशी त्यांची नाळ जुळलेली नाही असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल. शिवाजी महाराज की s s s अशी घोषणा नुसती कानावर पडली तरी ज्या तरूणाच्या तोंडून आपसूकच 'जय' चा प्रतिसाद बाहेर पडणार नसेल तो मराठी तरूण कसला? शालेय जीवनामधे केवळ इतिहासाची पुस्तके वाचून मराठी अस्मिता अंगी बाणत नाही तर कुटुंबातील संस्कारांनी ती अंगी मुरत असते. पुढे आपले ध्येय गाठण्यासाठीच्या धडपडीमधे, यशाची शिखरे पादाक्रांत करण्याच्या तारूण्यसुलभ संघर्षामधे कित्येकदा स्वाभिमान, अस्मिता बाजूला पडतात. परंतु आयुष्य जगताना, आपले हक्क व अधिकार डावलल्याच्या जाणीवा निर्माण होता क्षणी अस्मिता फणा वर काढून उभी रहाते. मराठी अस्मितेचे असेच होत असावे. सामान्यपणे मराठी माणूस पोट भरण्यासाठी आलेल्याचे स्वागत करतो. एव्हढेच नव्हे तर त्याला पथारी टाकण्यास जागाही देतो. मुंबईमधे लोटा घेऊन आलेला थोड्याच काळात शेठजी होतो व रस्त्यावर कांदे-बटाटे विकणारा महाराष्ट्रात नेता म्हणून मिरवू शकतो. नोकरी, धंदा, रोजगार, शिक्षणविषयक, अन्यायाची व  डावलले जात असल्याची भावना, शहरीकरणामुळे निर्माण झालेले घरांचे प्रश्न व हे प्रश्न उभे रहाण्यास जबाबदार असलेले परप्रांतीय,ह्यांचा परस्परसंबंध जेंव्हा लक्षांत येतो तेंव्हाच मराठी माणसाला 'मराठी अस्मिता आठवते. जीवन दिवसेंदिवस स्पर्धात्मक होत असताना व  प्रगतीची अनेक दालने खुली होत असताना अस्मितेचे फार अवडंबर माजविले जात नाही हे स्वाभाविकही आहे. परंतु प्रगतीच्या संधी हिरावून घेतल्या जातात, अस्तित्वाचे प्रश्न निर्माण होतात तेंव्हा ठेच लागल्यावर जितक्या सहजपणे जखमेवर हळद लावणारी 'आई' आठवावी तशी मायमराठी आठवते. भोवतालच्या आपल्या सांस्कृतिक प्रथा परंपरांचा, संस्थांचा ताबा घेतला गेल्याची किंवा त्या उध्वस्त झाल्याची जाणीव त्याला त्रस्त करू लागते. हे केवळ मराठी अस्मितेबाबतच घडते असे नव्हे तर अगदी, बंगाल, आसाम, तामीळनाडूपासून ते श्रीलंका व ऑस्ट्रेलियामधेही, भाषिक,जातीय ,धार्मिक किंवा राष्ट्रीय अस्मितांच्या भावनेतून घडते. त्यातून हिंसक हल्ले होण्यापर्यंतही मजल जाते ह्याची अनेक उदाहरणे अगदी जगभर विकसित देशांमधेही आढळतात. 

आजच्या तरुणाईला अस्मितांशी काही देणे घेणे नाही असा (गैर)समज समाजामधे अधिक दृढ़ करण्याचे प्रयत्नही सध्या जोमाने सुरू अाहेत. ज्या समाजाने आपल्याला ओळख दिली त्या समाजातील तरूणांना ज्यांनी गौरवशाली इतिहासातून प्रेरणा घेण्यास उद्युक्त करावे त्यांनीच ज़र शौर्याच्या, त्यागाच्या, सामाजिक अभिसरणाच्या इतिहासाला  कालविसंगत असल्याचे घोषित केले तर समाज म्हणून ओळख टिकवता येईल कां? जो समाज वा देश आपला इतिहास विसरतो त्याचे भविष्यही धूसर होते  अन् अस्मितांची गरज तर तळाशी असलेल्यांनाच जास्त भासते व अस्मितांची जोपासनाही 'नाही रे' वर्गाकडूनच होते. भरल्या पोटी होतात त्या नुसत्या गप्पा टप्पा! ज्या पुण्यामधे देशातील तरूण मोठ्या संख्येने शिकण्यासाठी किंवा आय टी क्षेत्रातील संधीच्या शोधात येतात त्याच पुण्यनगरीत मोहसीन शेख ह्या निष्पाप  तरूणावर माथेफिरू तरूणांकडून हल्ला होतो व त्याला ठार मारले जाते. निमित्त होते ते इंटरनेटवर एका विकृताने टाकलेल्या मजकुराचे! परंतु आपल्या भविष्याची सोनेरी स्वप्ने रंगविणार्या ह्या उमद्या तरूणाला आपला जीव नाहक गमवावा लागला. धार्मिक अस्मितेचा चुकीचा अर्थ लावून त्यातून धर्मांन्धता जोपासणार्यां तरूणाना धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? हे कुणी समजावून सांगायचे? दिल्ली, बंगळुरू, गुरगाव येथे  ईशान्य भारतातून आलेल्या तरूणांवर हल्ले होतात ते भाषिक अस्मितेतून नव्हे तर राष्ट्रीय एकात्मता ही संकल्पना न समजल्यामुळेच! जातीय,धार्मिक वा भाषिक अस्मितांचे चुकीचे आविष्कार देशासाठी, समाजासाठी घातक ठरताना दिसत असूनही, आपण अस्मितांचे अस्तित्व मान्य न करणे ही आत्मवंचना ठरेल! अस्मिता कधीही मागे पड़त नाहीत वा पुसटही होत नाहीत किंबहुना ज्यांच्यासमोर जगण्याचे जटिल प्रश्न असतात त्यांच्यासाठी त्या दिवसागणिक टोकदार होत असतात. सर्व भौतिक सुखे ज्यांच्यासमोर हात जोडून उभी असतात त्यांच्यासाठी अस्मिता मग त्या भाषिक असोत वा प्रांतिक, निरूपयोगी ठरतात. अमेरिकेचे नागरिकत्व मिळालेल्या मराठी माणसांची मराठी अस्मिता जशी तेथील महाराष्ट्र मंडळामधे सुट्ट्यांच्या सोयीनुसार मराठी सण साजरा करण्यापुरेशी उफाळून येते तशीच आपल्यकडेही तिची मजल उच्चभ्रूंच्या लग्नसमारंभांमधे फेटे बांधण्यापर्यंतच जाते.
मराठी अस्मितेची ही अशीच ओढाताण होत असताना भाजपसारखा धूर्त राजकारण्यांचा भरणा असलेल्या पक्षाने मात्र मराठी अस्मितेचा ठेकेदार असलेल्या आपल्या मित्र पक्षालाच गाफील ठेवून 'शिवछत्रपतींचा आशिर्वाद' मिळवत मराठी अस्मितेचा पार बेंडबाजा वाजवून टाकला. मोदींवरची टीका म्हणजे गुजरातच्या अस्मितेचा अवमान असे सांगत गुजरातची सत्ता राखणार्या भाजपला अस्मितेच्या राजकारणाचे कसब चांगलेच साधते म्हणूनच 'कुठे नेऊन ठेवलात महाराष्ट्र माझा?' च्या भंपक आक्रोशाने काही काळापुरेशी कां होईना महाराष्ट्र प्रेमींच्या मनाची पकड़ घेतली.  पण हे करीत असतानाच स्वतंत्र विदर्भाची मागणी रेटणार्या भाजपने 'वैदर्भिय' अस्मिता जागवूनच तर विदर्भातील ४४ जागा पदरात पाडून घेऊन राज्याची सत्ता मिऴवली. विदर्भाचा विकास होत नाही व ह्या अन्यायाला उर्वरित महाराष्ट्रातील नेते जबाबदार आहेत ह्या ठाम समजुतीपोटी वैदर्भियांची अस्मिता जागते ही वस्तुस्थिति आहे. ह्याचाच अर्थ असा की जो पर्यंत अन्याय झाल्याची, दुर्लक्ष झाल्याची, आपले काही कुणीतरी हिरावून घेत असल्याची भावना निर्माण होत नाही तो पर्यंत अस्मिता ह्या राखेखालच्या निखार्यासारख्या असतात. ह्या निखार्यावर कुणी फुंकर घातली की त्यांतून निघणार्या ठिणग्या आगीचे अक्राळविक्राळ रूप धारण करतात. हॉंगकॉंग मधे आज जनतेच्या लोकशाही हक्कांच्या मागणीसाठीचे आंदोलन हा देखिल अस्मितेचा आविष्कारच ना? मोदींच्या कथित विकासाच्या अश्वमेधाचा चौखूर उधळलेला वारू बहुमताच्या उंबरठ्यावर पोहोचण्याआधीच रोखला जातो तो मराठी अस्मिता चेतवण्यामधे लाभलेल्या यशामुळेच! याचे भान आल्यामुळेच तर भाजप सरकारच्या शपथविधीला  इतिहासकालीन नेपथ्याच्या पार्श्वभूमीवर 'मराठी बाणा' दाखवण्याची वेऴ, मोदींच्या जाहीर सभेमधे,गुजराती धनिकाना शामियान्यामधे व सामान्य मराठी जनांना उन्हामधे बसविणार्या 'शहा'जोग भाजपा नेत्यांवर आली. अस्मितेवर दुसर्या अस्मितेचे आक्रमण लादू पहाणार्यांना वास्तवाचे भान कसे येते त्याचेच हे उदाहरण!

लोकसभा निवडणुकीतील यशाने बेफाम झालेल्या आदिलशाहीला आव्हान देण्यासाठी शिवसेनेने मराठी अस्मितेची वाघनखे बाहेर काढली व शतप्रतिशत सत्तेसाठी आतुर भाजपला पंतप्रधानांच्या २२ सभा संकेत मोडून राज्याच्या कानाकोपर्यात लावाव्या लागल्या. मोदींच्या सभा झालेल्या मतदारसंघांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त मतदारसंघांमधे तथाकथित विकासाचे राजकारण मतदारांनी धुडकावून लावले. शिवसेनेला १ कोटी म्हणजे १९ टक्के मतदारांनी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरच मते दिली, अखंड महाराष्ट्रासाठी दिली, हे कुणी नाकारायचे म्हटले तरी शक्य नाही. मराठी माणसांनी भाजपला मते दिली नाहीत असे नव्हे! परंतु विदर्भ सोडल्यास भाजपला शहरी भागातील, मध्यमवर्गियांची मते मोठ्या प्रमाणात मिळाली. कितीही मिळाले तरी ज्याचे समाधान होत नाही तो हाच वर्ग! ह्या वर्गाचे डोळे लागलेले असतात सदैव सातासमुद्रापार! तेथील जीवन कसे सुखी आहे व येथे कसे हाल होत आहेत याचीच गाणी ह्या वर्गातील कथित नवश्रीमंत गात असतात. काही वर्षांपूर्वी चाळीतल्या एका खोलीत रहाणारी ही मंडळी दोन बेडरूमच्या प्रशस्त फ्लैट मधे रहावयास गेली. दारी गाडी आली. हाती स्मार्ट फोन,अंगावर उंची ब्रैंडेड कपडे, या सहित वर्षाला एखाद्या परदेशी सहलींचे भाग्य लाभले. स्व. राजीव गांधीनी घडविलेल्या संगणक क्रांतीमुळे ज्यांनी संगणकाला आपलेसे करून स्वत: चे जीवनच कॉम्प्युटराईज्ड केले तो हा आजचा मध्यम वर्ग! ज्या कॉंग्रेसच्या धोरणांमुळे जीवनाला स्थैर्य लाभले त्या कॉंग्रेसबद्दलही ह्या वर्गाला आपलेपण वाटले नाही तर मराठी अस्मितेचे काय? ती तर आवाज कुणाचा? अशी डरकाळी फोडणार्यांनीच चिंता करावयाची बाब! बाकी आपल्या मुलाला पोदार हायस्कूलमधे वा नरसी मोनजी मधे अैडमिशन मिळाले नाही की ह्यांना मराठी माणसावर कसा अन्याय होतो ह्याची जाणीव होते. ह्या वर्गाला मधेच हिंदुत्वाचा तर मधेच राष्ट्रप्रेमाचा उमाळा येतो व मग 'राष्ट्रवादी हिंदू' नेता आपला आयकॉन वाटू लागतो, ७० च्या दशकामधे दीवार मधे गुंडांना एकट्याने लोळवणारा अमिताभ जसा सामान्य माणसांनाही आपलासा वाटत असे तसा! पूर्वी क्वचितच मतदानाला खाली उतरलेल्या परंतु आता 'मोदी माटे कमल' असा चंग बांधून लोटलेल्या गर्दी बरोबरच वहावलेल्या ह्या मध्यमवर्गियांनी मराठी अस्मिता शमीच्या झाडावर गुंडाळून ठेवली.

१९६६ साली प्रबोधनकारांच्या प्रेरणेने बाळासाहेब ठाकरेनी शिवसेनेची स्थापना केली तेंव्हा संयुक्त  महाराष्ट्राच्या आंदोलनामुळे प्रज्वलित झालेल्या  मराठी अस्मितेची धग मराठी माणसाच्या मनात तग धरून होती. अशातच 'बजाव पुंगी, हटाव लुंगी' ह्या शिवसेनेच्या घोषणेने मराठी तरूण भगव्या झेंड्याखाली एकवटला. भागा भागामधे शाखा स्थापन झाल्या. स्थानीय लोकाधिकार समिती स्थापन झाली. बैंक भरतीसाठी मराठी तरूणांकरिता प्रशिक्षण वर्ग झाले. अधेमधे, मराठी द्वेष्ट्या अधिकार्यांच्या कानाखाली आवाजही निघू लागले. मराठी अस्मितेला शिवसेना स्टाईलची जोड मिळाली. बैंकामधे, सरकारी उपक्रमांमधे मराठी तरूणांची भरती होऊ लागली व मराठीचा आवाज बुलंद झाला. परंतु पुढे सरकारी कर्मचार्यांचा संप,नामांतराचा लढा, गिरणी कामगारांचा संप, मंडल आयोगाला विरोध, ह्या संबंधीच्या वादग्रस्त भूमिकांमुळे सामान्य मराठी माणूस व शिवसेना ह्या मधले अंतर वाढतच गेले. नंतरच्या काळामधे, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर, जहाल भूमिका घेतल्यानंतरही आपणच मराठी अस्मितेचे तारणहार असल्याचा दावाही शिवसेना अधूनमधून करीत राहिली. मराठी अस्मितेबाबतच्या धरसोड वृत्तीने मराठी माणसाचा सेनेवरचा विश्वास मात्र या काळामधे डळमळीत होऊ लागला. असे असले तरी मुंबईसारख्या महानगरामधे मराठी माणसाचा उरला सुरला आवाज टिकून राहीलाल तो शिवसेनेमुळेच!  ह्या बदद्ल सेनाविरोधकांचेही दुमत नाही हे लक्षांत घ्यायला हवे. मित्रपक्षाने विजयाच्या उन्मादापोटी शिवसेनेची चालवलेली अवहेलना, मराठी मनाला ज़ख़म करणारी आहे ती यामुळेच!  ज्या मराठी मतदारांनी विकासाच्या गमजाना भुलून,भाजपला मतदान केले ते ही भाजपच्या नावाने कडकडा बोटे मोडू लागले आहेत ते मराठी अस्मितेला चिरडू पहाणार्या 'शाही'स्तेखानाचे मनसुबे ध्यानांत आले आहेत म्हणूनच! निकालानंतर शिवसेनेने सत्तापदांसाठी केलेली भाजपची मनधरणी मराठी जनतेला पसंत पडलेली नाही.विरोधी पक्षांत बसण्यासंबंधी शिवसेनेने ठाम भूमिका घ्यावी अशीच लोकभावना होती. सत्तेपासून दूर राहून विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारण्याच्या निर्णयाबद्दल, सत्तेसाठी उतावीळ झालेल्या काही सेना नेत्यांच्या मनांत नाराजीची भावना जरूर आहे,परंतु मुंबई पुण्यापासून, नाशिक औरंगाबाद पर्यंत शहरांमधून धनिक वणिकांच्या पैशाच्या जोरावर सुरू असलेल्या मुजोरीला विटलेल्या मराठी जनतेला आता आमची मराठी अस्मिता अनाथ नाही ही भावना दृढ़ झाली आहे. राज्यातील मराठी जनतेसमोर असलेल्या रोजगाराच्या प्रश्नावर, परवडण्याजोग्या घरांच्या समस्येवर,कष्टकर्यांच्या, असंघटित कामगारांच्या प्रश्नावर आता मराठी आवाज बुलंद होईल असा विश्वास रुजला आहे. म्हणूनच आता वेळ येऊन ठेपली आहे शमीच्या झाडावर ठेवलेली अस्मितेची शस्स्त्रे परजण्याची,पुन्हा एकदा होऊ दे एल्गार मराठी अस्मितेचा!  शिवसेनेसाठी नव्हे तर मराठी अस्मितेच्या स्वाभिमानाचे रक्षण करण्यासाठी! तेंव्हाच अस्मितेचे अर्थ उमजतील.

अजित सावंत
मो: 9820069046
ajitsawant11@yahoo.com